मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Saturday, March 7, 2026

मानवी मनाला अस्वस्थ करून वाचनाचा वेग वाढवणारी कादंबरी म्हणजे - काडीमोडातील काटे होय.

 मानवी मनाला अस्वस्थ करून वाचनाचा वेग वाढवणारी कादंबरी म्हणजे -काडीमोडातील काटे 

       विदर्भातले वाशिम जिल्ह्यातील बोरखडी गावचे हल्ली छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक भ. पु. कालवे सर यांची पहिली कादंबरी 'घट रिकामा'  वाचल्यानंतर पुढील कादंबरी वाचनाची उत्सुकता वाचनाचा वेग वाढवणारी प्रतीक्षेत असलेली 'काडीमोडातील काटे' ही दुसरी कादंबरी नुकतीच वाचनात आली. घट रिकामा या कादंबरीचा दुसरा भाग म्हणजे 'काडीमोडातील काटे' ही कादंबरी होय. एका सरळ मार्गे प्राध्यापक असलेल्या शिक्षकाला जीवन जगताना त्यांचा संघर्ष, होणारी ससेहोलपट, चारचौघात जीवन जगताना येणारी आव्हाने, प्रत्येक आव्हानांना तोंड देताना मेताकुटीला येणारा जीव, नोकरी करणाऱ्यांचे कसे हाल होतात? समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, मित्रांनी दिलेली साथ आणि आपल्याच  नातेवाईकांनी केलेला घात या सगळ्यांची उकल करणारी, वाचनाचा वेग वाढवणारी व मानवी जीवनाला अस्वस्थ करून विचार करायला लावणारी कादंबरी म्हणजे  'काडीमोडातील काटे'  होय.
           प्राध्यापक अशोक व त्याची बायको उर्मिला यांच्या संसाराचा न बसलेला ताळमेळ, परिस्थितीशी दोन हात न करण्याचा अट्टाहास, आपापल्या पात्रामध्ये ठामेठोकपणे राहणारी पात्र, समयाशी जुळवा जुळव न करता येणारं जोडपं, त्यामध्ये त्या चिमुकल्या बाळाची होणारी परवड वाचताना माणूस म्हणून विलक्षण अस्वस्थ होतो. 
          काडीमोडातील काटे वाचताना अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत. वाचकाची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत टिकून राहते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्राध्यापक अशोक यांना सात वर्षात ९ वेळा घरं बदलावी लागतात. त्यामुळे वैतागून गेलेला अशोक शेवटी स्वतःच्या घरासाठी पैशाची जुळवाजुळ करून शेवटी स्वतःच्या घरात राहायला जातो. त्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते पण नवीन घरांमध्ये सुद्धा अशोक व उर्मिलाचे वाद  कांहीं थांबत नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांचे रोज वाद होत. कित्येक वेळा ते वाद विकोपाला गेले होते. त्यामुळे प्राध्यापक आशोकने उर्मिला पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जुडीसीएल सेपरेशन साठी अॅड . विजय मोठे यांच्याकडे जाऊन घटस्फोटाची केस दाखल करतात त्यामुळे आयुष्याचा एवढा मोठा निर्णय प्राध्यापक आशोक घेताना एखाद्या अग्नि कुंडात होरपळल्यासारखा अनुभव घेतात. छोट्या बाल सुकन्येला सोडून जाताना एका बापाची होणारी तळमळ या कादंबरीतून दिसून येते. नवरा बायकोच्या संसारी घरगुती भांडणाची ही झालेली सुरुवात शेवटी कोर्टकचेरीत पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामध्ये उर्मिलाचे बाळाला बाथरूम मध्ये कोंडणे, घटस्फोट नको म्हणून अंगावर रॉकेल ओतून घेणं, सतत घरात भांडण करणं आणि दोघांनीही पोटच्या गोळ्याचा म्हणजे त्या चिमुकलीचा विचार न करणं हे सगळं आधाशा सारखं वाटतं. एक माणूस म्हणून विचार न करणारे हे जोडपं वाचकाला मात्र नक्कीच विचार करायला लावतो. 
     चार भिंतीच्या आतलं भांडण हे कोर्टात गेलं होतं. उर्मिला आणि अशोकच भांडण खूप पुढे गेलं होतं. त्यांना कशाचीही तमा राहिली नव्हती. राजाराणीसारखं  सुखाचा संसार करणारे पती-पत्नीचे प्रेम नावालाही शिल्लक राहिले नव्हतं. अशा परिस्थितीमध्येही अशोकला आशा होती की आपण एकदा उर्मिलाचा पिच्छाच सोडून टाकावा आता एकत्र राहण्यात मज्जा नाही. मनाने दुभंगलेली ही दोन जीवं तिसऱ्या जीवाचा पण विचार करायला तयार होत नव्हती. शिक्षकी पेशातल्या प्राध्यापकाला इतक्या कोर्टकचेऱ्या, कोणत्या नातेवाईकाची करावी लागली विनंती, झालेला त्रास, लागलेला पैसा आणि वाया गेलेला वेळ व वाढलेला डोक्याचा ताण अगदी मन विषन्न करतं या संपूर्ण प्रक्रियेत काडीमोड करण्यासाठी मनाभावापासून सामील असणारे दुलंगे सर, चिंचाणे सर , डॉक्टर श्रीधर हिंगे, तहसीलदार पाटील साहेब, सरपंच शामरा गावंडे, ए.पी.आय वाळवे, कॉन्स्टेबल साखळे, अॅडवोकेट गवशे, अॅडवोकेट रावराणे, अॅडवोकेट लाखोबा लोखंडे, साखळी अॅडव्होकेट गवशे ,  अॅंडवोकेट रावराणे, अॅडवोकेट पाल्हेटकर , अॅडवोकेट हातने , एएसआय खानापुरे, इंजिनियर कोराने साहेब , अॅडव्होकेट ट आर्वीकर, अॅवोकेट देव उमरखेडकर , अॅडव्होकेट.केट बारणे, एडवोकेट गजाणे तसेच उर्मिलाची वडील आणि उर्मिलाची मैत्रीण राज्यांमध्ये हावरे हे सर्व यामध्ये प्रमुख भूमिका निभावतात या सगळ्या प्रकारात अशोकला फाडून खाणारे पोलीस , प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक जण पैसेच मागत होता. कुत्र्यांना एक एक तुकडा टाकावा तसं प्रत्येक पोलिसांना वेगळे पैसे आणि वकिलांची वेगळी फेज त्यामध्ये होणारा मनस्ताप यानेच अशोक चक्राहून गेला होता . कधी एकदा काडीमोड होईल यास प्रतिक्षित राहणारा अशोक फार उदासीन होता या सगळ्या तानात पोलिसांनी मागितलेली पार्टी टेबलाखालून मागितलेली रक्कम आणि पावलो पावलाला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी लुबडणारे पोलीस आणि वकील यांच्यामध्ये हतबल झालेला अशोक मात्र हरवून गेला होता. 
          एकंदरीत शिक्षकेपेक्षा असणाऱ्या अशोकला जेवढी सुज्ञ, सुशिक्षित , सुसंस्कारित पत्नी मिळायला हवी होती ती मिळालीच नाही.गुण सुरुवातीला उर्मिलाने दिलेल्या चार कवितेमुळे अशोकला समजल्यास नाहीत म्हणून कुणाच्या कवितेवरून त्याची मूळता विचार सुसंस्करित असतीलच असे नाही काडीमोडातील काटे या कादंबरीला असेच इतका गहन प्राध्यापक व पुकालवे यांनी मांडला आहे की शेवटी काय झालं असेल अशी उत्सुकता वाचकाला लागून राहते त्यामुळे कादंबरीवर वाचनाचा वेग आपोआप वाढल्याशिवाय राहत नाही . शेवटी गाडी मोडं  होऊन नकारात्मक तिकडेच कडून सकारात्मक तिकडे भरपूर कालवे यांनी हा प्रवास अगदी सोयीस्कर रित्या आपल्या लेखन शैलीने या कादंबरीच्या माध्यमातून मांडला आहे प्रत्येक वाचकाला अतुन अस्वस्थ करणारे, कादंबरी वाचकाला वेड लावते सर्वांनी आवर्जून वाचावी अशीच ही कादंबरी प्राध्यापक भ.पु. कालवे यांना 
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 

कादंबरी - काडीमोडातील काटे 
लेखक -भ. पु. कालवे 
प्रकाशक- उत्कर्ष प्रकाशन 
पहिली आवृत्ती ३ नोव्हेंबर 2024 
पुस्तक मागविण्यासाठी फोन नंबर- 7263975516 


समीक्षिका लेखिका शिक्षिका कवयित्री 
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
(महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने पुरस्कृत)
 तालुका जिल्हा वाशिम
Mob.- 9767663257

Thursday, March 5, 2026

पाखरांची भरे शाळा (अष्टाक्षरी)

 पाखरांची भरे शाळा ५/३/२०२६

नभी सूर्य येता वर
पाखरांची भरे शाळा 
चिव करत चिमणी
लाविते बाळास लळा....!!

दारी अंगणात बाई
खरकटे गे सांडले
एक एक कण घेई
जीव झाडाले टांगले....!!

दाणा चोचीत टिपते 
भरवी पिल्लांना घास 
माय आणील चोचीत
छोट्या पिल्लांना ती आस...!!

पंख येता गे पिल्लांना
होई जीव वरखाली 
बळ पंखात भरते 
आई खरी रखवाली....!!

पिल्लांसाठी जीव तिचा
त्याच घरट्यात राही
दाणे आणील चोचीत 
छोटी पिल्लं  वाट पाही....!!

ठेवा अंगणात पाणी 
टाका अंगणात दाणे 
चिमुकल्या पावलांनी 
सुरू पक्षाचे टिपणे....!!

एक घास रे काऊचा
एक घास रे चिऊचा 
हरवून गेले कसे 
बंगल्यात आज गाणे....!!

नाही अंगण राहिले 
नाही पक्ष्यांची ती गाणी
कुठे हरवली आज 
सांगा किलबिल वाणी?

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
 जांभरून नावजी, वाशिम 

Monday, March 2, 2026

असा एक रंग (कविता)

 असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता)

असा एक रंग संस्कारांचा 
आचरणातून दिसावा
रूसवा फुगवा इथे मात्र 
कुणाला कुणाचा नसावा....!! १!!

असा एक रंग 
निर्मळ मनाचा असावा
ह्रदयात शिरूर हळूच
ठाव काळजाचा घ्यावा.....!!२ !!

असा एक रंग 
सा-या जगाला दिसावा
भेदाभेद करूनी उगीच
मोठेपणा,खोटपणा नसावा...!! ३ !!

असा एक रंग 
मायेचा तोलावा जपावा
माणसातला माणूस शोधताना
तिथे ओलावा असावा.....!! ४!!

असा एक रंग
उदार त्यागाचा असावा
डोळ्यांवरचा विश्वास 
कानावरती नसावा......!! ५ !!

असा एक रंग 
ख-याखु-या श्रमाचा असावा
मेहनतीचे खास खाताना 
समाधानाचा असावा....!! ६!!

असा एक रंग
माणसाचा रंग ओळखणारा असावा 
बेगडी या दुनियेत 
स्वार्थाने बरबटलेला नसावा....!! ७ !!

असा एक रंग 
सदा माणुसकीचा असावा
कुणाला कुणी दुखवण्याच्या 
कसला हेतू नसावा.....!! ८ !!

अशा या होळीच्या सर्वांना 
हार्दिक शुभेच्छा....🌹🌹🌹 
कवयित्री 

Sunday, March 1, 2026

https://youtu.be/RpWKh0gRZ6c?si=wAGRN-b3Up4oNDkI

माझ्या मराठीची शान ...

 स्पर्धेसाठी 
साहित्य सेवा प्रकाशन आयोजित काव्य स्पर्धा
दिनांक -२७/२/२०२६
विषय - मराठी भाषा गौरव दिन

शीर्षक - माझ्या मराठीची शान

माझ्या मराठीची शान ,दऱ्याखोऱ्यात नांदते 
बोल मराठीचे श्लोक, तुका, ज्ञानोबा बोलते ...||

माझ्या कवितेला साज, शब्द मराठी लावते 
 बोल मराठीचे थेट, काळजाला हो भिडते....|| 

 माझी बहीणाई, जनी, ओवी जात्यावर गाते 
धमन्याधमन्यातही, माय मराठी वाहते....|| 

 ओवी,भारुड, पोवाडा, साज शृंगारही घेते 
बोल बोबडेही बाळ,  शब्द मराठीत येते...||

बोल कीर्तनाचे रंगी,  साज मराठी लावते 
बोल मराठीचे मृदू , नित्य मनाला भावते ....||

गीत, गझल सुंदर, शब्द झंकार मांडते 
शिवशंभु संस्कारीत, शब्द मोती हे सांडते ...||

माझ्या मराठीची शान, दाही दिशा नित्य गाजे 
माझ्या मराठीचा डंका, साऱ्या जगात हो वाजे....||

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
वाशिम

आदरणीय अनिल पाटील सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

 आदरणीय अनिल पाटील 
 सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..


सदा हसरे व्यक्तिमत्व 
सदा आनंद चेह-यावर
दिलखुलास मनाचा राजा
स्पष्टपणे बोलण्यावर भर....!!

अजातशत्रू स्पष्टवक्तेपणा
देवालाही तोच आवडला 
शाळेवरून येता येता 
कसा काय तो काळ भिडला....?!!

स्वतःहून बोलत इतरांना 
नव्हता कधी कसला गर्व 
शेवटच्या प्रवासाला घाई का 
अन्  दुःखात बुडले सर्व....!!

ताईसाहेब म्हणून हाक तुमची
ऐकू येईल सदा कानी
हरवून गेली अचानक 
अनिल पाटलांची मंजुळ वाणी....!!

निशब्द झालोत आम्ही 
काय बोलावे ते सुचेना
बातमी ऐकून बैचेन झाले अन् 
वास्तव काही रूचेना....!!

असा कसा देवा तू निष्ठूर झालास
निमित्त मात्र बैलाचे केलास
सोन्यासारखा माणूस का मग
आमच्यातून हिरावून नेलास....!!

ताईसाहेबांकडून भावपूर्ण श्रद्धांजली...
मिनाक्षी नागराळे वाशिम 

Friday, February 27, 2026

राजमाता जिजाऊंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा अवलिया म्हणजे श्री महेश देवळे सर

 *राजमाता जिजाऊंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा अवलिया म्हणजे महेश देवळे सर*

       महेश देवळे सर एक उत्तम सूत्रसंचालन करणारे, सदैव चेहऱ्यावर स्मितहास्य करत आपल्या मधुर वाणीतून प्रेक्षकांचे मन जिंकणारे दिलखुलास व्यक्तिमत्व होय. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या कन्येचा नामकरण सोहळा व वाढदिवस अभिष्टचिंतन आणि वाशिम नगरीतल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा सरांनी आयोजित केला होता. 
        आजच्या आधुनिक युगात, मॉडर्न युगात वाढदिवस म्हणले की केक, हार,फुगे,हॉटेल्स बुक करणे, फटाक्यांची अतिशबाजी वगैरे वगैरे मोठ्या धुमधडाक्यांनी  साजरे केले जातात. पण या सगळ्या विचारांना फाटा देत राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचे विचार मराठा सेवा संघाच्या माध्यमातून नसानसात भिनलेले श्री.महेश देवळे सरांनी मुलींचे फक्त नांवच जिजाऊ न ठेवता जिजाऊंचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविले ते म्हणजे त्यांची कन्या तिचे नाव सरांनी जिजाऊ ठेवले. फक्त नावच नाही तर पुरोगामी विचारांना फाटा देत नामकरण सोहळा आयोजित केला या सोहळ्याची सुरुवात सुरसंगीत जिजाऊ वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती सुरेखाताई आरू (विभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड) प्रमुख उपस्थिती सौ. अन्नपूर्णाताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा)  होत्या.जिजाऊ वंदना झाल्यानंतर महेश देवळे सरांच्या मुलींचा म्हणजे कु.जिजाऊ महेश देवळे हिचा नामकरण करण्यात आले...त्यानंतर पाळणा गायनासाठी  जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका कार्यकारिणीच्या भगिणी यांनी जिजाऊ पाळणा गायला ...सुगमसंगीताने प्रेक्षकांची मने जिंकली.तसेच जिजाऊ वंदना सौ सुनिता कढणे,वैशाली बुंधे यांनी जिजाऊ वंदनेचे गायन केले. जिजाऊं वंदना झाल्यानंतर जिजाऊंची रांगोळी अतिशय सुंदर कु.सदिच्छा दत्ता वरखडे यांनी अप्रतिम सुंदर रांगोळी मॉंसाहेब जिजाऊ यांची काढली तर संचालन कु. माधुरी बहादुरे यांनी केले. 
     छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचे विचार फक्त सांगून किंवा ऐकून गप्प न बसता प्रत्यक्ष  कृतीतून उतरावत श्री महेश देवळे सर यांनी ' न भूतो न भविष्यती ' असा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेऊन तो समाजसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.तो म्हणजे वाशिम नगरीतल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला. यामध्ये शिक्षण, राजकारण, समाजकारण, आरोग्य व साहित्य अशा विविध क्षेत्रातील एकूण दहा महिलांचा गुणगौरव स्मृतिचिन्ह शाल देऊन जुनी आयुडीपी मध्ये करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षण व साहित्य यामध्ये मीनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका तसेच उपक्रमशील शिक्षिका व साहित्यिक कवयित्री शिक्षिका ), राजकारण सौ. अन्नपूर्णा ताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष) व सौ पूजा विनोद खंडेलवाल (लोकप्रतिनिधी) आरोग्य- डॉक्टर वैशाली चौधरी व डॉक्टर अर्चनाताई रेघाटे (रुग्णसेवा ), समाजकारण- सो सुरेखाताई आरू सौ. सविताताई बोरकर (जिजाऊ ब्रिगेड वाशिमच्या जिल्हाध्यक्ष) साहित्य - सौ मधुरानी बनसोड (साहित्य )तसेच नवोदित लेखिका-ज्योतीताई देशमुख अशा सर्व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यांना सन्मानचिन्ह, शाल देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सोहळा व वाढदिवसानिमित्त महिलांचा गुणगौरव करण्यासाठी फक्त राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचे विचारच नाहीत तर माणसाचं मन,मनगट,मेंदू सशक्त असावं लागतं इतकंच नाही तर मनही मोठं असावं लागतं. अशा या महेश देवळे सरांच्या कार्याला मानाचा मुजरा... समाजातील लोकांनी सरांचा आदर्श घ्यावा असाच कार्यक्रम महेश देवळे सरांनी केला त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 


लेखिका, कवयित्री समिक्षिका,शिक्षिका,संपादिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम 
(महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित)

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...