प्रेम ही एक नैसर्गिक, तारुण्यसुलभ भावना आहे. आजपर्यंत प्रेमावर अनेक साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालेले आहे. जात, धर्म, प्रांत, देश-वेश या पलिकडे जाऊन प्रेमाने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. प्रेमावर जेवढी बंधने लादली गेलीत तेवढी ती झुगारून देऊन प्रेम अधिक घट्ट बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण याच बरोबर त्याची दुसरी गंभीर बाजू व त्याचे परिणाम याचा विचार आजची तरुण सुशिक्षित पिढी करताना दिसत नाही. पूर्वीसारखी परिस्थिती आता जरी राहिलेली नाही तरी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा अतिशय नाजूक व गंभीर विषय आहे. याच विषयावर आधारित माणसाला माणुसकीची लाज वाटावी अशा क्रूर क्रौर्याचा पर्दाफाश करणारी कादंबरी म्हणजे ‘तिचं काय चुकलं?’
विदर्भाच्या मातीत जन्मलेले सुप्रसिद्ध कादंबरीकार संजय महल्ले यांची विज्ञानाधारित कादंबरी ‘काइमेरा’, वर्हाडी कथासंग्रह ‘गावगप्पा’ त्यानंतर माणसाला अंतर्मुख करायला लावणारी कादंबरी म्हणजे ‘तिचं काय चुकलं?’ ही वाचनात आली आणि अक्षरश: मी वाचनवेडी झाले. ही कादंबरी जो कुणी वाचेल तो वाचक कादंबरी संपल्याशिवाय सोडणार नाही, अशी ही कादंबरी ‘तिचं काय चुकलं?’ या कादंबरीचे प्रकाशन मेधा पब्लिकेशन हाऊस यांनी प्रकाशित केली असून प्रकाशक हा एक उमदा लेखक सुद्धा असू शकतो याची प्रचिती मला आली. या कादंबरीची पहिली आवृत्ती एक जून 2022 रोजी प्रकाशित झाली असून ही कादंबरी वाचकाला वेळ लावल्याशिवाय राहत नाही इतका खोल मतितार्थ यात लपला आहे. मुखपृष्ठ अतिशय मर्मभेदी व विचार करायला लावणारे आणि वाचकांची उत्सुकता निर्माण करणारे आहे. सैतानांच्या क्रौर्याला बळी पडलेल्या सर्व भगिनींना ही कादंबरी लेखक संजय महल्ले यांनी अर्पण केली आहे.
आपला भारत देश आज कितीही प्रगत झाला तरी जाती, धर्माची कीड माणुसकीला पोखरत आहे. या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने समाजातील विकृत अशा सैतानांच्या क्रौर्याचा पर्दाफाश केला आहे. धर्मा-धर्मातील दुखर्या जाणीवा शब्दबद्ध करताना लेखकाच्या लेखणीने जे परिश्रम घेतले आहेत. ते कमालीचे लक्षणीय आहेत.कादंबरीचा विषय इतका वेगळा आहे की सहज जिज्ञासा वाढत जाऊन वाचक कादंबरी संपेपर्यंत हातची सोडत नाही.
मनोहरपंत व सुमित्रा यांची मुलगी मानवी देशमुख ही अत्यंत सुसंस्कारित घरातली देखणी मुलगी. अभ्यास करून ती एम.बी.बी.एस होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि महत्वकांक्षी असणारी मानवी वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकत्याला जाऊन वस्तीगृहात राहते. प्रथम स्वतःचे करिअर नंतर आवडीनिवडी अशा विचाराची ही खंबीर मुलगी आणि एम.बी.बी.एस.च्या तिसर्या वर्षात असतानाच मुस्लिम युवक कबीर मध्ये गुंतत जाते. परंतु तरीही ती तटस्थ राहून आपले शिक्षण पूर्ण करते. परंतु कबीर त्याच्या अभिनयाच्या आवडीमुळे माघारतो.भटकतो. तिला त्याचा वैताग येतो. ती त्याला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून तुझ्या अबूचे स्वप्न पूर्ण कर म्हणून सांगते. पण तो तिचा पिच्छा सोडत नाही आणि वैद्यकीय शिक्षणात त्याला अजिबात रस नसतो. शेवटी तो अभिनयाकडेच वळतो. परंतु तो मानवी मध्ये अधिकच गुंतत जातो. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू मला नाकारलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरवाईट करून घेईन अशी धमकी कबीर मानवीला देतो. शेवटी मानवी सोबत तो पुण्याला येतो. पुढे मानवी जन्मदात्या आई-वडिलांचा कसलाही विचार न करता त्याच्यासोबत कोलकात्याला कायमची निघून जाते.
कादंबरी मधली नायिका तरुण वयाच्या उंबरठ्यावर असताना ती कबीर सोबत कायमची कोलकात्याला जाते. तिथे तिची जीवाभावाची मैत्रीण, जी तिची वस्तीगृहावर रूम पार्टनर होती, ती डॉ.चैताली तिला खूप मदत करते. डॉ. चैताली व तिचा नवरा डॉ.अविनाश पाटील यांनी मानवीला मोठा आधार देतात. राहायला घर देतात आणि नंतर मानवी व कबीरचं कोर्टातून लग्नही लावून देतात. कन्यादानही करतात. एक दिवस डॉक्टर चैतालीला ब्रेन ट्यूमर होऊन चैतालीचा अचानक मृत्यू होतो.कोलकत्यासारख्या नवीन शहरात फक्त चैतालीचा आधार असणार्या मानवीला फार एकाकी वाटायला लागतं. नंतर चैतालीच्या नवर्याच्या हॉस्पिटलमध्ये मानवी जॉब करते, पण त्यांचाही मृतदेह एक दिवस विहिरीमध्ये पडलेला दिसतो. त्यानंतर कबीरचा एक्सीडेंट होतो आणि नंतर कबीर सुध्दा मरण पावतो. तेव्हा मानवीला दिवस असतात. अशा भयानक परिस्थितीतूनही डॉ. मानवी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. डॉ. मानवीला एक मुलगा होतो. त्याचं नाव कबीरच्या इच्छेनुसार अब्दुल ठेवते. त्यानंतर कबीरचे वडील मानवीला खूप मदत करतात. नंतर मानवी धर्मांध खलप्रवृत्तीच्या चक्रव्युहात ओढली जाते. अचानक आई-वडिलांची खूप आठवण येते. पुण्याला मानवी परत येते तेव्हा वडील वारल्याचे समजते आणि आई वेडी होऊन एका वृद्धाश्रमात दाखल झाल्याचे समजताच मानवीचे पाय वृद्धाश्रमाकडे वळतात. पण तिची आई तिला ओळखू शकत नाही. इतका जबरदस्त मानसिक धक्का आईला बसलेला असतो की तिच्या अंगावर धड कपडेही नसतात. ती मोठ-मोठ्याने ‘‘बाळा तुझं स्टेथस्कोप तू घरीच ठेवून का गेलीस?’’ असं म्हणत स्वतःच्याच गुंगीत कधी हसते, तर कधी रडते. आईला वेड लागलेले पाहून मानवी पूर्णतः हतबल होऊन जाते. परत कोलकत्याला वापस येते. त्यानंतर धर्मांध खलप्रवृत्तीच्या चक्रव्युहात ओढली जाऊन धर्मांतर करून घेण्यास नियती भाग पाडते व पुनर्विवाह सारख्या चुकीच्या निर्णयाला बळी ठरते.
मानवीच्या पुनर्विवाह नंतर नवीन जीवनाला सुरुवात झालेली असतानाच तिचा दुसरा नवरा हैदर खूप कपटी स्वभावाचा व्यसनी निघतो. त्याचे वडील कासिम व हैदर मानवीचा धर्म बदलवतात. त्यानंतर बुरखा ,घरातली काम, नोकरी सगळं करून मोलकणीसारखी वागणूक कासिम व हैदर तिला देतात. डॉ. मानवी दररोज जिवंत असूनही मेल्यागत जगत असते. पोटच्या गोळ्याला तिला नाईलाजास्तव कबीरचे वडील अबूकडे ठेवावे लागते. एका आईचं काळीज खूप संवेदनशील मन लेखक संजय महल्लेे यांनी रेखाटलं आहे. त्यांनी पात्राला यथोचित न्याय दिला आहे. त्यामुळेच पात्रे मनाची पकड घेतात, भावतात, व्याकुळ करतात व अंतिमता सजग करतात. या कादंबरीत कमालीची घुसमट आहे. घुसमटीचे एक मोठं दडपण स्वीकारत वाचक ही कादंबरी वाचत जातो. लेखकाला हे कौशल्य उत्तम साधले आहे. या कादंबरीची प्रत्येक व्यक्तीरेखा प्रभावीपणे लेखकाने उभी केली आहे. जणू काही वाचकाच्या समोरच सारे घडते आहे, असा भास वाचकाला होत राहतो. म्हणून वाचक शेवटपर्यंत कादंबरी वाचायची सोडीत नाही. कादंबरीचा शेवट खूप भयानक आहे. वाचकाला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. पैसा आणि लालच किती वाईट असतं, त्याच पायी डॉ. मानवी देशमुख हिला आपल्या जाळ्यात ओढून हैदर व कासिम सारखे सैतान तिला फसवतात. धर्म बदलायला भाग पडतात. अन्याय, जोर जुलूम करतात. इतकेच नाही तर शेवटी डॉ. मानवीला विकण्याची तयारी करतात. मानवीला शंका येते आणि ती त्यातून कशी सुटते? कबीरचा मृत्यू कसा होतो ? हे सारे लेखकाच्या खास शैलीत कादंबरीतूनच वाचले पाहिजे. शिकल्या सवरलेल्या एम.बी.बी.एस असलेल्या देखण्या तरुण मुलीच्या आयुष्याचा खेळखंडोबा दोन सैतांनांनी केलेला पाहून वाचकांच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही.
एकंदरीत संजय महल्ले यांची ही कादंबरी वैदर्भीय कादंबरीकाराच्या शृंखमालिकेत एक सर्वस्पर्श कादंबरी असून समाजातील वास्तवातील समस्येला हात घालून युवा तरुण पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. एक लहानशी विवेकशून्यता किती मोठे प्रलय आयुष्यात आणू शकते. त्यामुळे जीवन कसे उध्वस्त होते. तरुण पिढीला दिशादर्शक असणारी ही कादंबरी ‘तिचं काय चुकलं?’ शेवटी माणसाला विचार करायला लावते. तरुण पिढीने विशेषत: तरुण मुलींनी ही कादंबरी आवर्जून वाचावी असे मी आग्रहाने सांगेन.
प्रेम हे जात, धर्म बघून केले जात नाही, परंतु जाती धर्माच्या नावाखाली एखाद्या स्त्रीचा बळी कसा जातो? तिची कशी अवहेलना होते? याचे भयानक परिणाम ‘सैराट’ ह्या चित्रपटापेक्षाही भयंकर या कादंबरीमध्ये दर्शविलेले आहेत. संजय महल्ले यांची ही कादंबरी वाचलेला तरुण जबाबदारीचे भान ठेवून, सजग राहून आपले निर्णय घेतील यात शंकाच नाही. नायिकेच्या संबंध आयुष्याची झालेली होरपळ आणि त्या अनुभवातून तिच्या घायाळ मनाने शेवटी घेतलेला सावध निर्णय, आपल्या सारखं आपल्या मुलाचं आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून नायिकेची अतूल्य धडपड वाचकाला खूप काही सांगून जाते. ही कादंबरी वाचताना वाचक हळवा होतो, भारावून जातो, सजग होतो, भाऊक होतो, हळहळतो, रडतो, विव्हळतो. वाचकाला प्रत्येक परिस्थितीचा अनुभव येतो. एवढी ताकद लेखक संजय महल्ले यांच्या लेखणीमध्ये दिसून येते.
एका उच्चविद्या विभूषित देखण्या व पायात कमाईची ताकद असणार्या जीवाचा नाहक बळी कसा जातो ? आणि एवढे होऊनही ती सामाजिक उत्तरदायित्वाची हकदार कशी होते? हे मुळात या कादंबरीतून वाचण्यासारखे आहे. लेखक संजय महल्ले या कादंबरीतून एक मोठा चित्रपटच उभा करतात. मुठभर वाईट लोकांमुळे समाजातील एखादा समूहच कसा बदनाम होऊन जातो? सामाजिक स्नेहभावाचे वातावरण कसे गढूळ होऊन जाते ? ह्याचे मार्मिक विवेचन करून सैतानाच्या क्रौर्याचा पर्दाफाश करणारी कादंबरी म्हणजे ‘तिचं काय चुकलं?’.
तरुणपणाच्या उंबरठ्यावर असणार्या तरुण-तरुणींना सजग करणारी, आजच्या सैराट झालेल्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही कादंबरी प्रत्येक तरुण-तरुणीने आवर्जून वाचावी अशीच आहे.
लेखक संजय महल्ले यांच्या लेखणीला नतमस्तक होऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.
तिचं काय चुकलं ? (कादंबरी)
लेखक- संजय महल्ले
प्रकाशक- मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती
पृष्ठे 260/ मूल्य रु. 400/-
-मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.9767663257
मॅडम् खरचं खुप छान समीक्षण करता तुम्ही.
ReplyDelete