रम्य बालपण | गोड आठवणी ||
सुंदर खेळणी | बालपणी ||
नानाविध खेळ | बाहुलीचे लग्न ||
खेळण्यात दंग | मुले सारी ||
विटीदांडू खेळ | मौजमजा फार ||
पोहाया विहीर | असतसे ||
कसली ना भिती | ना कसली चिंता ||
मित्रांत एकता | राहतसे ||
आवडीचा फार | लगोर हा खेळ ||
मित्रांचा रे मेळ | बसवत ||
लपाछपी खेळ | आणत दमाला ||
गाव एकट्याला | रडवत ||
त्या सूर पारंब्या | खेळ होता न्यारा ||
मुलांचा दरारा | खेळण्यात ||
क्रिकेटची टीम | व्हायची तैय्यार ||
खेळाचे ते सारं | वाटतसे ||
हे आभासी जग | हाती मोबाईल ||
थकून जाईल | आज पोरं ||
पुर्वीचा तो काळ | मैदानी ते खेळ ||
बसवत मेळ | खेळायचा ||
डबडे पाहून | आज थकलेत ||
सारे वाकलेत | मानेतून ||
त्या मोबाईलचे | लागले रे वेड ||
शहर ते खेडं | चोहीकडे ||
खेळ विसरले | मैदान ते खाली ||
मोबाईल आली | सर्वा हाती ||
मैदानी ते खेळ | सारे विसरले ||
मुके आज झाले | संवादात ||
बालपणी आज | चष्मा डोळ्यांवर ||
ताण मेंदूवर | पडतसे ||
फालतू तो लाड |करावेत बंद |
नानाविध छंद | जोपासावे ||
मिनू म्हणे मना | आवर हो घाला ||
त्या पश्चातापाला | नका जाऊ
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम