मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Sunday, September 8, 2024

शब्दांतून व्यक्त होणं ...

दि.8/9/2024
 शब्दांतून व्यक्त होणं...

इतकंही सोपं नसतं
शब्दांतून व्यक्त होणं
आतल्या भावनांना
आतल्या आत गुंतवणं...!!

कुठूनतरी आवाज
बाहेर ढकलल्या जातो
आतल्या आत दबल्यावर
भावनांचा कल्लोळ होतो....!!

श्वास गुदरमतोय तसा
गुदमरल्यात होतं
भावनांचं व्यक्त होणं
जरी मनाला बोचतं.....!!

बरं झालं ...बरं झालं देवा
शब्द तरी आहेत सोबतीला
भावनांच्या गुंत्याला अन्
आयुष्याच्या परतीला....!!

शब्दांनीच शब्दांना
हळूवार जपावं लागतं
मनातलं गुपित मग
मनातल्याकडेच खोलावं वाटतं...!!

अवघड आहे बघ गड्या
शब्दांनी शब्दांना समजावणं
कितीही कटुता असली तरी
प्रेम आणि प्रेमच रूजवणं....!!

मग बघा कशी फुलतेय
शब्दांची सुंदर बाग
एका शब्दांच्या फुंकराने
पळून जाईल राग....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो 9767663257


Friday, September 6, 2024

महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित ...

*महाराष्ट्र राज्य शासनाकडून सावित्रीच्या लेकीचा (मिनाक्षी नागराळे) मुंबई येथे गुणगौरव* सन २०२३-२४ चा महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना 5 सप्टेंबर शिक्षण दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील टाटा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट, नरिमन पॉईंट मुंबई येथे मोठ्या दिमाखात साजरा झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब,अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र मा. श्री एॅड राहुल नार्वेकर, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री मंगल प्रभात लोढा, लोकसभेचे सदस्य माननीय श्री अरविंद सावंत, विधान परिषद सदस्य मा. श्री जगन्नाथ अभ्यंकर, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव माननीय आय .ए.कुंदन, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त मा. श्री सुरज मांढरे, वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे शिक्षक आमदार मा. श्री किरणराव सरनाईक तसेच आमदार श्री संभाजीराव थोरात आदी मान्यवरांच्या हस्ते मिनाक्षी नागराळे यांना शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे 17 निकषाद्वारे कठीण पडताळणी जिल्हा व राज्यस्तरावर केली जाऊन नंतर त्याचे मूल्यांकन केले जाते. त्यातूनच छाननी होऊन आदर्श शिक्षक निवडले जातात. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आज पर्यंत वाशिम जिल्ह्यातून प्रथमताच महिला शिक्षिकेची निवड झाल्याने सर्व स्तरातल्या जनसामान्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत आनंद व्यक्त केला. मिनाक्षी नागराळे ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथे कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांच्या शाळेतील त्या पहिल्या महिला शिक्षिका व शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार घेणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका असल्याने महिला वर्गात खूप आनंद झाला. जिल्ह्यातल्या इतर शिक्षिका भगिनींना प्रेरणा मिळाली. मिनाक्षी नागराळे यांनी लॉकडाऊन काळात मुख्यालयी राहून अंगणात शाळा भरवली. शाळा बंद पण शिक्षण सुरू या सदराखाली त्यांनी अनेक शैक्षणिक PDF,PPT, Flip book ,Blog ,youtube channel असे तयार करून त्यावर शैक्षणिक साहित्य निर्माण करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. लोकवर्गणीतूनच शाळेचा कायापालट करत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यामध्ये उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन सोपे जावे यासाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये कोकलगाव जिल्हा परिषद शाळेला साडेसात हजार रुपयाची पुस्तके बक्षिस स्वरूपात मिळाली. प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शनिवार घेतला. तसेच तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहिले हा उपक्रम वाखाणण्याजोगा होता. पक्षी वाचवा, बाल आनंद मेळावा, छोटी सहल, पाणी वाचवा, व्यसनांची होळी, संस्कृतिक कार्यक्रमाची धम्माल, गावकऱ्यांकडून घसरगुंडी, साऊंड सिस्टिम, रोपे,कुंड्या, कचरापेटी, घड्याळ, पूजेचे ताट, महामानवांच्या प्रतिमा इत्यादी भेट स्वरूपात स्वीकारल्या. इतकेच नाही तर आपण प्रत्येक जण समाजाचे, गावाचं, शाळेचं काहीतरी देणं लागतो ही भावना गावातल्या जनमानसात रुजवली आणि शाळेचा पट वाढला. वाशिमला बाहेरगावी इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे आपोआप ओढू लागला. मिनाक्षी नागराळे यांचे हजारो शैक्षणिक व्हिडिओ यूट्यूब चॅनल वर अपलोड असून महाराष्ट्रातील लाखोंनी व्हुज आहेत. ई लर्निंगचा चांगला उपयोग या सर्व गुणसंपन्न प्रतिभा असलेल्या कवयित्री, शिक्षिका, लेखिका असणाऱ्या मिनाक्षी नागराळे यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत. ७० पुस्तकांचे समीक्षण राज्यातल्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित आहे. इतकेच नाही तर 92 व्या व 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या कवितेची निवड झाली आहे.२ वेळा जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत नंबर घेतला. शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती करून १२०० च्या वर व्हिडिओ youtube वर अपलोड केले शैक्षणिक blog निर्मिती करून राज्यभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला. इतकेच नाही तर SCERT पुणे यांच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या वेगवेगळ्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले NCERT कडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.मिनाक्षी नागराळे या वाशिम जिल्ह्यातील शासनाचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका असल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री रामकिसन वाकुडकर सर व शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेश काळबांडे व सर्व शिक्षक वृंद ,गावकरी मंडळी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Wednesday, July 10, 2024

मानवी मनाला कवितेची पालवी फुटणारा काव्यसंग्रह म्हणजे -बहर*

 *मानवी मनाला कवितेची पालवी फुटणारा काव्यसंग्रह म्हणजे -बहर*

धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील प्रसिद्ध कवयित्री माझी मैत्रीण सौ अनुराधा रत्नाकर उपासे तालुका तुळजापूर मु.पो.मंगरूळ यांचा बहर नावाचा काव्यसंग्रह  नुकताच वाचनात आला आणि वाचताना कांही क्षणासाठी स्वतःला विसरून गेले कवयित्री सायन्स ची विद्यार्थिनी असूनही मराठी भाषेची गोडी अवीट आहे. मातृभाषेचा गोडवा मराठीची, माया अपार दिसून येते भाषेतील माधुरी शब्दसौंदर्याने खचाखच भरलेला काव्यसंग्रह म्हणजे बहर.
      बहर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर येथील प्रकाशक श्री प्रवीण भाकरे यांनी प्रकाशित केले असून याची प्रथम आवृत्ती २३ एप्रिल 2022 (95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर, लातूर )येथे प्रकाशित केले असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये असले तरी आपल्या सर्वच कविता मानवी मनाला स्पर्श करून जाणा- आहेत. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ सुदर्शन बारा पात्रे यांनी अतिशय सुंदर नावाला साजेशी असे रेखाटले आहे मुखपृष्ठावर गुलाबी रंगाच्या फुलांचा भर असलेले मुखपृष्ठ वाचकांच्या मनाला पालवी फोडणारे आहे.

             माझं भाग्यच सासर
             सासू आहे जशी माय
             सुख देणारा गं धनी 
             आणि हवे तरी काय...

              वाडा जरी जुना तरी 
             वृक्षवेली भरपूर 
             मिळेल शुद्ध हवा अशी 
              प्राणवायू पुरेपूर....

      कवयित्री अनुराधा उपासे यांनी वरील ओळीमध्ये सुंदर अष्टाक्षरीमध्ये सासरचे गोड कौतुक केलेले आहे. सासर हेच माझं भाग्य. सासू म्हणजे दुसरी आईच असते. आजकाल सासू-सासर्‍यांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या बायकांच्या थोबाडावर जबरदस्त चपराक बसावी असे अंतर्मनाला भिडणारे शब्द आजच्या काळातील कवयित्री अनुराधा उपासे यांनी आपल्या कवितेतून मांडले आहे. आणखीन मला काही नको या शब्दांमधून कवयित्रीच्या मनाचा उदारपणा या ठिकाणी दिसून येतो आजकालच्या काळातील बहुतांश सुना मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली की शहराच्या ठिकाणी जाऊन आलिशान बंगले बांधून आई-वडिलांपासून कोसो  दूर जाऊन राहतात. त्यांना माहिती असतं की आई-वडीलच काय त्यांचं गाव सोडून शहरात राहायला येत नाहीत. आई-वडिलांना  सांभाळायचं काय हवं नको? ते पाहायचं कामच नाही पण याचं काळातील कवयित्री अनुराधा उपासने या शिक्षिका असूनही आपल्या गावाकडील मातीशी घट्ट नाळ जोडून, सासू-सासर्‍यांची सेवा करतात आणि जुन्यात वाड्यात राहतात. उलट त्या म्हणतात वाडा जरी जुना तरी वृक्षवेली भरपूर मिळेल शुद्ध हवा अशी प्राणवायू पुरेपूर गावी भरपूर प्रमाणात वृक्ष असतात त्यामुळे शुद्ध हवा ग्रामीण भागात पुरेपूर मिळते त्यावरील ओळीवरून कवयित्रीला निसर्गाची जाण असल्याचे व वृक्षवेलीवरचे प्रेम दिसून येते

       वेळप्रसंगी बन भाऊराया 
       माझा तू पाठीराखा 
       जसा तारण्यास द्रोपतीला 
       धावला श्रीकृष्ण सखा...!!

       महाभारतामध्ये द्रोपतीचे वस्त्रहरण झाले होते तेंव्हा द्रोपतीची अब्रू राखण्यासाठी श्रीकृष्ण धावून गेले आणि द्रोपतीची अब्रू वाचवली. अगदी त्याचप्रमाणे माझ्या बंधुराया तू सुद्धा माझ्या वेळ प्रसंगी धावून ये.माझा पाठीराखा हो.  असे संवेदनशील मनाच्या कवयित्री सौ.कवयित्री अनुराधा उपासे आहे वरील ओळीतून व्यक्त होताना दिसतात आजच्या काळात कोण कोणाचा भाऊ राहिला नाही. ना बहिणीचे तसे प्रेम राहिले नाही. वहिनी सुद्धा माहेरी हिस्सा टाकताना दिसतात आणि भाऊ सुद्धा बहिणीला साडीचोळी बांगड्या सण, उत्सवाला बहिणीला साडीचोळी करताना दिसत नाहीत.कशीतच असतीलही पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.भावा-बहिणींच्या नात्यांमध्ये स्वार्थ भरलेला दिसत आहे. भाऊ रक्षाबंधनाला बहिणीकडे  जात नाही. बिचारी बहीण वाट बघत बसते.तिचे डोळे वाटेकडेच लागलेले असतात. पूर्वीच्या काळी माहेरवासीनी माहेरी पंचमीच्या सणाला बोलावून आणायचे ते रक्षाबंधन झाल्यावरच बहीण सासरी जायची. ती माया ती ओढ ,ते प्रेम आजच्या काळात राहिलेले नाही हे वास्तव आहे संवेदनशील मनाच्या कवयित्री इथे भाऊ होताना दिसतात व भावासाठी जगातील सर्व सुखदेवाकडे मागतात इतकेच नाही तर माझ्या आई-बाबांना जप म्हणून काव्यातून सांगतात

         कळी पाहता झाडावरची
         मनात अनेक शंका येतात
          काय माहीत कुणास ठाऊक
          कळीची फुले कसे होतात?

          सुगंध सुरेख मिळताच 
           दरवळ साऱ्या आसमंती 
          रहस्य फुलांच्या सुगंधाचे 
          जाणण्या झाली  सुन्न मती...

           निसर्गाचे अद्भुत चक्र माणसाला आजपर्यंत कळले नाही. जसा रात्री नंतर दिवस येतो.दिवसा मागून रात्र. जसे ऋतुचक्र बदलत राहते. पावसाळ्यानंतर हिवाळा. हिवाळ्यानंतर उन्हाळा असे वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येतात. वेगवेगळी फुले येतात. वेगवेगळ्या रानभाज्या येतात. तसेच झाडावरच्या कळीला पाहिल्यावर कवित्रीच्या मनामध्ये कुतुहल निर्माण होते. कळीचे फुल कसे होते? बियांचे कोंब कसे येतात ? त्यानंतर हिरवीगार कळी डोलते खरंच त्यात रंग कोण भरते? सुगंध कोण भरतो ? फुलांच्या सुगंधाच्या रहस्याने कवयित्रीची मती सुन्न झाली. आणि खरंच अख्या जगाला नवल वाटावं. कोड पडावं अशी निसर्गाची किमया आहे. वरील ओळीवरून कवयित्रीला निसर्गाची आवड  व निरीक्षण, निसर्गाबद्दलची गोडी, प्रेम कळून येते.

          सुजलाम सुफलाम 
          देश माझा किती छान 
          अनेक संत येथे जन्मले 
          मिळाले संस्कार महान 

            हा देश शूरवीरांचा
           कीर्ती शौर्याची गाथा
           जवानांनी अर्पिले प्राण
            चरणी त्यांच्या माथा....

          भारत देश हा सुजलाम् सुफलाम् आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या देशात अनेक संत जन्मले. अनेक थोर क्रांतीकारक जन्माला आले. आणि संतामुळे या देशाला चांगले संस्कार मिळाले. हा भारत देश शूरवीरांचा आहे. या देशाच्या संरक्षणासाठी किती जवानांनी हसत हसत आपल्या प्राणांचे आहुती दिली आहे. कित्येक जवान सैनिक देशासाठी शहीद झाले आहेत.कवयित्री अनुराधा उपासे या सर्व भारतीयांच्या चरणी नतमस्तक होऊ पाहत आहेत.

           ये ग ये ग ननंद बाई 
           झाली मला बाई घाई 
           दोघी मिळून जात्यावर 
           ओवी गात दळण दळून...

            हा बहाणा ग दळणाचा 
            सुख दुःख सांगायचा
            वेळ मिळेल बोलायला
            ओव्यातून गाण्याचा....

            ओवी हा एक गेय प्रकार व आपण लक्ष लयीत जाऊ शकतो पूर्वीच्या काही सुमधुर आवाजात स्त्रिया पहाटेच्या वेळी जात्यावर दळण दळताना गायीच्या आज जात्यावरची दळण राहिली नाही ना ओव्या राहिल्या आहेत सर्व जागा यंत्रांनी घेतली आणि मानवाचे शारीरिक श्रम कमी झाले. तसे पुर्वीचे लोकं  शंभरी गाठायचे पण कमी झाले. लोक अल्पायुषी झाले. ओवी मधून संसाराचे सुखदुःख गायले जायचे. ओळीच्या माध्यमातून बायकांचे मनमोकळे व्हायचे. कवयित्री अनुराधाताईंना आजही ओव्या रचता येतात. वरील ओवी मध्ये कवयित्री आपल्या नंदेला दोघी मिळून जात्यावर ओळी दादासाठी आवाज देतात दळण तर हा बहाना आहे. ओवी गाता गाता सुखदुःख सांगायचं तेवढाच बोलायला वेळ मिळे. ओव्याच्या गाण्यातून अशा अनेक ओव्या मधून घरातील वडीलधारी मंडळीची खुशाली पूर्वीच्या बायका सांगत असत. आजच्या काळात बोलण्याची अनेक साधने निघाली पण संवाद मात्र कमी झाला. सुविधा अनेक निघाल्या पण जिव्हाळा आपुलकी कमी झाली हे आजच्या काळातली भयान्वस्त आहे.
        कवयित्री अनुराधा उपासे यांच्या अनेक कविता काळजाला हात घालणा-या आहेत. त्यांच्या बहर या काव्यसंग्रहात अनेक सुंदर सुंदर कवितांचा बहर आला आहे. हे काव्यसंग्रह वाचताना जाणवते. शेतकऱ्याबद्दलचे प्रेम, आपुलकी, नात्यांचा गोतावळा,देशप्रेम, बंधुता बेरोजगारीचे जीवन, निसर्ग, जिजाऊ माँसाहेब , अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले,अनाथांची माय- सिंधुताई  अशा सर्व गुणसंपन्न नारीचा गुणगान गाणाऱ्या कविता वाचकाला चौफेर एखाद्या बगीचा मध्ये फिरवून आणल्यासारखे वाटतात. बहर हा काव्यसंग्रह मनाणाला उभारी तर देणारा आहेस पण बलिदानासारख्या कवितेतून आत्मचिंतन करायला लावणार आहे.प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे बहर....  कवयित्री सो अनुराधा उपासना यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

समीक्षिका/ शिक्षिका /लेखिका/ कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका जिल्हा वाशिम 
पीन - 444505 
मोबाईल 9767663257

Friday, June 14, 2024

शब्दच...

 शब्द


शब्दच करतात घाव

शब्दच देतात आधार

शब्दच खातात भाव

शब्दच घेतात माघार....!!


शब्दच उसवतात नाती

शब्दच बनतात वाती

शब्दच गुणगुणत गाती

शब्दच बनवतात जाती...!!


शब्दच प्रसवतात प्रेम

शब्दच बनतात माया

शब्दच बनतात बंडखोर

शब्दच बनती सुखद छाया...!!


शब्दच ठरतात विरह

शब्दच बनतात सहानुभूती

शब्दच रडवतात माणसाला

येते प्रत्येकास अनुभूती....!!


शब्दच देतात जखमा

शब्दच बनतात मलम

शब्दासारखे शब्दच मऊ

शब्द जणू रेशमी तलम....!!


शब्दच देतात गोडवा

शब्दच बनतात मैत्री

शब्दांना असते शब्दांवरची

जिवापाड खात्री....!!


शब्दांनीच फुटतात अश्रू 

शब्दांनी विसरतात वेदना

शब्दच बनतात तलवार

शब्दांनीच फुटतात संवेदना...!!


शब्दांनीच फुलते बाग

शब्दांनीच होते महाभारत

शब्दांनीच होते रामायण

शब्दांनीच शब्दाला मारत...!!


शब्दच वापरावेत जपून

शब्दच दुधारी शस्त्र

शब्दच बनवते हळवे अन्

शब्दच सभ्येतेचे वस्र...!!


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

कोकलगाव

ता.जि.वाशिम

मो.9767663257




मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...