मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Thursday, June 26, 2025

आला आषाढ आषाढ


आला आषाढ आषाढ(२६/६/२०२५)

आला आषाढ आषाढ
आज पहिला दिवस
रोगराई पसरते
पाळा स्वच्छता दिवस...!!

आरोग्याची घ्या काळजी
पाणी उकळून घ्यावं
हात स्वच्छ धुवावेत 
ताजेताजे अन्न खावं ...!!

डास मच्छर होतात
दिवस हे पावसाचे
टापरंटुपरं फेका
जिथे जिथे पाणी साचे...!!

आषाढ तळून घ्यावे
पाणी स्वच्छच रे प्यावे
दारखिडक्याही लावा
साप, डोकावून पाहे...!!

आषाढीच्या एकादशी
वारी विठ्ठलाची भक्ती
नामस्मरणातून मिळे
मानवाला खूप शक्ती...!!

धन्य ते पंढरपूर
सोहळा विठ्ठलाचा भरे
नामघोष विठ्ठलाचा
मन आनंदाने उरे....!!

आला आषाढ आषाढ
हर्ष मानसी होतसे
सुखावून शेतकरी
कर दोन्ही जोडतसे....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
कोकलगाव 

Friday, June 13, 2025

ऐक आतला आवाज

 ऐक आतला आवाज( १३/६/२०२५)

ऐक आतला आवाज
तुला पटलं तेच कर
सांगणारे सांगत असतात
तू सुखाची ओंजळ भर....!!

एका कानाने घे ऐकून
दुसऱ्या कानाने दे सोडून
तुझ्या अंतर्मनाला पटलं तर
तू कर तुझे दोन्ही हात जोडून....!!

चांगलेभले तुला कळतेच
पण जशास तसे वागू नको
तु तुझे चांगले कर्म करत रहा
वेड्यांच्या नादी तु लागू नको....!!

प्रामाणिक रहा तू स्वतःशी
डागेलपणा तू करू नको
इथल्या इथेच आहे सारे
तू तुझा गर्व दाखवू नको....!!

क्षणभंगुर हे जीवन वेड्या
आनंदाने शिक जगायला
इथे रोज नवीन लढाई आहे
तू ही शिक आता लढायला....!!

काळानुसार नाती बदलतात
जग हे स्वार्थी आहे माणसा
तुझ्या आतला आवाज ऐक
तू चांगल्या मार्गाने चाल माणसा...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

Saturday, April 19, 2025

काही माणसं(कवितेत माणसांचे प्रकार)

 *कांही माणसं*
(माणसांचे वेगवेगळे प्रकार)

काही माणसं असतात घातकी
तर काही माणसं विश्वासघातकी
काही माणसं दाखवतात आपुलकी
तर कांहीं माणसांत असते एकी...!!

काही माणसं स्वत:चा टेंभा मिरवणारी
तर कांहीं कर्तव्याकडे पाठ फिरवणारी
कांहीं माणसं एकमेकांचा आदर करणारी
तर कांही माणसं अर्वाच्य भाषेत बोलणारी...!!

कांहीं माणसं असतात फारच गुणी
कधी कधी हेवा वाटणारी
तर कांहीं माणसं असतात तोंड 
पाहून तळवे चाटणारी.......!!

कांहीं माणसं असतात खूप स्वार्थी
कांहीं माणसं उशीरा ओळखता येतात
कांहीं माणसं असतात फारच लाचार
पण सगळे दिवस आपोआप निघून जातात...!!

कांहीं माणसं स्वत:ला मीच भारी म्हणणारी
कांही माणसं स्वाभिमान गहान ठेवणारी
कांहीं माणसं वरून एक आतुन वेगळंच
काही माणसं गांडूळासारखी दोन तोंडी...!!

कांहीं माणसं असतात खूप साधीसुधी
कसलाही गर्व अहंकार नसणारी
देशहितासाठी प्राणार्पण करणारी
कांहीं जिंदादिल कायम खूश असणारी...!!

कांहीं माणसं ध्येयाने पछाडलेली
तर काही माणसं माणसांचं मन वाचणारी
कांहीं माणसं पडद्यामागे नाचणारी
तर काही माणसं आपलं धन जपणारी...!!

कांहीं माणसं असतात आशावादी
काही शून्यातून विश्व निर्माण करणारी
काही माणसं इतरांवर जळणारी
तर कांहीं माणसं इतरांकडून प्रेरणा घेणारी...!!

कांहीं माणसं असतात दुस-या साठी जगणारी
काही असतात आपल्याच भाकरीवर दाळ ओढणारी
कांहीं माणसं असतात स्वाभिमान जपणारी
काही माणसं असतात जीवाला जीव देणारी...!!

काही माणसं असतात मदतीला धावून येणारी
काही माणसं असतात वेळेला बोलून दाखवणारी
कांहीं माणसं असतात माणसांत नसणारी
काही माणसं असतात विनाकारण हानामारी करणारी...!!

*कवयित्री मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

Thursday, April 10, 2025

चिमणी दिनानिमित्त अभंग प्रकार....दारात चिमणी

 दारात चिमणी (अभंग प्रकार) 

धावत पळत | चिमणी येईल |
चोचीत नेईल | चार दाणे ||

ठेवा गार पाणी| जुन्या लोटक्यात |
दाणे एळणीत | चिमणीला ||

आला हो उन्हाळा | त्या उन्हाच्या झळा |  
येवो कळवळा | सर्वांनाच ||

दारात चिमणी | प्रत्येकांने ठेवा ||
चिमणीस मेवा || आवर्जून ||

दिसताच झाडे | ती हिरवीगार |
चिमणीला फार | आवडेल ||

निसर्ग हिरवा | आवडतो तिला |
जपा चिमणीला | सर्वजण ||

 थंडगार पाणी | जे अमृतावाणी |
 पितसे चिमणी | सदाचिया ||

ओळखा पक्ष्यांना | कडक उन्हाळा | 
उन्हाच्या त्या झळा | सोसवेना ||

चिमणी दिनाला  | करा एक पण |
चिमणी आपण | वाचवूया ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

|

Thursday, April 3, 2025

बहीण त्याला कळली नाही (कविता काळजातली)

 *बहीण त्याला कळली नाही*

नम्रपणे बोलण्या जीभ त्याची वळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!

संकटावर मात करण्या उभी राहिली सदैव
हातात घालून हात संकटे पेलत राहीली सदा
खंबीरपणे उभी स्वतः क्षणभरही ढळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!

संघर्षमय जीवन जगत राहीली सदा
झगडत राहीली वाघीण सतत परिस्थितीशी
बिकट परिस्थितीत कधीच ती पळली नाही 
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!

आईसारखीच माया तिची तुझ्याचसाठी 
धूर तुझ्या डोळ्यांत साठला कसला काय माहिती?
मागता क्षणी देत राहीली कधी कुणावर जळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!

ज्याला कळली बहीण तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला
ज्याला कळली बहीण तो सुभद्रेचा कृष्ण झाला
देवकीचे प्रेम मात्र कंसास कधी वळले नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!

मोह,माया,गर्व, अहंकार काय घेऊन बसलास
मरणासन्न त्या आत्म्याला पुन्हा मारत बसलास
एवढी तिची शालिनता कधी मळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!

नाही राहीली भार कुणावर बनली स्वावलंबी
अक्कलहुशारी,अन पुण्य पाठीशी घेऊन
सोबतीला मायबापांचे आशिर्वादाने राहीली
स्वकष्टावर जगली  सदा, कुणा ती भाळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!

माझे माझे म्हणत गेली,आले संकटे झेलत गेली
माहिती होते कुणी नाही कुणाचे वेड्या तरी
मन मारून जगत राहीली अपेक्षा ना कुणाची
मातापित्यानंतर कधी कुणा ती सळली नाही...!!
जीव लावणारी लाखात एक,एकुलती एक 
बहिण त्याला कळली नाही...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.

Wednesday, March 12, 2025

बालमनावर चांगले संस्कार पेरणारा कथासंग्रह म्हणजे -पॅडीची गोष्ट

 बालमनावर चांगले संस्कार पेरणारा कथासंग्रह म्हणजे पॅडीची गोष्ट

   ६ ते १४ वयोगटातील जे मुले असतात अशा मुलांवर जर चांगले संस्कार रूजवले तर पुढच्या शंभर वर्षापर्यंत ते चिरकाल टिकणारे असतात. जसे वाईट संस्कार माणसाला बिघडवल्याशिवाय राहत नाहीत तसे चांगले संस्कार माणसाला बिघडू देत नाहीत. योग्य वयात संस्कार रुजवणे फार महत्त्वाचे असते. अगदी एखाद्या कुंभाराप्रमाणे कच्च्या मातीच्या गोळ्यापासून कुंभार पक्की मडकी बनवतो अगदी तसेच बालकांचे कोवळ्या मनाच्या पाटीवर जे कोरले जाते ते चिरकाल टिकणारे असते. राजमाता जिजाऊ मॉं साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बालवयातच स्त्रियांचा सन्मान करायला लावणारे संस्कार पेरले होते म्हणून अख्या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले पण ते शत्रूच्या स्त्रीलाही आदराने वागवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एकमेव राजे ठरले म्हणून संस्कार ही अशी गोष्ट आहे ती योग्य वयातच करावे लागतात.
     बीड जिल्ह्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध लेखक श्री उमेश मोहिते सर यांचा नुकताच प्रकाशित झालेला कथासंग्रह 'पॅडीची गोष्ट' वाचनात आला. या कथासंग्रहातील सर्वच कथा प्रत्येक बालकांवर चांगल्या संस्काराचा लेप लावून बालकांच्या भावविश्वात घेऊन जातात.जणू त्या कथेत मी स्वतःच आहे की काय असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. प्रत्येक कथा लहान मुलांना आपली आहे अशी वाटू लागते. शब्दांची जादू असलेले उमेश मोहिते सर यांच्या शब्दांमध्ये खरंच जादू आहे. 
         प्रॉमिस कथेतून वर्गाला अभ्यास करून पुढे न्यायचं त्यासाठी बाळूने केलेली धडपड खरंच वाखाणण्याजोगी आहे. अशी कथा प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गाचा वास्तव जपण्याचा संदेश देते. परीक्षा काळात अभ्यास किती महत्त्वाचा असतो?  हे नकळत सांगून जाते. बाळू सारखा हुशार मुलगा वर्गात असल्याने त्याच्या मित्राला बाळू बद्दल असलेली आपुलकी, माया,प्रेम दिसून येते. एका वर्षात बाळू सारखा अभ्यासू मुलगा सर्व घटक चाचण्यात पैकीच्या पैकी मार्क घेऊन सर्वांचा लाडका कसा होतो?  यावरून अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे बालकाला प्रॉमिस या कथेतून शिकवून जाते.
          येस फ्रेंड ही बालकथा बालकांच्या काळजाला भिडणारी आहे. सरांचा मार चुकवण्यासाठी मण्यांनी वर्गात बोललेलं खोटं  अन्याला सहन होत नाही. खोटे बोलणे हे पाप असतं असं म्हणत आणि याने मित्राची चूक मित्राच्या आईला सांगून पुन्हा खोटं बोलू नये मित्र म्हणून याची चाललेली धडपड खरंच कौतुकास्पदच आहे. लहान मुलांना समजत नाही खोटे बोलणे किती वाईट असते. अन्या जिवलग मित्र असूनही मन्याला चांगली सवय लागावी या हेतूने मित्राचे साथ देणारा अन्या खूप छान मुलांना भावल्याशिवाय राहत नाही.
      गौरव कथेमधला गौरवचे अक्षर किती सुंदर आहे? म्हणून खेडेगावातून आलेल्या गौरवच सरांनी केलेलं कौतुक गौरवच्या आयुष्याला आकार देणारं आहे .भाषा हे बोलण्याचा माध्यम असले तरी खेडेगावातून आलेल्या गौरवला गृहपाठ न केल्याबद्दल सरांनी उठवलं खरं पण गौरवच्या सुंदर अक्षरा पुढे अवाक झालेले मराठी विषयाचे काळे सर गौरवचे मनापासून अभिनंदन करतात. गुरु शिष्याचं नातं कसं असावं? विद्यार्थी कसा असावा? विद्यार्थ्यांचा अक्षर कसं असावं?  असे अनेक प्रश्न बालमनाला पडल्याशिवाय राहत नाहीत.सुंदर अक्षर हाच सोन्याचा दागिना आहे ही ओळ बालमनावर संस्कार नक्कीच करून जाते.
       गणित येत नाही म्हणून घाबरलेल्या रम्याला केवळ संकटात मदत करणाराच खरा मित्र. या सरांच्या एका ओळीचा पडलेला प्रभाव अमितवर दिसून येतो. त्यामुळे अमित रम्याशी मैत्री करतो. संकट काळात मदतीला धावून येतो तोच खरा मित्र . हा सुविचार या कथेमध्ये दिसून येतो.अमित वर झालेले योग्य संस्कार गणेश सारख्या मुलाने किती दिवस त्रास दिल्या तरी चांगले संस्कार सुटत नाहीत चांगल्या विचारांनी माणूस चांगलाच होतो हे शिकवण  मित्र या कथेतून विद्यार्थ्यांना मिळते.
      एक मार्काचं आपण राधाला विचारून लिहून आपणाला २९  मार्क पडले म्हणून त्याचं बक्षीस घेताना हुंदका देत रडणारी सुरेखा सरांना खरं काय ते सांगते. त्यातून खोटं बोलणं हे पापच पण खोटं बोललेलंही सर्वांसमोर सांगून मोठ्या मनाचे सुरेखा प्रामाणिकपणे सरांना बक्षीस परत करण्याचा प्रयत्न करते त्यावर सुद्धा सरांनी तिच्या प्रामाणिकपणाचे केलेलं कौतुक बालकांना प्रामाणिकपणाचे संस्कार पेरून जाते आणि लहान मुलांना विचार करायला लावणारी ही कथा आहे. वास्तव जाणून न घेता माने सरांनी सुन्याला केलेली शिक्षा सरांच्याही काळजाचा ठोका सत्य ऐकल्यावर चुकल्यासारखा वाटतो. कधी कधी जे दिसतं तसं नसतं मनानं सुन्याला मार बसावा म्हणून जाणीवपूर्वक मन्याने दप्तरात ठेवलेली वही बालवयातला वर्गातला खोडसाळपणा दाखवतो. केवळ बघ्याची भूमिका न करता सत्य सांगणारे रवी आणि दिनू यांनी सरांना सांगितलेले सत्य सुद्धा सांगण्यासाठी धाडसच लागतं हा संस्कार फार महत्त्वाचा आहे. नाजूक परिस्थिती असणारा प्रत्येक जण चोरच असतो असे नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी मानलेले नाते किती श्रेष्ठ असतात.पेपर टाकणारा पेपरवाला खुशीचा जीव वाचवतो तेंव्हा सख्खा भाऊ नसल्याचे दुःख विसरून राखी पेपरवाल्या भैयालाच आपला भाऊ मानते. त्याने राखीचा जीव वाचवला होता. अशा बहिण भावाच्या निष्पाप प्रेमाची कथा बालमनावर नक्कीच संस्कार पेरणारी आहे.
      एका वडील नसलेल्या बबनच्या घरची परिस्थिती खूपच नाजूक होती. बबन अभ्यासात खूप हुशार होता पण त्याच्याकडे गणवेश घ्यायला पैसे नव्हते. पॅडी नावाचा मुलगा आपल्या गरीब मित्राला खाऊच्या जमा केलेल्या पैशातून ड्रेस घेऊन देतो.ही कथा बालकांच्या खोल मनात शिरल्याशिवाय राहत नाही. पॅडीची गोष्ट ही कथा बालमनावर एकमेकांना मदत करायला लावणारी आहे. 
      उमेश मोहिते सरांच्या सर्वच कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या आहेत. कितीही गरीबी असली तरीही रघु यशवंतकडे स्वतः दूध तालुक्याच्या ठिकाणी घालायला सायकलवर घेऊन जातो. रघुची सायकल घेण्यासाठी चाललेली धडपड ही ' खरी कमाई' या कथेतून दिसून येते.खरंच खरी कमाई ही कथा आणि त्यावर रघूचे प्रामाणिक कष्ट वाखाण्याजोगी आहे. प्रामाणिक रघुचा संघर्ष 'खरी कमाई' या कथेतून दिसून येतो. बाळू आणि गजाच भांडण कायमचं मिटवण्यासाठी राखीने केलेली राखीची आयडिया कौतुकास्पदच आहे. मुलांनी आपापसात भांडू नये हे राखी या कथेतून दिसून येते. नेहमी शाळा बुडवणारा पम्या अभ्यासात जरी कच्चा असला तरी एलिमेंट्रीच्या परीक्षेत मात्र तालुक्यातून पहिला नंबर मिळवतो. यावरून अभ्यास न करणाऱ्या मुलांना ही कथा खूप प्रेरणादायी आहे. शाळेविषयी आवड निर्माण करणारी आहे. भेट, शाबास रघु आणि सई या कथासुद्धा खूप चांगल्या संस्कार घडवणाऱ्या व शाळेविषयी अस्मिता बाळगणाऱ्या संस्कारक्षम कथा आहेत.
     लेखक उमेश मोहिते यांच्या पॅडीची गोष्ट या कथासंग्रहातील सर्वच कथा लहान मुलांवर चांगले संस्कार घडवणाऱ्या तर आहेतच पण बालकांना नक्कीच प्रेरणा देऊन जाणा-या आहेत. सानथोरानी सर्वांनीच वाचावा असा उत्कृष्ट बालकथासंग्रह सर्वच शाळेमध्ये निश्चितच असायला हवा. उमेश मोहिते सरांची साधी सरळ सोपी भाषा बालमित्रांच्या अंतकरणाला भिडणारी आहे. प्रत्येक शिक्षक, पालक आणि बालक यांनी आवर्जून वाचावा असाच कथासंग्रह म्हणजे - पॅडीची गोष्ट 
पुढील वाटचालीसाठी उमेश मोहिते सरांना खूप खूप शुभेच्छा...

लेखक -उमेश मोहिते 
प्रकाशन -इसाप प्रकाशन,नांदेड 
प्रथम आवृत्ती -१० ऑगस्ट २०२४ 
मूल्य केवळ- एकशे वीस रुपये फक्त
पुस्तक मागवण्यासाठी फोन -९४०५०७२१५४

समीक्षिका/लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७




मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...