मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Thursday, February 22, 2024

कधीतरी शिवबासारखं होऊन बघ... शिवजयंती निमित्त वाशिम येथे कविसंमेलनात मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेचे सादरीकरण...

 कधीतरी शिवबासारखं होऊन बघ


कधीतरी माझ्या शिवबासारखं होऊन बघ
स्वतःसाठी नाही तर दुस-यासाठी जगून बघं‌...,!!धृ!!

जुलमी सत्तांवर कधी वार करून बघ
अन्यायावर कधी प्रहार करून बघ
सत्तेपायी स्वाभिमान गहाण न ठेवता
कधी अभिमानाने जगून बघ....!! १!!

रयतेच्या कल्याणासाठी, हितासाठी 
शिवबाचे विचार मनात पेरून बघ
लाचारी, भ्रष्टाचारी, घुसखोरी सोडून बघ
करता आलं तर कधी चांगल काम करून बघ...!! २!!

प्रत्येक स्त्री मातेसमान म्हणून बघं
एखाद्या स्त्रीचा पाठीराखा होऊन बघं
एखाद्याला अभय देऊन बघं
स्वार्थासाठी तर सारेच जगतात
कधी इतरांसाठी जगून बघं.....!!३!!

इतकं सोप्पं ही नाही लढाया करणं
शत्रूची दाणादाण उडवणं
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी
शेतकऱ्यांची ढाल बनून बघं...!!४!!

खाजगीकरणांचं गवत
आज जोरजोरात फोफावत आहे
तलवार घेऊन युद्ध करायचं नाहीय
हातातल्या लेखणीची तू तलवार करून बघं...!!५!!

कशी होती शिवकालीन प्रजा
आज कुठं चाललाय महाराष्ट्र माझा?
अठरा पगड जातीजातीला एकत्र घेऊन बघ
शाहु फुले आंबेडकरांचे विचार पेरून बघं...!!६!!

अच्छे दिन अच्छे दिन खूप बघितले
रयतेच्या सुखाचं हिताचं राज्य आहे का ठरवून बघ
समतेचं,रयतेचं, संविधानाचं,लोकहिताचं
लोकशाहीचं राज्य निर्माण करून बघं...!!७!!

बस झालं वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे उचलणं तरूणा
कधीतरी आता डोक्यानं विचार करून बघं
न्यायाच़, हक्काचे,समानतेचं,समतेचं
लोकशाहीचं राज्य निर्माण करून बघं...!!८!!

गोवा तर सारेच फिरून येतात
कधी गडकिल्ले चढून बघं
नाही शिवबा होता आलं तरी हरकत नाही
पण शिवरांयांचे विचार नसानसांत पेरून बघं...!!९!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...