*कामगार (अभंग क्र.७)*
मी रे कामगार | भाकरीची चिंता ||
दिवस निघता | चिंतातुर || १||
उपासमारीची | येते कधी वेळ||
नशिबाचा खेळ | असतो का ||२||
नको टाळेबंदी | कामधंदा नाही ||
जीवघेणी लाही | जीवनाची ||३||
हाती काम गेले | गावच गाठले ||
खूप हाल झाले | गरीबांचे ||४||
कारखाने बंद | कामगार दुःखी ||
नाही घास मुखी | लेकरांच्या ||५||
नाही कुणा चिंता | शासन निष्ठूर ||
जिणे ते फितुर | होई मग ||६||
काळजीचा फास | आवळतो गळा ||
जमे गोतावळा | काय कामी ||७||
करावी मदत | कधी एकमेका ||
आयुष्याचा झोका | थांबवावा ||८||
कामगार खाई | कष्टाची शिदोरी ||
क्रूर चेष्टा करी | काळवेळ ||९||
मिनु म्हणे ऐक | खरा तो श्रमिक ||
तोच रे धनिक | राष्ट्राचिया ||१०||
कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
No comments:
Post a Comment