मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Friday, May 5, 2023

गुणवत्ता विकासाला हातभार लावणारे पुस्तक म्हणजे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम....!!

 गुणवत्ता विकासाला हातभार लावणारे पुस्तक म्हणजे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम

   बीड जिल्ह्याची आदर्श शिक्षिका माझी मैत्रीण जिवाभावाची सखी एका विचारांनी झपाटलेल्या, सावित्रीचा विचारांचा वसा घेतलेल्या, जिजाऊंची प्रेरणा असणाऱ्या माझी सखी श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे/करपे यांची यूट्यूब चैनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला परिचित असणारी धडपडी ,ध्येयवादी शिक्षिका, एक उपक्रमशील शिक्षिका ज्या शाळेत जॉईन झाली ती शाळा शेवटची घटका मोजत होती. बंद पडण्याच्या मार्गावर होती. ढेकनमोहा शाळेला उपक्रमाच्या माध्यमातून जीवनदान देणारी संजीवनी म्हणजे उषा ढेरे.... उषा ढेरे यांचे दुसरे पुस्तक माझ्या हाती आले. मी तर म्हणेल ढेऱ्यांची उषा उपक्रमाची दिशा.
       आज आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी एक ते वीस च्या पटातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. किती शाळा विद्यार्थ्यांच्या विना बंद पडल्या? त्याला कारणीभूत फक्त शिक्षक किंवा पालक नाहीत तर याला कारणीभूत आहे शिक्षणाचे बाजारीकरण, खाजगीकरण, खाजगी शाळा, वेगवेगळ्या गोष्टींचे अमिष दाखवून, सुटा बुटात विद्यार्थी पाहून खेड्यातल्या पालकांनाही वाटायला लागलं की इंग्रजी शाळेत पोरं गेलं म्हणजे मोठा साहेब होईल. डॉक्टर- इंजिनियर होईल. तर असं काही नसतं इंग्रजी शाळा कॉन्व्हेटचं पीक आता डोकं वर काढत आहे.हे पूर्वी इंग्रजी शाळा होत्या का ? खाजगी शाळांची दुकानं, क्लासेस असं काही नव्हतं .तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली मुलं खूप मोठ- मोठ्या अधिकारी पदावर आज कार्यरत आहेत.आय.ए.एस पासून ते आय.पी.एस पर्यंत , डॉक्टर पासून ते इंजिनियर पर्यंत, आमदार पासून ते मंत्रीपदापर्यंत अनेक वेगवेगळ्या पदावर गेलेले अनेक विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन गेलेले आहेत.तेंव्हा पालकांच्या विश्वास होता. आजही ठेवायला हवा. तरच गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे भलं होईल. विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या उषा ढेरे मॅडम यांचे दुसरे पुस्तक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम हे पुस्तक इतर शिक्षकांना दिशा देणारे दिशादर्शकच आहे. असे म्हणण्यास अतिशोयोक्ती वाटणार नाही. मी जवळपास २०१५ सालापासून उषा ढेरे यांना ओळखते. एक हाडाची शिक्षिका म्हणून त्यांचा मला अभिमान वाटतो. आमची भेट अहमदनगरला उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका पुरस्कार सोहळ्यामध्ये झाली होती. पूर्वी खडू फळा, ज्ञानाचा मळा,विद्यार्थ्यांचा गोतावळा असं काहीसं चित्र असायचं. मोबाईलच्या आभासी जगात कोरोना पासून जास्त आलो आणि तंत्रज्ञानाची कला प्रत्येकाला आत्मसात करावी लागली. उषाताईंनी अनेक नवनवीन उपक्रम शाळेत घेतले. त्यांचे व्हिडिओ उषा ढेरे यांच्या यूट्यूब चैनल वर अपलोड केले आणि कोविड काळात त्या युट्युब चॅनेलला जास्त उपयोग महाराष्ट्रातल्या बालचिमुकल्यांना झाला. रसाळ वाणी आणि कृतीत उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला त्यांचा परिणाम म्हणून शाळेचा पट वाढला हे झालं output चला आपण आता त्यांच्या उपक्रमाविषयी थोडं जाणून घेऊया.
       या पुस्तकामध्ये ३० उपक्रम दिलेले आहेत. बऱ्याच शिक्षकांची इच्छा होती की या उपक्रमाचे पुस्तक व्हावं त्याचा उपयोग इतरही शिक्षकांना होईल. विद्यार्थ्यांना एखादी क्रिया किंवा गोष्ट तोंडी सांगून पटकन लक्षात बसत नाहीत. पण तीच गोष्ट जर कृती, गाणी आणि  प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घेतली तर ती जास्त काळ स्मरणात राहते. Activity is the best method in education policy या उक्तीप्रमाणे उषाताईंनी नानाविध उपक्रम आधी स्वतः राबविले मग जगाला सांगितले. त्यांचा पहिला उपक्रम अक्षरावरून शब्द सांगणे. शिक्षक विद्यार्थ्यांना मुळाक्षराचे कार्डच देतील प्रत्येक विद्यार्थ्याला त्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द सांगण्यास सांगतील. जसे कप -कमळ- काळा- केक इ. म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढेल. विद्यार्थी विचार करायला लागेल. त्याच्या बुद्धीला चालना मिळेल. भाषेवरील प्रभुत्व वाढण्यास मदत होईल. शब्दसंग्रह वाढेल. आत्मविश्वास वाढेल अशा अनेक उपक्रमांची नांदी तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. उषाताईंचा २)what is this? 3)in out.४) one many ५) who am I ६)learn with practically ७)what is your name?८) ऐकूया शब्द वाजवूया टाळी असे ३० उपक्रम या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. प्रत्येक उपक्रम हा खूप चांगला आणि गुणवत्तापूर्ण आहे. शेवटी प्रत्येक उपक्रम कसा यशस्वी करायचा? हे त्या शिक्षकाची कल्पकता व नाविन्यता असते. शिक्षक एखाद्या ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करू शकतो. त्यांचे स्वातंत्र्य देखील प्रत्येक शिक्षकाला दिलेले आहेत. काही होतकरू असलेले शिक्षक कमी कालावधीत नवनवीन उपक्रम राबवून त्याचा वेगळाच ठसा उमटवत असतात. आजच्या टॅब आणि मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रतिसाद ऑनलाईन मिळतो आहे. आजची पिढी शिक्षकापेक्षाही पुढे जात असल्याचे आपण पाहतो. अनेक विद्यार्थी पुस्तकांमध्ये असलेला QR कोड स्कॅन करून नवनवीन माहिती बघत असतात. स्मार्ट जमान्यातील स्मार्ट पालकांची, स्मार्ट पिढी  ओळखूनच उषाताईंनी अनेक उपक्रम घेतले व त्याचे व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरतात आणि युट्युब वर प्रचार आणि प्रसार माध्यमांचे केंद्र असल्याने सोशल मीडियावर अनेक जण पाहतात. तेच उपक्रम पुस्तकरूपात आले आहेत. तसे नवनवीन उपक्रम हे प्रत्येक शिक्षकांच्या डोक्यात असतातच फक्त त्याला सातत्याची जोड मिळाली की त्याचं आउटपुट बाहेर पडतो.तेही तितकच खरं. कारण मी पण एक उपक्रम शिक्षिका असल्याने याचा मला याचा अनुभव आहे.
       शिक्षकांचे प्रयत्न,पालकांचे मानसिकता आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेतली तर कोणताही उपक्रम यशस्वी होतोच. फक्त उपक्रम घ्यायला वेळ जास्त लागतो. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. शब्द संपत्ती वाढते.प्रत्येकाला सहभागी होता येते.  वैयक्तिक मार्गदर्शन करता येते. एकाग्रता वाढते. सहकार्याची भावना वाढीस लागते. काही उपक्रम खेळाच्या माध्यमातून असल्याने अभ्यासात  रुची वाढते. उपस्थिति वाढते. असे अनेक फायदे या उपक्रमातून होतात.हे प्रत्येक शिक्षकाने लक्षात घ्यायला हवे आहे. या पुस्तकातील बरेचसे उपक्रम इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील कृतिपुस्तकेत आहेत. चुटकी टाळी असे उपक्रम इयत्ता पहिलीच्या आणि दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात आहेत. प्रत्येक शिक्षकांनी हाताळावे असे पुस्तक म्हणजे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम होय.
       उषाताईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम :-उषा ढेरे 
प्रकाशन :-परिस पब्लिकेशन पुणे 
मुखपृष्ठ:- अरविंद शेलार 
प्रथम आवृत्ती:- 13 सप्टेंबर 2022 
मूल्य :-180 रुपये फक्त

समीक्षिका/शिक्षिका /लेखिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
पीन ४४४५०५
मो.९७६७६६३२५७

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...