मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Thursday, March 7, 2024

तूच आहेस नारी...(जागतिक महिला दिनानिमित्त मुक्तछंद काव्य)

*८मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (मिनाक्षी पांडुरंग नागराळे)*

तूच आहेस नारी.... (मुक्तछंद काव्य)

कोण काय म्हणतंय?
लक्षच देऊ नकोस
मस्त रहा...अगदी बिनधास्त जग
जगून घे मनसोक्त
बुरसटलेल्या विचारांना
फाटा देऊन
टाक सखे पुढचं पाऊल
कितीही चांगले वागलीस
तरीही नांवच ठेवत राहतील 
पुढं नाहीतर मागं बोभाटा करतील
द्यावी लागेल तुला प्रत्येक वेळी अग्निपरीक्षा
पुर्वीही होती आणि आजही आहे
फक्त बदललंय थोडं स्वरूप...
स्त्री म्हणजे अबला...
उपभोगाची वस्तू असंच काही...
पण तू रहा खंबीर....
घे जिजाऊचं धैर्य आणि धाडस..
आहिल्याचा करारी बाणा....
राणी झलकारीची चपळाई...
झुगारून दे वाईट रूढी परंपरा...
कल्पना चावलाचं बळ घे...
स्नेहा कोकणेताई पाटील यांची ताकद घे
सावित्रीची बुध्दी घे...
बघ जमतंय का तुला?
लाथाडून दे अन्यायाला
प्रतिकार करत जा अंधश्रद्धेला
मानवतेचा स्विकार करीत जा...
माणसातला माणूस ओळखायला शिक
स्पर्धेच्या युगात टिकायला शिक
यशाची शिखरं बिनधास्त गाठ
त्यासाठी बांध मनाशी खूणगाठ...
तुच आहेस सबला...
तूच आहेस शक्ती, भक्ती
तूच आहेस तुझी स्त्री मुक्ती....
कवेत घे आकाश
तूच आहेस गं नारी
उद्याचा धगधगता प्रकाश....!
तूच आहेस जाज्वल्य इतिहास
तूच आहेस देशाचा मान
घराचा अभिमान...
देशाची शान....
नारी तुझा सम्मान....!!


कवयित्री
 मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव

Wednesday, March 6, 2024

शिवकाव्य...


 विषय-शिवकाव्य*



छत्रपती  शिवाजीचा

जन्म झाला शिवनेरी  

सन सोळाशे हो तीस

एकोणीस    फेब्रुवारी....



शिवछत्रपती     राजा 

थोर जिजाऊ माऊली

संस्काराचा लेप लावी

शिवबाची हो सावली...



कुशीतून     उगवला 

तळपता  वीर   तारा 

फुटे  घाम   शत्रूलाही

नाही  शत्रूसही  थारा...



रामकृष्ण गोष्टी छान

सांगतसे  जिजामाता 

न्याय  अन्याय  शिकवू 

जगी   श्रेष्ठ    वीरमाता....



युध्दनिती  शिकवली 

हाती   दिली तलवार 

बालपणी    थरारली 

तळपती      तलवार....



कर     तलवारबाजी 

सपासप   वार   कर

घोड्यावर स्वार होऊ

चढू  लागे   झाडावर....



दांडपट्टा फिरू लागे


लांब जाई भालाफेक 


एक  एक  धडा  घेई


माय जिजाऊचा लेक...



स्वराज्याचं स्वप्न पाही


राजमाता जिजाबाई 


शूरवीर    पुरूषांच्या 


नांवे गाजे जिजाआई...



स्वराज्याची हो प्रतिज्ञा


रायरेश्वरात         घेई


मुठभर   मावळ्यांना 


धडे  स्वराज्याचे  देई....



शत्रू    घाबरत    असे


नांव   ऐकता शिवाजी 


वीर   मावळे    सगळे


लावी जिवाचीच बाजी...



अफजलखाने वीडा


शिवाजीचा उचलला


शिवबाने कोथळाच 


वाघनखे ने फाडला...



कोसळला  शत्रू  खान


उडे   शत्रू   दाणादाण


शाहिस्तेखानच   जाई


घेण्या शिवबाची जान...



बोटे कापली खानाची


झोपेतही      बडबडे


धाक खावून शिवाचा 


शाहिस्तेखानच   रडे....



पेटा-यात    बसूनहो 


गेले  होते   शिवराय 


तुरी  दिल्या  हातावर


निसटले     शिवराय...



एक   एक   गड    घेत


युध्द   करत   शिवाजी 


स्वराज्यासाठीच सारी


बाजी लावी हो तानाजी....



गड  आला  पण  सिंह 


धारातिर्थी   रे   पडला


एक   एक   मावळ्याने


इतिहास      घडवला.....



सिद्दी   पाठलाग   करी


वेळ आली आणिबाणी


शिवाजीची    घालमेल 


बाजीप्रभु   ओळखली....



खिंड  बाजीने   लढली 


पाहुनच   स्वामीभक्ती 


आले  भरून  मन   रे


कांही चालेना हो शक्ती...



स्वराज्याचे  ध्येय  होते


शिवाजीला   गाठायचे 


जिवावर   आले   होते


बाजीप्रभु    सोडायचे....



सुरू    झाली   लगेचच


झुंज  खिंडीत  शर्थीची


पराक्रमी      बाजीप्रभु 


झाली कोंडी हो शत्रूची...



शत्रूचीही    घामाघूम 


घोडखिंड    लढवली 


झाली पावनखिंड हो


तोफ  मग  कडाडली....



स्वामीभक्त बाजीप्रभु 


धारातिर्थी  कोसळला 


इतिहास   मावळ्यांनी 


शिवबाच्या   घडविला.....



राजधानी      रायगड 


एक   अपूर्व   सोहळा 


शिवबाच्या राज्यासाठी 


लढे   एकेक   मावळा.....



सर्व  धर्मांना, प्रजेला 


न्याय व सुख देणारा 


स्वराज्याचे स्वप्नासाठी


पुर्णपणे      झटणारा....



असा  शूरवीर   राजा


होता न्यायी दिलदार


भल्याभल्या शत्रूनींही 


होती  घेतली  माघार....



माझा जाणता राज्याचा 


भरे     छान      दरबार


स्वराज्याचं स्वप्न  पाही 


घुमे         जयजयकार....



महाराष्ट्र दैवत मानते


करी मानाचा  मुजरा


शिवजयंतीचा   सण


चला करू हो साजरा....



*कवयित्री-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*


*ता.जि.वाशिम*


मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...