मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Saturday, February 22, 2025

इतक्या क्रुरपणे मारायचं असतं का?


इतक्या क्रूरपणे  मारायचं असतं का?(कविता मनातली)

एक चापट मारली म्हणून
हत्याच करायची असते का?
घाणेरड्या राजकारणासाठी
इतक्या क्रूरपणे मारायचं असतं का?

आका,बोका,खंडण्या काय चाललंय?
माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात
अहो लाज वाटली पाहिजे थोडी तरी
स्वतःच्या स्वार्थासाठी मग
वडिलांचं छत्रच उडवायचं असतं का?

राजकारणी सगळेच एका माळेचे मणी
गरीबाला कोणी आहे का धनी?
अन्यायाला प्रतिकार केला म्हणून
जिवानिशी उडवायचं असतं का?

एका आईच्या पोटचा गोळा होता
एका मुलीच्या आधारस्तंभ होता
असं किड्या मुंग्यावानी कुणी दिवसाढवळ्या
उचलून नेऊन हत्या करतं का?
इतक्या निर्दयीपणे कुणी कुणाला मारतं का?

काय चूक होती त्या निष्पाप जिवाची?
इमानदारी तुमच्या आडवं येते का?
राजकारण्यांच्या वरहस्ताशिवायं
सांगा हे सगळं घडतं का?

संतोष देशमुखांना मारून
दोन महिने होतायेत
अजूनही सरकारला मोबाईल
सापडत नाहीयेत
सापडला मोबाईलातला डेटाच उडतो का?

कायदा,संविधान,सर्व हाती घेत चाललेत
जनतेचे सेवकच आता दादा बनायलेत
आपल्याच भाकरीवर आपलीच पोळी  शेकायलेत 
आता जनतेनेच न्याय मागायचं का?
एक चापट मारली म्हणून हत्याच करायची असते का?

कवी,लेखक, आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ 
पत्रकार, कधी उठवणार आहेत तुमचा आवाज?
इतकं सारं महाराष्ट्रात घडूनही
 उघड्या डोळ्यांनी बघायचं का?
उघड्या डोळ्यांनी बघायचं का?

कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.

Sunday, September 8, 2024

महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

*महाराष्ट्र राज्य शासनाकडून सावित्रीच्या लेकीचा (मिनाक्षी नागराळे) मुंबई येथे गुणगौरव* सन २०२३-२४ चा महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनी मुंबई येथील टाटा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट, नरिमन पॉईंट मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब विधानसभा अध्यक्ष मा .अँड.राहुल नार्वेकर, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री मंगल प्रभात लोढा, लोकसभेचे सदस्य माननीय श्री अरविंद सावंत, विधान परिषद सदस्य मा. श्री जगन्नाथ अभ्यंकर, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव माननीय आय .ए.कुंदन, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त मा. श्री सुरज मांढरे, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार मा.श्री किरणराव सरनाईक तसेच आमदार संभाजीराव थोरात आदी मान्यवरांच्या हस्ते मिनाक्षी नागराळे यांना शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे 17 निकषाद्वारे कठीण पडताळणी जिल्हा व राज्यस्तरावर केली जाऊन नंतर त्याचे मूल्यांकन केले जाते. त्यातूनच छाननी होऊन आदर्श शिक्षक निवडले जातात. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आज पर्यंत वाशिम जिल्ह्यातून प्रथमताच महिला शिक्षिकेची निवड झाल्याने सर्व स्तरातल्या जनसामान्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत आनंद व्यक्त केला. मिनाक्षी नागराळे ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथे कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांच्या शाळेतील त्या पहिल्या महिला शिक्षिका व शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार घेणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका असल्याने महिला वर्गात खूप आनंद झाला. जिल्ह्यातल्या इतर शिक्षिका भगिनींना प्रेरणा मिळाली. मिनाक्षी नागराळे यांनी लॉकडाऊन काळात मुख्यालयी राहून अंगणात शाळा भरवली. शाळा बंद पण शिक्षण सुरू या सदराखाली त्यांनी अनेक शैक्षणिक PDF,PPT, Flip book ,Blog ,youtube channel असे तयार करून त्यावर शैक्षणिक साहित्य निर्माण करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. लोकवर्गणीतूनच शाळेचा कायापालट करत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यामध्ये उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन सोपे जावे यासाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये कोकलगाव जिल्हा परिषद शाळेला साडेसात हजार रुपयाची पुस्तके बक्षिस स्वरूपात मिळाली. प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शनिवार घेतला. तसेच तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहिले हा उपक्रम वाखाणण्याजोगा होता. पक्षी वाचवा, बाल आनंद मेळावा, छोटी सहल, पाणी वाचवा, व्यसनांची होळी, संस्कृतिक कार्यक्रमाची धम्माल, गावकऱ्यांकडून घसरगुंडी, साऊंड सिस्टिम, रोपे,कुंड्या, कचरापेटी, घड्याळ, पूजेचे ताट, महामानवांच्या प्रतिमा इत्यादी भेट स्वरूपात स्वीकारल्या. इतकेच नाही तर आपण प्रत्येक जण समाजाचे, गावाचं, शाळेचं काहीतरी देणं लागतो ही भावना गावातल्या जनमानसात रुजवली आणि शाळेचा पट वाढला. वाशिमला बाहेरगावी इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे आपोआप ओढू लागला. मिनाक्षी नागराळे यांचे हजारो शैक्षणिक व्हिडिओ यूट्यूब चॅनल वर अपलोड असून महाराष्ट्रातील लाखोंनी व्हुज आहेत. ई लर्निंगचा चांगला उपयोग या सर्व गुणसंपन्न प्रतिभा असलेल्या कवयित्री, शिक्षिका, लेखिका असणाऱ्या मिनाक्षी नागराळे यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत. ७० पुस्तकांचे समीक्षण राज्यातल्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित आहे. इतकेच नाही तर 92 व्या व 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या कवितेची निवड झाली आहे.२ वेळा जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत नंबर घेतला. शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती करून १२०० च्या वर व्हिडिओ youtube वर अपलोड केले शैक्षणिक blog निर्मिती करून राज्यभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला. इतकेच नाही तर SCERT पुणे यांच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या वेगवेगळ्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले NCERT कडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.मिनाक्षी नागराळे या वाशिम जिल्ह्यातील शासनाचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका असल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री रामकिसन वाकुडकर सर व शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेश काळबांडे व सर्व शिक्षक वृंद ,गावकरी मंडळी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

मिनूच्या कविता...: शब्दांतून व्यक्त होणं

मिनूच्या कविता...: शब्दांतून व्यक्त होणं: 8/9/2024 शब्दांतून व्यक्त होणं... इतकंही सोपं नसतं शब्दांतून व्यक्त होणं आतल्या भावनांना आतल्या आत गुंतवणं...!! कुठूनतरी आवाज बाहेर ढकलल्या ...

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...