मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Sunday, June 29, 2025

माय मराठी (कविता)

 *माय मराठी*


संस्कृतीचा ठेवा 
माय मराठी
संताची भूमी
माय मराठी.....!!

लोककलेचा आत्मा
महाराष्ट्राची मराठी
दरीखो-यात नाद
घुमतोय मराठी.....!!

माय मराठी
गोड अमृतवाणी
आईची अंगाई
वासुदेवाची गाणी....!!

अमृताची धार
माय मराठी
जीवनाचे सार
गीत-झंकार मराठी....!!

मावळ्यांची हाक मराठी
शिवबाचा जयघोष मराठी
साहित्याचा अनमोल ठेवा
माझी माय मराठी......!!

अटकेपार फडकवला
झेंडा मराठी
जगात दर्जा
अभिजात मराठी......!!

माणसाची आर्त हाक
माय मराठी
दुधावरची घट्ट साय
माझी माय मराठी.......!!

जगात भाषेची शान
माय मराठी
कर्तृत्वाची खाण
माय मराठी......!!

२७ फेब्रुवारी
मराठीदिन साजरा करू
अस्तित्व मराठीचे
दूरदेशी पेरू.......!!

लावण्याची खाणं मराठी
साहित्याचा प्राण मराठी
नामदेव तुका,ज्ञानोबाची
अभंग,गाथा,गीता मराठी...!!

पु.ल.चा जीव मराठी
माडगूळकरांची शान मराठी
पुणेकरांचा सन्मान मराठी
महाराष्ट्राची जाण मराठी....!!

बहिणाबाई, जनाबाईची
ओवी दान मराठी
जिजाऊ,साऊची
महान मराठी......!!

कवितेत माझ्या
प्रकटते मराठी
शब्दांशब्दांत माझ्या
उमटते मराठी......!!

अमृताची धार मराठी
दुश्मनावर तलवार मराठी
शब्दांशब्दात सौंदर्य
भरदार, जोरदार मराठी....!!

कथा,कविता,कादंबरी,
ललित,लेख, अभंगवाणी
लावणी,शृंगार जगात
प्रसिद्ध मराठीची गोड गाणी...!!

मिळावा जगी लौकिक
अभिजात दर्जा मराठी
नसानसांत भिनलाय
दरीखो-यात गर्जा मराठी.....!!

माय मराठी तुझा
मला अभिमान आहे
बोल कौतुके मराठीचे
गुणगान कवितेतून वाहे....!!

सर्व भाषेहून श्रेष्ठ
माझी मराठी सजली
गोड अमृताच्या वर्षावात
सारी दुनिया भिजली....!!

मुकुंदराज,म्हाइंभटांचा थोर वारसा
पु.ल.कुसुमाग्रजांचा उमटला ठसा
भटांची गझल न बहिणाबाईची गाणी
मराठी आमुच्या सदैव जीवनी....!!

अभिजात दर्जा मिळावा
हीच कामना ह्रृदयातूनी
करीते विनवणी माझ्या
आज प्रत्येक शब्दांशब्दांतूनी....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७
मेल mpn1412@gmail.com

Thursday, June 26, 2025

आला आषाढ आषाढ


आला आषाढ आषाढ(२६/६/२०२५)

आला आषाढ आषाढ
आज पहिला दिवस
रोगराई पसरते
पाळा स्वच्छता दिवस...!!

आरोग्याची घ्या काळजी
पाणी उकळून घ्यावं
हात स्वच्छ धुवावेत 
ताजेताजे अन्न खावं ...!!

डास मच्छर होतात
दिवस हे पावसाचे
टापरंटुपरं फेका
जिथे जिथे पाणी साचे...!!

आषाढ तळून घ्यावे
पाणी स्वच्छच रे प्यावे
दारखिडक्याही लावा
साप, डोकावून पाहे...!!

आषाढीच्या एकादशी
वारी विठ्ठलाची भक्ती
नामस्मरणातून मिळे
मानवाला खूप शक्ती...!!

धन्य ते पंढरपूर
सोहळा विठ्ठलाचा भरे
नामघोष विठ्ठलाचा
मन आनंदाने उरे....!!

आला आषाढ आषाढ
हर्ष मानसी होतसे
सुखावून शेतकरी
कर दोन्ही जोडतसे....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
कोकलगाव 

Friday, June 13, 2025

ऐक आतला आवाज

 ऐक आतला आवाज( १३/६/२०२५)

ऐक आतला आवाज
तुला पटलं तेच कर
सांगणारे सांगत असतात
तू सुखाची ओंजळ भर....!!

एका कानाने घे ऐकून
दुसऱ्या कानाने दे सोडून
तुझ्या अंतर्मनाला पटलं तर
तू कर तुझे दोन्ही हात जोडून....!!

चांगलेभले तुला कळतेच
पण जशास तसे वागू नको
तु तुझे चांगले कर्म करत रहा
वेड्यांच्या नादी तु लागू नको....!!

प्रामाणिक रहा तू स्वतःशी
डागेलपणा तू करू नको
इथल्या इथेच आहे सारे
तू तुझा गर्व दाखवू नको....!!

क्षणभंगुर हे जीवन वेड्या
आनंदाने शिक जगायला
इथे रोज नवीन लढाई आहे
तू ही शिक आता लढायला....!!

काळानुसार नाती बदलतात
जग हे स्वार्थी आहे माणसा
तुझ्या आतला आवाज ऐक
तू चांगल्या मार्गाने चाल माणसा...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

Saturday, April 19, 2025

काही माणसं(कवितेत माणसांचे प्रकार)

 *कांही माणसं*
(माणसांचे वेगवेगळे प्रकार)

काही माणसं असतात घातकी
तर काही माणसं विश्वासघातकी
काही माणसं दाखवतात आपुलकी
तर कांहीं माणसांत असते एकी...!!

काही माणसं स्वत:चा टेंभा मिरवणारी
तर कांहीं कर्तव्याकडे पाठ फिरवणारी
कांहीं माणसं एकमेकांचा आदर करणारी
तर कांही माणसं अर्वाच्य भाषेत बोलणारी...!!

कांहीं माणसं असतात फारच गुणी
कधी कधी हेवा वाटणारी
तर कांहीं माणसं असतात तोंड 
पाहून तळवे चाटणारी.......!!

कांहीं माणसं असतात खूप स्वार्थी
कांहीं माणसं उशीरा ओळखता येतात
कांहीं माणसं असतात फारच लाचार
पण सगळे दिवस आपोआप निघून जातात...!!

कांहीं माणसं स्वत:ला मीच भारी म्हणणारी
कांही माणसं स्वाभिमान गहान ठेवणारी
कांहीं माणसं वरून एक आतुन वेगळंच
काही माणसं गांडूळासारखी दोन तोंडी...!!

कांहीं माणसं असतात खूप साधीसुधी
कसलाही गर्व अहंकार नसणारी
देशहितासाठी प्राणार्पण करणारी
कांहीं जिंदादिल कायम खूश असणारी...!!

कांहीं माणसं ध्येयाने पछाडलेली
तर काही माणसं माणसांचं मन वाचणारी
कांहीं माणसं पडद्यामागे नाचणारी
तर काही माणसं आपलं धन जपणारी...!!

कांहीं माणसं असतात आशावादी
काही शून्यातून विश्व निर्माण करणारी
काही माणसं इतरांवर जळणारी
तर कांहीं माणसं इतरांकडून प्रेरणा घेणारी...!!

कांहीं माणसं असतात दुस-या साठी जगणारी
काही असतात आपल्याच भाकरीवर दाळ ओढणारी
कांहीं माणसं असतात स्वाभिमान जपणारी
काही माणसं असतात जीवाला जीव देणारी...!!

काही माणसं असतात मदतीला धावून येणारी
काही माणसं असतात वेळेला बोलून दाखवणारी
कांहीं माणसं असतात माणसांत नसणारी
काही माणसं असतात विनाकारण हानामारी करणारी...!!

*कवयित्री मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

Thursday, April 10, 2025

चिमणी दिनानिमित्त अभंग प्रकार....दारात चिमणी

 दारात चिमणी (अभंग प्रकार) 

धावत पळत | चिमणी येईल |
चोचीत नेईल | चार दाणे ||

ठेवा गार पाणी| जुन्या लोटक्यात |
दाणे एळणीत | चिमणीला ||

आला हो उन्हाळा | त्या उन्हाच्या झळा |  
येवो कळवळा | सर्वांनाच ||

दारात चिमणी | प्रत्येकांने ठेवा ||
चिमणीस मेवा || आवर्जून ||

दिसताच झाडे | ती हिरवीगार |
चिमणीला फार | आवडेल ||

निसर्ग हिरवा | आवडतो तिला |
जपा चिमणीला | सर्वजण ||

 थंडगार पाणी | जे अमृतावाणी |
 पितसे चिमणी | सदाचिया ||

ओळखा पक्ष्यांना | कडक उन्हाळा | 
उन्हाच्या त्या झळा | सोसवेना ||

चिमणी दिनाला  | करा एक पण |
चिमणी आपण | वाचवूया ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

|

Thursday, April 3, 2025

बहीण त्याला कळली नाही (कविता काळजातली)

 *बहीण त्याला कळली नाही*

नम्रपणे बोलण्या जीभ त्याची वळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!

संकटावर मात करण्या उभी राहिली सदैव
हातात घालून हात संकटे पेलत राहीली सदा
खंबीरपणे उभी स्वतः क्षणभरही ढळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!

संघर्षमय जीवन जगत राहीली सदा
झगडत राहीली वाघीण सतत परिस्थितीशी
बिकट परिस्थितीत कधीच ती पळली नाही 
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!

आईसारखीच माया तिची तुझ्याचसाठी 
धूर तुझ्या डोळ्यांत साठला कसला काय माहिती?
मागता क्षणी देत राहीली कधी कुणावर जळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!

ज्याला कळली बहीण तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला
ज्याला कळली बहीण तो सुभद्रेचा कृष्ण झाला
देवकीचे प्रेम मात्र कंसास कधी वळले नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!

मोह,माया,गर्व, अहंकार काय घेऊन बसलास
मरणासन्न त्या आत्म्याला पुन्हा मारत बसलास
एवढी तिची शालिनता कधी मळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!

नाही राहीली भार कुणावर बनली स्वावलंबी
अक्कलहुशारी,अन पुण्य पाठीशी घेऊन
सोबतीला मायबापांचे आशिर्वादाने राहीली
स्वकष्टावर जगली  सदा, कुणा ती भाळली नाही
जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!

माझे माझे म्हणत गेली,आले संकटे झेलत गेली
माहिती होते कुणी नाही कुणाचे वेड्या तरी
मन मारून जगत राहीली अपेक्षा ना कुणाची
मातापित्यानंतर कधी कुणा ती सळली नाही...!!
जीव लावणारी लाखात एक,एकुलती एक 
बहिण त्याला कळली नाही...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...