प्रेम ही एक नैसर्गिक, तारुण्य सुलभावना आहे. आज पर्यंत प्रेमावर अनेक साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालेले आहे. प्रेमामध्ये जात, धर्म, प्रांत, देश-वेश या पलीकडे जाऊन प्रेमाने स्वतःच अस्तित्व निर्माण केले आहे. प्रेमावर जेवढी बंधने लादली गेली तेवढी ती झुगारून प्रेम अधिक घट्ट बनल्याचे अनेक उदाहरणे आहेत. पण याच बरोबर त्याची दुसरी गंभीर बाजू व त्याचे परिणाम याचा विचार आजची तरुण सुशिक्षित पिढी करीत नाही. पूर्वीसारखी परिस्थिती आता जरी राहिली नाही तरी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा अतिशय नाजूक व गंभीर विषय आहे. याच विषयावर आधारित माणसाला माणुसकीची लाज वाटावी अशा क्रूर कौर्याचा पर्दाफाश करणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं?
विदर्भाच्या मातीत जन्मलेले सुप्रसिद्ध कादंबरीकार लेखक संजय महल्ले यांची विज्ञानाधारित कादंबरी काईमेरा, कथासंग्रह गावगप्पा त्यानंतर माणसाला अंतर्मुख करायला लावणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं? ही वाचनात आली आणि अक्षरश: मी वाचन वेडी झाले. हो कादंबरी जो कुणी वाचेल तो वाचक कादंबरी संपल्याशिवाय सोडणार नाही अशी कादंबरी तिचं काय चुकलं? या कादंबरीचे प्रकाशन मेधा पब्लिकेशन हाऊस यांनी प्रकाशित केली असून प्रकाशकच एक उमदा लेखक असू शकतो याची प्रचिती मला आली. या कादंबरीची पहिली आवृत्ती एक जून 2022 रोजी प्रकाशित झाली असून या कादंबरीचे मूल्य केवळ चारशे रुपये असून ही कादंबरी वाचकाला वेळ लावल्याशिवाय राहत नाही इतका खोल मतितार्थ यात लपला आहे.मुखपृष्ठ अतिशय मर्मभेदी व विचार करायला लावणारे आणि वाचकांची उत्सुकता निर्माण करणारे आहे. शैतानाच्या कौर्याला बळी पडलेल्या सर्व भगिनींना ही कादंबरी लेखक संजय म्हल्ले यांनी अर्पण केलीआहे.
आपला भारत देश आज कितीही प्रगत झाला तरी जाती, धर्माची जी कीड देशाला लागली आहे. ती एका आळीप्रमाणे माणुसकीला पोखरत आहे या कादंबरीच्या माध्यमातून लेखक संजय महले यांनी समाजाच्या विकृत, बुरसटलेल्या सैतानाच्या कौर्याचा पर्दाफाश केला आहे. धर्मा धर्मातील दुखऱ्या जाणीवा शब्दबद्ध करताना लेखकाच्या लेखणीने जे परिश्रम घेतले आहे. ते कमालीचे लक्षणिय आहे.कादंबरीचा विषय इतका वेगळा आहे की सहज जिज्ञासा वाढत जाऊन वाचक कादंबरी संपेपर्यंत हातची सोडत नाही.
मनोहर पंत व सुमित्रा यांची मुलगी मानवी देशमुख ही अत्यंत सुसंस्कारित घरातली मुलगी खूप अभ्यासू, करून एम.बी.बी.एस होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि देखणी महत्वकांक्षी असणारी वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकत्यासारख्या शहरात जाऊन वस्तीगृहात शिस्त पाळणारी खूप अभ्यासू. पहिले स्वतःचे करिअर नंतर आवडीनिवडी असणारी खंबीर मुलगी आणि एम.बी.बी.एसच्या शेवटच्या वर्षातच तिचे मन मुस्लिम युवक कबीर मध्ये गुंतत जाते. ती तटस्थ राहून करिअर पूर्ण करते कबीरला ही वैद्यकीय अभ्यास पूर्ण करण्यासाठी मानवी खूप समजावून सांगते पण कबीर त्याच्या अभिनयाच्या आवडीमुळे माघार घेतो.भटकतो, तिला त्याचा वैताग येतो तीही त्याला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून तुझ्या अबूचे स्वप्न पूर्ण कर म्हणून सांगते पण तो तिचा तिच्या सोडत नाही आणि वैद्यकीय शिक्षणात त्याला अजिबात रस नसतो शेवटी तो अभिनयाकडेच वळतो परंतु तो मानवी मध्ये अधिकच गुंतत जातो तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही तू मला नाकारलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरवाईट करून घेईन अशी धमकी कबीर मानवीला देतो. शेवटी मानवी सोबत तो पुण्याला येतो त्यामुळे मानवी ही जन्मदात्या आई-वडिलांचा कसलाही विचार न करता आई-वडिलांचा त्याग करून त्याच्यासोबत कायमची निघून जाते.
कादंबरी मधली नायिका तरुण वयाच्या उंबरठ्यावर असताना ती कबीर सोबत कायमची कोलकात्याला जाते. तिथे तिची जीवाभावाची मैत्रीण जी तिची वस्तीगृहावर रूम पार्टनर होती. ती डॉक्टर चैताली तिला खूप मदत करते. डॉ. चैताली व तिचा नवरा डॉक्टर अविनाश पाटील यांनी मानवीला मोठा आधार दिला. राहायला घर दिलं आणि नंतर मानवी व कबीर च लिगली कोर्टातून लग्नही लावून दिलं कन्यादानही केलं. एक दिवस डॉक्टर चैतालीला ब्रेन ट्यूमर होऊन चैतालीचा अचानक मृत्यू झाला.कोलकत्यासारख्या नवीन शहरात फक्त चैतालीचा आधार असणाऱ्या मानवीला फार एकाकी वाटायला लागतं. नंतर चैतालीच्या नवऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये मानवी जॉब करते, पण त्याचाही मृतदेह एक दिवस विहिरीमध्ये पडलेला दिसतो.त्यानंतर कबीरचा एक्सीडेंट होतो आणि नंतर कबीर सुध्दा मरण पावतो. तेंव्हा मानवीला दिवस असतात अशा भयानक परिस्थितीतूनही डॉक्टर मानवी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते डॉक्टर मानवीला एक मुलगा होतो त्याचं नाव कबीरच्या इच्छेनुसार अब्दुल ठेवते त्यानंतर कबीर चे वडील डॉक्टर मानवीला खूप मदत करतात.नंतर मानवी धर्मांध खलप्रवृत्तीच्या चक्रव्युहात ओढली जाते. अचानक आई वडिलांची खूप आठवण येते पुण्याला मानवी परत येते तर वडील वारलेले समजते आणि आई वेडी होऊन एका वृद्धाश्रमात दाखल झाल्याचे समजतात मानवीचे पाय वृद्धाश्रमाकडे वळतात पण तिची आई तिला ओळखू शकत नाही. इतका जबरदस्त मानसिक धक्का आईला बसलेला असतो तिच्या अंगावर धड कपडेही नसतात. मोठ मोठ्याने मानवी माझी मुलगी डॉक्टर होऊन येईल. बाळा तुझं स्टेथस्कोप खूप घरीच ठेवून का गेलीस? असं म्हणत मोठमोठ्याने स्वतःच्याच गुंगीत राहणारी तिची आई कधी हसते, तर कधी रडते आईला वेड लागलेले पाहून मानवी पूर्णतः हतबल होऊन जाते. परत कोलकत्याला वापस येते त्यानंतर धर्मांध खलप्रवृत्तीच्या चक्रव्युहात ओढली जाऊन धर्मांतर करून घेण्यास नियती भाग पाडते व पुनर्विवाह सारख्या चुकीच्या निर्णयाला बळी ठरते.
मानवीच्या पुनर्विवाह नंतर नवीन जीवनाला सुरुवात झालेली असतानाच तिचा दुसरा नवरा आहे हैदर खूप कपटी स्वभावाचा व्यसनी निघतो त्याचे वडील कासिम व हैदर यांनी जबरदस्ती मानवीचा धर्म बदलवतात. त्यानंतर बुरखा ,घरातली काम, नोकरी सगळं करून मोलकर्णी सारखी वागणूक कासिम सासरा व हैदर नवरा तिला देतात. डॉक्टर मानवी दररोज जिवंत असूनही मेल्यागत जगत असते. पोटच्या गोळ्याला तिला नाईलाजास्तव कबीरचे वडील अबू कडे ठेवावे लागतं. एका आईचं काळीज खूप संवेदनशील पण आणि लेखक संजय म्हणले आणि रेखाटलं आहे. लेखक संजय महल्ले यांनी पात्राला न्याय दिला आहे.काही पात्र मानवी मनाची पकड घेतात भावतात व्याकुळ करतात व अंतिमता सज्जत करतात या कादंबरीत कमालीची घुसमट आहे. घुसमटीचे एक मोठं दडपण स्वीकारत वाचक ही कादंबरी वाचत जातो. लेखकाला हे कौशल्य उत्तम साधला आहे. या कादंबरीचा प्रत्येक व्यक्तीरेखा प्रभावीपणे लेखकाने उभी केली आहे.तेवढी कादंबरी जिवंत होते. जणू कांही वाचकाच्या समोरच सारे घडते आहे. असा भास वाचकाला होतो. म्हणून वाचक शेवटपर्यंत कादंबरी वाचायची सोडीत नाही. कादंबरीचा शेवट खूप भयानक आहे. वाचकाला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. पैसा आणि लालच किती वाईट असतं त्याच पायी डॉक्टर मानवी देशमुख हिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हैदर व कासिम सारखे शैतानाच खरं रूप डॉक्टर मानवीला दिसतं फक्त पैशासाठी हैदर मानवीला फसवून लग्न करतो. धर्म बदलायला भाग पडतो .अन्याय , जोर जुलूम करतो.इतकेच नाही तर शेवटी डॉक्टर मानवीला विकण्याची तयारी करतो. मानवीला शंका येते आणि तिने अबूला फोन करून बोलावून घेते. नशेच्या धुंदीत असलेला हैदर कबीरला मीच मारल्याची ग्वाही देऊन जातो . ते ऐकून मानवीचे होश उडून जातात. शिकल्या सवरलेल्या एम.बी.बी.एस असलेल्या देखण्या करून मुलीच्या आयुष्याचा खेळखंडोबा दोन शैतांनांनी केलेला पाहून वाचकांच्या काळजाचा थरकाप होतो.
एकंदरीत संजय महल्ले यांची ही कादंबरी वैदर्भीय कादंबरीकाराच्या शृंखमालिकेत एक सर्वस्पर्श कादंबरी असून समाजातील वास्तवातील समस्येला हात घालून युवा तरुण पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. एक लहानशी विवेक शून्यता किती मोठे प्रलय आयुष्यात आणू शकते. त्यामुळे जीवन कसे उध्वस्त होतं. तरुण पिढीला दिशादर्शक असणारी ही कादंबरी तिचं काय चुकलं?शेवटी माणसाला विचार करायला लावते. प्रत्येक तरुण पिढीने आवर्जून वाचावी अशीच कादंबरी आहे.
प्रेम जात, धर्म बघून केलं जात नाही पण जाती धर्माच्या नावाखाली एखाद्या स्त्रीचा बळी कसा जातो? तिची कशी अवहेलना होते? याचं भयानक परिणाम सैराट पेक्षाही भयंकर या कादंबरीमध्ये आलेली आहेत. संजय महल्ले यांची ही कादंबरी वाचलेला तरुण जबाबदारीचे भान ठेवून, सजग राहून आपले निर्णय घेतील यात शंकाच नाही. नायिकेच्या संबंध आयुष्याची झालेली होरपळ आणि त्या अनुभवातून तिच्या घायाळ मनाने घेतलेला सावध निर्णय शेवटी आपल्या सारखं आपल्या मुलाचा आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून नायिकेची अतुल्य धडपड वाचकाला खूप काही सांगून जाते. ही कादंबरी वाचताना वाचक हळवा होतो, भारावून जातो, सजग होतो, निर्णय घेतो, भाऊक होतो, हळहळतो, आव्हाने पेलतो, संबंध जोडतो, रडतो, विव्हळतो, वाचकाला प्रत्येक परिस्थितीचा अनुभव येतो. एवढी ताकद लेखक संजय महल्ले यांच्या लेखणीमध्ये दिसून येते.
एका उच्च विद्या विभूषित देखण्या व पायात कमाईची ताकद असणाऱ्या जीवाचा नाहक बळी कसा जातो ? आणि एवढे होऊनही ती सामाजिक उत्तरदायित्वाची हकदार कशी होते? हे मुळात या कादंबरीतून वाचण्यासारखे आहे. लेखक संजय महल्ले यांनी या कादंबरीतून एक मोठा चित्रपटच उभा करतात. मुठभर वाईट लोकांमुळे समाजातील समूहच बदनाम कसा होऊन जातो? सामाजिक स्नेहभावाचे वातावरण गढूळ होऊन जाते. ही कादंबरी सैतानाच्या कौर्याचा पर्दाफाश करणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं? शेवटी वाचकाला हाच प्रश्न पडतो.
तरुणपणाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या तरुण-तरुणींना सजग करणारी, आजच्या सैराट झालेल्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं? प्रत्येक तरुण-तरुणीने आवर्जून वाचावी अशीच आहे.
लेखक संजय महल्ले यांच्या लेखणीला नतमस्तक होऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.
समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
No comments:
Post a Comment