मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Thursday, February 9, 2023

जुनी पेन्शन द्या (अभंग क्र.४६)

 जुनी पेन्शन द्या (अभंग क्र.४६)

जुनी पेन्शन द्या | किती हो अन्याय | 
आहे का पर्याय | सांगा तुम्ही ||

कर्मचा-यांची हो | पेन्शनच काठी |
ओलांडत साठी | मिळतसे ||

म्हातारपणाची | काठी आहे खरी ||
वेळ आज बरी | नाही नाही ||

कित्येकांचे झाले | मृत्यू अपघाती |
बायका रडती | वंचितांच्या ||

लेकराबाळांचा | शिक्षणाचा बोजा |
वाढता हो कर्जा | कैसे फेडी ||

हक्काची पेन्शन | देते का शासन |
होतसे मरण | नवलोकां ||

समान काम हो | समान वेतन |
न्याय ही समान | करावेत ||

नाही समानता | चिंतीत नोकरी |
करीतो चाकरी | पोटासाठी ||

पेन्शन आधार | खरा वार्धक्याचा |
विचार मनाचा | थोडा करा ||

शासन निर्णय | बदलून टाका |
जुनीच पेन्शन | आहे बाका ||

कंबर मोडले | करू आंदोलन |
आक्रोश गुंदन | कितीवेळा ||

जाग हो शासना | चांगला विचार |
नोकर लाचार | झाला आज ||

वाढे महागाई | पगार पुरेना |
जाग रे शासना | येऊ देत ||

मिनू म्हणे आता | लागावी पेन्शन ||
उगाच टेन्शन | कर्मचारी ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

Tuesday, February 7, 2023

वाशिमच्या मीनाक्षी नागराळे ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर सन्मानित...

 *वाशिमच्या मीनाक्षी नागराळे वर्धा येथे सन्मानित*

   ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा येथे ३,४,५ फेब्रुवारी २०२३ चे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून व राज्याच्या बाहेरून देखील कविता मागवल्या होत्या.अडीच हजारांमधून जवळपास पाचशे कवितांची निवड अखिल भारतीय साहित्य संमेलन्यातील कवी कट्ट्यावर झाली होती. त्यात ३ फेब्रुवारी रोजी म्हणजे पहिल्या दिवशी दुपारी तीन ते चार या वेळेत वाशिम जिल्ह्याच्या मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांच्या 'करू अनाथांची सेवा' या अभंगा रचनेचे सादरीकरण झाले. ज्येष्ठ कवी साहित्यिक राजन लाखे व इतर मान्यवरांच्या हस्ते मिनाक्षी नागराळे यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मिनाक्षी नागराळे यांची यापूर्वी ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात 'बाप माझा शेतकरी'  या कवितेची निवड झाली होती. आता त्यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आहे. त्यांच्या साहित्याच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मिनाक्षी नागराळे या एक आदर्श उपक्रम व तंत्रस्नेही शिक्षिका असून त्यांचे उपक्रम व नवोपक्रमांची जिल्हास्तरीय निवड झालेले आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती त्यांनी केलेली आहे. शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक अशा क्षेत्रात मिनाक्षी नागराळे यांनी वाशिम जिल्ह्याचे नाव उंचावले  आहे. आजपर्यंत त्यांना त्यांचे चिमणी पाखरं, उमलती फुले, स्वराज्याचे मावळे, समकालीन समीक्षा अशी चार पुस्तके प्रकाशित झाली असून दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाची निवड शासनाच्या ग्रंथालयाच्या निवड यादीमध्ये समाविष्ट झाले असून याच काव्यसंग्रहाची निवड महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आहे. आजपर्यंत त्यांचे अनेक वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Wednesday, February 1, 2023

स्वामी विवेकानंद (अभंग क्र.३८)

स्वामी विवेकानंद (अभंग क्र.३८)

तरुण तपस्वी | भारतीय पुत्र |
अध्यात्मिक सूत्र | जगा सांगे ||

विद्वान पंडित | योगराज योग |
आणि ज्ञानयोग | ग्रंथ रचे ||

अध्यात्मिक ज्ञान | जगी मिळविले |
विचार चांगले | नरेंद्रचे||

विवेकानंदाचे | विचार प्रभावी |
तरुण तपस्वी | जन्मा आले ||
 
बारा जानेवारी | जन्म त्यांचा झाला |
अध्यात्मिकतेला | जपलासे ||

प्राण्यावर दया | शिकवि बंधूता |
प्रेम सहाय्यता | करीतसे ||

 ज्ञान, धर्म, ऊर्जा | समाज संस्कृती |
 प्रेम शिकविते | जनलोका ||

हिंदुत्व संस्कृती | जपे मनातूनी |
मर्मते जीवनी | मानियले ||

मिनू म्हणे आता | एकच हो इच्छा||
हार्दिक शुभेच्छा |जयंतीच्या ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.शाळा कोकलगाव
९७६७६६३२५७|

बलात्कार नको (अभंग क्र.४५)

 बलात्कार (अभंग क्र.४५)

बलात्कार शब्द | भयानक वाटे |
अंगावर काटे | येतातच ||

झेलल्या यातना | जिने स्वतःवर |
नाही भानावर | कदापिही ||

कोवळ्या कळ्यांना |पापी चिरडती |
आयुष्याची माती | करतात ||

अशांना द्या फाशी | कायदा करावा |
लोकांना दाखवा | दृश्य सारे ||

लोकांसमोरच | फाशीची द्या सजा |
लोकांची हो ये जा | जिथे असे ||

नराधमांना द्या | चौकात हो फाशी |
कुकर्म करशी | जो जो कुणी ||

मुलींना स्त्रीयांना | रक्षणांचे धडे |
आवर्जून गडे | नित्य द्यावे ||

कराटीचे धडे | द्यावेत मुलींना |
वाचवा मुलींना | राष्ट्रहित ||

सबळ करूया | आपल्या लेकींना |
पोरींना,स्त्रीयांना | ठेवू ध्यानी ||

मिनू म्हणे आता | सावध रहावे |
धडे घेत जावे | रक्षणाचे ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

स्त्रीभ्रूणहत्या (अभंग क्र.४४)

 स्त्रीभ्रूणहत्या (अभंग क्र.४४)

मुलगा मुलगी | हे एकसमान |
शिकवा हो छान | दोघांनांही ||

नको स्त्रीभ्रूणहत्या | नको स्वैराचार |
खरी हक्कदार | मुलगीही ||

घराची ती लक्ष्मी | दोन्ही घरी जाते
प्रकाश हो देते | दोन्ही घरी ||

आनंदाचं झाडं | मुलगी पणती |
दुःखात सोबती | सदा असे ||

कन्यादान श्रेष्ठ | भाग्य रे पित्यास|
मुलीच्या जन्मास | येण्यासाठी ||

स्त्रीभ्रूणहत्या | आहे मोठे पाप ||
संसाराची चाक | फिरफिरे ||

कशाला घेता हो | मुलाची रे जीव |
येती का हो कीव | माणसांची ||

नररत्नाची ती | खाण म्हणजे स्त्री ||
रूपवान ती स्त्री | खरी असे ||

ओढतसे जीव | सदा मायबापा |
मुलीस हो जपा | काळजीने ||

कशा मिळतील | बायका मुलांना|
चिंता ही मनाला |उगाचच ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे (वाशिम)
जि.प.उच्च प्राथमिक शाळा कोकलगाव
मो.९७६७६६५२५७

Monday, January 30, 2023

हुंडाबंदी (अभंग क्र.४३)

 हुंडाबंदी (अभंग क्र.४३)

हुंडाबंदी फक्त| म्हणायपुरती |
किती बळी जाती | आज पण ||

कडक कायदा | चालूच पध्दत |
हुंडा हो घेतात | लपवून ||

कारवाई करा | शिक्षा द्या कठोर |
लोकांच्या समोर | येऊ द्यावे ||

झाकून घेतात | आज सुध्दा हुंडा |
घालतात गंडा | वरपिता ||

जनजागृतीची | काढावी मोहीम |
उपाय जालीम | जणू काही ||

सर्वांनी ठरवा | ना घेणार हुंडा |
ना देणार हुंडा | प्रत्येकाने ||

हुंडाबळी आज | जातातच मुली |
जिवानिशी मुली | जात आहे ||

कित्येक ठरल्या | हुंड्याचा शिकार |
लक्ष सरकार | द्यावे जरा ||

घातक ह्या रूढी | मोडून काढूया |
पध्दत मोडूया | समाजात ||

हे शहाणपण | कुणी शिकविले ||
घर बुडविले | गरिबांचे ||

पोरीच्या बापाला | रात्रंदिन घोर |
हुंडा शिरजोर | करू लागे ||

कर्जाचा डोंगर | विकी घरदार |
मोडला संसार | वधुपिता ||

कंबर मोडली | सावकारी कर्ज |
करीतसे अर्ज | कितीवेळा ||

घातक रूढीने | घेतला हो बळी |
हुंड्याची ही अळी | वळवळे ||

करी आत्महत्या | पोरीच्या बापाने |
बळी ह्या हुंड्याने | घेतलासे ||

कित्येक ठिकाणी | होतसे हो छळ |
पडली का कळ | समाजास ||

जनजागृतीचा | आहे रे आभाव |
करूया उठाव | विरोधात ||

मिनू म्हणे आता | शासन कायदा |
कडक कायदा | लक्ष द्यावे ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

Saturday, January 28, 2023

सोड हेवेदावे (अभंग क्र.४२)

 सोड हेवेदावे (अभंग क्र.४२)

सोड हेवेदावे | चांगले वागावे |
आनंदी रहावे | सदाचिया ||

नको करू गर्व | नको अहंकार |
जळाजळी फार | कशापायी ||

आत्मा परमात्मा | नांदे तिथे देव |
आनंदी तू ठेव | सदानंद ||

जळकी ती वृत्ती | काय रे कामाची |
वाढ मीपणाची | होत असे ||

चार दिवसाचे | आपण प्रवासी |
काय जगलासी | विचारांती ||

सोड हेवेदावे | माणुसकी दाव |
कशाला ते नांव | ठेवे कुणी ||

क्षणभंगुर हे |  जीवन माणसा |
नाही ना भरोसा | जीवनाचा ||

चांगले विचार | चांगले आचार |
खरा शिष्टाचार | शोध जरा ||

सोड हेवेदावे | आनंदाने जगा |
उगीचच त्रागा| कशापायी ||

मिनू म्हणे आता | सोड हेवेदावे
आनंदी जगावे | माणसाने ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम...

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...