मिनू
Sunday, August 13, 2023
मिनूच्या कविता...: आल्या श्रावणाच्या सरी.... अष्टाक्षरी रचना
मिनूच्या कविता...: आल्या श्रावणाच्या सरी.... अष्टाक्षरी रचना: अष्टाक्षरी रचना शिर्षक -आल्या श्रावणाच्या सरी आल्या श्रावणाच्या सरी ओलीचिंब झाली माती रान शिवार बहरे डोले गवताची पाती....!! मनी उल्हास उल्ह...
Thursday, August 10, 2023
आल्या श्रावणाच्या सरी.... अष्टाक्षरी रचना
अष्टाक्षरी रचना
शिर्षक -आल्या श्रावणाच्या सरी
आल्या श्रावणाच्या सरी
ओलीचिंब झाली माती
रान शिवार बहरे
डोले गवताची पाती....!!
मनी उल्हास उल्हास
ऊन पावसाचा खेळ
बळी हासतो गालात
जाई शिवारात वेळ.....!!
आल्या श्रावणाच्या सरी
सण पंचमीचा येई
वाट पहाते बहीण
पौर्णिमेला भाऊ येई...!!
आल्या श्रावणाच्या सरी
माय शिवारी राबते
उभ्या पिकावर ध्यान
माय बापाला सांगते...!!
पडे पिकावर अळी
पाठी फवारणी घेतो
घाम गाळुनिया बळी
कष्ट करूनिया खातो....!!
निसर्गाचा सदा ॠणी
हात देवाला जोडतो
शेत पिकू दे विठ्ठला
असे मागणं मागतो....!
आल्या श्रावणाच्या सरी
मन जातं माहेराला
ओढ जरी संसाराची
आस बाईच्या मनाला...!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
Wednesday, July 12, 2023
बीज अंकुरे अंकुरे (कविता शेतीमातीची)
*बीज अंकुरे अंकुरे*
बीज अंकुरे अंकुरे
शेत शिवार हिरवे
बळीराजा सुखावला
पाही स्वप्न ते बरवे...!!
कुस उसवे मातीची
शालू हिरवा नेसला
धरा आनंदून गेली
गर्भ पोटात पोसला...!!
बीज अंकुरे अंकुरे
रान बहरून गेले
पक्षी उडती अंबरी
ढग दाटूनिया आले...!!
पांडुरंगाच्या कृपेने
रिमझिम हा पाऊस
खूप पिकू दे शिवार
फिटू दे बळीची हौस...!!
बीज अंकुरे अंकुरे
धन्य झाली वसुंधरा
शेतकरी सुखावून
कर जोडतसे धरा...!!
काळ्या आईची सेवेत
धन्य झाला शेतकरी
बळी जगाचा पोशिंदा
शेती दौलतच खरी....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
Friday, May 5, 2023
गुणवत्ता विकासाला हातभार लावणारे पुस्तक म्हणजे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम....!!
गुणवत्ता विकासाला हातभार लावणारे पुस्तक म्हणजे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम
बीड जिल्ह्याची आदर्श शिक्षिका माझी मैत्रीण जिवाभावाची सखी एका विचारांनी झपाटलेल्या, सावित्रीचा विचारांचा वसा घेतलेल्या, जिजाऊंची प्रेरणा असणाऱ्या माझी सखी श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे/करपे यांची यूट्यूब चैनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला परिचित असणारी धडपडी ,ध्येयवादी शिक्षिका, एक उपक्रमशील शिक्षिका ज्या शाळेत जॉईन झाली ती शाळा शेवटची घटका मोजत होती. बंद पडण्याच्या मार्गावर होती. ढेकनमोहा शाळेला उपक्रमाच्या माध्यमातून जीवनदान देणारी संजीवनी म्हणजे उषा ढेरे.... उषा ढेरे यांचे दुसरे पुस्तक माझ्या हाती आले. मी तर म्हणेल ढेऱ्यांची उषा उपक्रमाची दिशा.
आज आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी एक ते वीस च्या पटातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. किती शाळा विद्यार्थ्यांच्या विना बंद पडल्या? त्याला कारणीभूत फक्त शिक्षक किंवा पालक नाहीत तर याला कारणीभूत आहे शिक्षणाचे बाजारीकरण, खाजगीकरण, खाजगी शाळा, वेगवेगळ्या गोष्टींचे अमिष दाखवून, सुटा बुटात विद्यार्थी पाहून खेड्यातल्या पालकांनाही वाटायला लागलं की इंग्रजी शाळेत पोरं गेलं म्हणजे मोठा साहेब होईल. डॉक्टर- इंजिनियर होईल. तर असं काही नसतं इंग्रजी शाळा कॉन्व्हेटचं पीक आता डोकं वर काढत आहे.हे पूर्वी इंग्रजी शाळा होत्या का ? खाजगी शाळांची दुकानं, क्लासेस असं काही नव्हतं .तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली मुलं खूप मोठ- मोठ्या अधिकारी पदावर आज कार्यरत आहेत.आय.ए.एस पासून ते आय.पी.एस पर्यंत , डॉक्टर पासून ते इंजिनियर पर्यंत, आमदार पासून ते मंत्रीपदापर्यंत अनेक वेगवेगळ्या पदावर गेलेले अनेक विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन गेलेले आहेत.तेंव्हा पालकांच्या विश्वास होता. आजही ठेवायला हवा. तरच गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे भलं होईल. विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या उषा ढेरे मॅडम यांचे दुसरे पुस्तक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम हे पुस्तक इतर शिक्षकांना दिशा देणारे दिशादर्शकच आहे. असे म्हणण्यास अतिशोयोक्ती वाटणार नाही. मी जवळपास २०१५ सालापासून उषा ढेरे यांना ओळखते. एक हाडाची शिक्षिका म्हणून त्यांचा मला अभिमान वाटतो. आमची भेट अहमदनगरला उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका पुरस्कार सोहळ्यामध्ये झाली होती. पूर्वी खडू फळा, ज्ञानाचा मळा,विद्यार्थ्यांचा गोतावळा असं काहीसं चित्र असायचं. मोबाईलच्या आभासी जगात कोरोना पासून जास्त आलो आणि तंत्रज्ञानाची कला प्रत्येकाला आत्मसात करावी लागली. उषाताईंनी अनेक नवनवीन उपक्रम शाळेत घेतले. त्यांचे व्हिडिओ उषा ढेरे यांच्या यूट्यूब चैनल वर अपलोड केले आणि कोविड काळात त्या युट्युब चॅनेलला जास्त उपयोग महाराष्ट्रातल्या बालचिमुकल्यांना झाला. रसाळ वाणी आणि कृतीत उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला त्यांचा परिणाम म्हणून शाळेचा पट वाढला हे झालं output चला आपण आता त्यांच्या उपक्रमाविषयी थोडं जाणून घेऊया.
या पुस्तकामध्ये ३० उपक्रम दिलेले आहेत. बऱ्याच शिक्षकांची इच्छा होती की या उपक्रमाचे पुस्तक व्हावं त्याचा उपयोग इतरही शिक्षकांना होईल. विद्यार्थ्यांना एखादी क्रिया किंवा गोष्ट तोंडी सांगून पटकन लक्षात बसत नाहीत. पण तीच गोष्ट जर कृती, गाणी आणि प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घेतली तर ती जास्त काळ स्मरणात राहते. Activity is the best method in education policy या उक्तीप्रमाणे उषाताईंनी नानाविध उपक्रम आधी स्वतः राबविले मग जगाला सांगितले. त्यांचा पहिला उपक्रम अक्षरावरून शब्द सांगणे. शिक्षक विद्यार्थ्यांना मुळाक्षराचे कार्डच देतील प्रत्येक विद्यार्थ्याला त्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द सांगण्यास सांगतील. जसे कप -कमळ- काळा- केक इ. म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढेल. विद्यार्थी विचार करायला लागेल. त्याच्या बुद्धीला चालना मिळेल. भाषेवरील प्रभुत्व वाढण्यास मदत होईल. शब्दसंग्रह वाढेल. आत्मविश्वास वाढेल अशा अनेक उपक्रमांची नांदी तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. उषाताईंचा २)what is this? 3)in out.४) one many ५) who am I ६)learn with practically ७)what is your name?८) ऐकूया शब्द वाजवूया टाळी असे ३० उपक्रम या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. प्रत्येक उपक्रम हा खूप चांगला आणि गुणवत्तापूर्ण आहे. शेवटी प्रत्येक उपक्रम कसा यशस्वी करायचा? हे त्या शिक्षकाची कल्पकता व नाविन्यता असते. शिक्षक एखाद्या ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करू शकतो. त्यांचे स्वातंत्र्य देखील प्रत्येक शिक्षकाला दिलेले आहेत. काही होतकरू असलेले शिक्षक कमी कालावधीत नवनवीन उपक्रम राबवून त्याचा वेगळाच ठसा उमटवत असतात. आजच्या टॅब आणि मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रतिसाद ऑनलाईन मिळतो आहे. आजची पिढी शिक्षकापेक्षाही पुढे जात असल्याचे आपण पाहतो. अनेक विद्यार्थी पुस्तकांमध्ये असलेला QR कोड स्कॅन करून नवनवीन माहिती बघत असतात. स्मार्ट जमान्यातील स्मार्ट पालकांची, स्मार्ट पिढी ओळखूनच उषाताईंनी अनेक उपक्रम घेतले व त्याचे व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरतात आणि युट्युब वर प्रचार आणि प्रसार माध्यमांचे केंद्र असल्याने सोशल मीडियावर अनेक जण पाहतात. तेच उपक्रम पुस्तकरूपात आले आहेत. तसे नवनवीन उपक्रम हे प्रत्येक शिक्षकांच्या डोक्यात असतातच फक्त त्याला सातत्याची जोड मिळाली की त्याचं आउटपुट बाहेर पडतो.तेही तितकच खरं. कारण मी पण एक उपक्रम शिक्षिका असल्याने याचा मला याचा अनुभव आहे.
शिक्षकांचे प्रयत्न,पालकांचे मानसिकता आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेतली तर कोणताही उपक्रम यशस्वी होतोच. फक्त उपक्रम घ्यायला वेळ जास्त लागतो. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. शब्द संपत्ती वाढते.प्रत्येकाला सहभागी होता येते. वैयक्तिक मार्गदर्शन करता येते. एकाग्रता वाढते. सहकार्याची भावना वाढीस लागते. काही उपक्रम खेळाच्या माध्यमातून असल्याने अभ्यासात रुची वाढते. उपस्थिति वाढते. असे अनेक फायदे या उपक्रमातून होतात.हे प्रत्येक शिक्षकाने लक्षात घ्यायला हवे आहे. या पुस्तकातील बरेचसे उपक्रम इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील कृतिपुस्तकेत आहेत. चुटकी टाळी असे उपक्रम इयत्ता पहिलीच्या आणि दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात आहेत. प्रत्येक शिक्षकांनी हाताळावे असे पुस्तक म्हणजे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम होय.
उषाताईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम :-उषा ढेरे
प्रकाशन :-परिस पब्लिकेशन पुणे
मुखपृष्ठ:- अरविंद शेलार
प्रथम आवृत्ती:- 13 सप्टेंबर 2022
मूल्य :-180 रुपये फक्त
समीक्षिका/शिक्षिका /लेखिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
पीन ४४४५०५
Friday, April 21, 2023
कर्मरेषा बोलते आहे
मनस्पर्षी स्पर्धा समुह आयोजित स्पर्धा
विषय-कर्मरेषा बोलते आहे
पाप पुण्याचा हिशोब आज मी खोलते आहे
चांगले कर्म तू कर मी कर्मरेषा बोलते आहे.
चांगुलपणा माणसाच्या सदैव अंगी बाळगावा
माणसाला माणसांत आज मी तोलते आहे....
राबणा-याला,कष्टाला किंमत असते सदाच
व्याजासकट कर्माचा हिशोब मिळतो सांगते आहे
हाच जन्म खरा तुझा भाकीत आज खोलते आहे
मन स्वच्छ ठेवत जा मी कर्मरेषा बोलते आहे....
येतील वादळे कैकदा धैर्याने मी तोलते आहे
भाव,बंधने आडवे येती त्याला मी जोडते आहे
चित्ती असु द्यावे समाधान आणि माणुसकी
तू चांगले कर्म करत जा मी कर्मरेषा बोलते आहे
जिद्द आणि चिकाटीला अंगी गुंडाळून ठेवते
चांगल्या कर्माची फळे चांगलीच मिळते आहे
भुकेला अन्न दे आणि तहानलेल्याला पाणी
मग बघ हे जीवन कसे हळुवार खुलते आहे....
कुविचाराला नकोच थारा मनाच्या मंदीरी
निस्वार्थ प्रेम,माया, जिव्हाळा जपते आहे
उशिरा का होईना प्रत्येकाचा हिशोब चुकते आहे
तू चांगले कर्म करत जा मी तुझ्या बाजूने बोलते आहे..
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम...
Thursday, April 6, 2023
नुसता दिखावा (अभंग क्र.५४)
नुसता दिखावा (अभंग क्र.५४)
नुसतीच ऐटी | खोटा तो दिखावा |
जना दाखवावा | कशापायी ||
सासू सास-यांची | करे ना हो सेवा |
नुसता दिखावा | जगासाठी ||
वृध्द ते बिचारे | नाविलाज सारा |
प्रारब्ध पसारा | वाटे जणू ||
शॉपिंग मॉपींग | करी सूनबाई |
डोईजड होई | नव-यास ||
अमाप तो खर्च | उडवती पैसा |
राहती हो ऐसा | महाराणी ||
ना धाक कुणाचा | ना वचक असे |
अप्सराच दिसे | जणू काही ||
ब्युटी पार्लरचा | खर्च मोजू नका |
नादी लागू नका | सूनबाई ||
मीच हो शहाणी | टेंभा मिरवते |
अक्कल सांगते | इतरांना ||
मैत्रीणी व पार्ट्या | बंगला तो मोठा |
दाखवते खोटा | बडेजाव ||
कर्जाचा डोंगर | ऐशापाई करी |
धडकीच भरी | ऐकुनिया ||
मिनू म्हणे आता | सोड मूर्खपणा ||
तू आपलेपणा | जप बाई ||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
Saturday, April 1, 2023
सावित्रीमाई एक आदर्श शिक्षिका
Date: 4 Feb 2023
*सावित्रीमाई फुले एक आदर्श शिक्षिका*
मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम
भारतातील पहिल्या महिला आदर्श शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणजे सावित्रीमाई फुले होय. आदर्श हा शब्द दिसायला जरी साडेतीन अक्षरी असला तरी फार मोठे सामर्थ्य, फार मोठी क्रांती या शब्दांत लपलेली आहे. आदर्श या शब्दाची व्याख्याच करायची झाल्यास जिने अंधकाराला चिरून, ज्ञानाचा दीप चिरंतर तेवत ठेवण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, जिने स्त्री शिक्षणाचा वसा घेण्यासाठी स्वतःच्या संसाराचा विचार न करता घरातून बाहेर काढली गेली, जिला एकही रुपयाचा पगार नसताना अंगावर शेण, चिखल, खरगटे पाणी,दगड गोटे घेतले पण क्रांतीची मशाल हाती घेतलेली सोडली नाही, ज्या मायमाऊलीने एकच लुगडं नेसून अज्ञानाच्या अंधकारात कितपत पडलेल्या गुलाम महिलांना फक्त चूल आणि मुल इथपर्यंतच महिलांना न ठेवता ज्ञानाचा प्रकाश देऊन तिचा तिसरा डोळा उघडविला. ती थोर माय म्हणजे सावित्रीमाई फुले...त्या एक आदर्श शिक्षिका होत्या. कोणतेही वेतन नाही, ना कोणतेही मानधन नाही, ना कसला साधील खर्च नाही, ना कोणते अनुदान नाही, आयुष्यभर फुले असून काटे वेचले त्या सावित्रीमाई म्हणजे भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या आदर्श शिक्षिका म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
पूर्वीच्या काळी स्त्रियांनाच काय तर बहुजनांना शिक्षणाची सुविधा नव्हती. शाळा शिक्षण घेणे म्हणजे पाप समजलं जायचं. स्त्री शिकली की धर्म बुडतो अशी अंधश्रद्धा पसरलेली होती. शिक्षण घेणे म्हणजे पाप समजलं जायचं त्यामुळे त्या काळात कोणीही स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी पाठवीत नसत.सावित्रीमाई फुले यांचा विवाह सन १८४० मध्ये ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्याकाळी बालविवाहाची प्रथा असल्याने लग्नाच्या वेळी सावित्रीमाईचे वय ९ तर ज्योतिरावांचे वय १३ वर्षे होते. ज्योतिरावांची लहानपणीच आई वारली. त्यामुळे त्यांच्या मावस आत्या सगुनाबाई यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुनाबाई एका इंग्रज अधिकाराच्या मुलाच्या दायी म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. सावित्रीमाई आणि सगुनाबाई दुपारी ज्योतिरावांना भोजन देण्यासाठी शेतात जात असत. त्यावेळी ज्योतिरावांनी आंब्याच्या पातळ फांदीचे पेन बनवून त्या दोघींना जमिनीवर अक्षरांची ओळख करून दिली. कोणाला माहित होते हेच जमिनीवरील अक्षर.हेच धुळीवरील कोरलेल्या अक्षरातून एक तेजस्वी अग्नी जन्माला येईल आणि क्रांतीची मशाल पेटेल. त्या मशालीच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर होईल.
सन १८४० मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची पत्नी मिस्सेलने यांनी पुण्यातील छाबिलदासच्या वाड्यात मुलींसाठी सामान्य शाळा सुरू केली. ज्योतीरावांनी सावित्रीमाईचे तिथेच ऍडमिशन केले.शिक्षण घेत असताना सावित्रीमाईंनी गुलामगिरी विरोधात कामं करणाऱ्या थॉमस क्लाक्सर्न यांचे जीवन चरित्र वाचले. ज्यात अमेरिकेच्या, आफ्रिकन गुलामांच्या जीवनाची संघर्षमय शोककथा छापली गेली होती. सावित्रीमाईंना समजले की शिक्षण हे परिवर्तनाचे मजबूत साधन आहे. कारण अशिक्षित लोकांना आपल्या हक्काबद्दलची जाणीव नसते. त्यामुळे ते हक्क प्राप्तीसाठी संघर्ष करू शकत नाहीत. या पुस्तकाने त्यांच्यात शिकण्याची तीव्र इच्छाच जागृत केली नाही तर समाजातील मुलींना शिक्षण करण्याचे स्वप्न देखील दिले. सोबतीला वाघासारखा भक्कम आधार ज्योतिबांचा होता. ज्योतिबांनी अक्षरे शिकवली त्यामुळे सावित्रीमाईंचा आत्मविश्वास वाढला. इतकेच नाही तर मुलींसाठी शाळा काढण्याचे स्वप्न त्या दांपत्यांना दिसू लागले आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली.
शाळा काढायची तर कुठे काढायची ? हा फार मोठा प्रश्न ज्योतिबांच्या समोर होता. पुण्याच्या भिडे वाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. या पहिल्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या.१) अन्नपूर्णा जोशी (वय पाच वर्ष ) २) सुमती मोकाशी (वय४ वर्ष) ३) दुर्गा देशमुख (वय ६ वर्ष) ४) माधवी थत्ते (वय पाच वर्ष ) ५) सोनू पवार (वय चार वर्ष ) ६) जनी कर्डिले (वय पाच वर्ष) या सहा मुलींपैकी ४ ब्राह्मण, १ मराठा, आणि १ धनगर अशा एकूण सहा मुलींची शाळा सुरू केली. या सहा मुलींच्या बायकांना स्त्री शिक्षण घेण्यासाठी सावित्रीमाई व ज्योतिबांनी प्रवृत्त केलेत. पण पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी हल्ला कल्लोळ माजवला. कलियुग आले, धर्म बुडाला, स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे सर्वात मोठे पाप. अशी कोल्हे कोई सुरू केली. सनातनी लोकांनी सावित्री मायेच्या अंगावर शेण, चिखल, घाण फेकणे, खरकटे पाणी फेकणे, उष्टी -शिळे अन्न फेकणे अशा प्रकारचा छळ सुरू केला. सावित्रीमाईंनी सुरू केलेले शैक्षणिक कार्य बंद पाडण्यासाठी सनातन यांनी हात धुवून सावित्रीमाईच्या मागे लागले होते पण सावित्रीमाई ही वाघीण होती. कोणालाही न भिणारी न डगमगणारी, तिन्ही कुणालाही भिली नाही. लावलेली ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी अहोरात्र झटू लागली आणखीन जिद्दीने मन बळकट करून मेंदू सशक्त करून नव्या उमेदीने ज्ञानदानाचे पवित्र कार्य सावित्रीमाई करू लागल्या.
एक वेळचा प्रसंग. शाळा बंद करावी म्हणून एका गुंडाने सावित्रीमाईला धमकी दिली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर सावित्रीमाई शाळेला जात असताना रस्त्यात सावित्रीमाईंच्या समोर गुंड येऊन उभा राहिला. दोघांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या. बघता बघता बघ्यांची गर्दी जमा झाली. सावित्रीमाई आक्रमक झाल्या आणि त्या गुंडाच्या तोंडात त्यांनी दोन थापडा ठेवून दिल्या. सावित्रीमाई रणरागिनीचे आक्रमक रूप पाहून गुंड तेथून पळून गेला. सनातने लोकांना जबरदस्त चपराक बसली. अशाप्रकारे शाळा बंद करण्यासाठी सनातनी लोकांची उठाठेव सुरू झाली.
सावित्रीमाईच्या शैक्षणिक कार्यात मोलाची साथ देणाऱ्या पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांचे शैक्षणिक कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे १५ मे १८४८ ला पुण्यात महारवाड्यात एक शाळा सुरू केली. त्या ठिकाणी सगुनाबाई ह्या शिक्षिका होत्या. महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्यास हळूहळू प्रतिसाद मिळत गेला. १८५१ मध्ये पुण्याच्या महारवाड्यात आणखीन एक शाळा सुरू केली. त्या ठिकाणी सावित्रीमाई स्वतः शिक्षिका म्हणून काम पाहिले सन १८४८ ते १८५२ या चार वर्षात पुण्यामध्ये आणि पुणे परिसरामध्ये एकूण २० शाळा सावित्रीमाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने चालवू लागल्या. सावित्रीमाई विद्यार्थ्यांना तन मन धन अर्पण करून मन लावून शिकवित होत्या. आज आपण आनंदायी शिक्षण शासन राबवत आहे ना. ते शिक्षण त्याकाळी सावित्रीमाईंनी हसत खेळत, कविता गाऊन, आनंददायी पद्धतीने शिकवत असत. मुलांची निराशा घालविण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न त्या काळात सावित्रीमाई करत असत. म्हणून सावित्रीमाई या आदर्श शिक्षिका आहेत. इतकेच नाही तर स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या आणि विद्येचे देवता आहेत. आज शासन आनंददायी शिक्षण पद्धती राबवत आहे मात्र सावित्रीमाईंनी त्या काळात हे प्रयोग करत होत्या. सावित्रीमाई ज्योतीराव हे काळांच्या पुढे होते. शिकवणारे शिक्षक हे प्रशिक्षित असले पाहिजे यावरही त्यांचा भर होता.
सावित्रीमाई या भारतातल्या पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्याकाळी सावित्रीमाईंना ज्ञानाची पवित्र कार्य करीत असल्याबद्दल ना पगार होता.ना वेतन वाढ.ना कुठला प्रवास भत्ता.नाही शाळा चालवायला कुठला सादील खर्च होता. तरीसुद्धा स्वतःच राहतं घर सोडून कंबर कसून एकच लुगडं नेसून स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी सावित्रीमाईं आयुष्यभर इतरांसाठी जगल्या.शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रांमध्ये सावित्रीमाईंच्या सोबत फातिमाबी शेख, सगुनाबाई यांच्याप्रमाणेच इतरही बरेच शिक्षक शिकवण्याचे काम करत होते. महिलांचा एकूण समाजापैकी असणारा अर्धा भाग जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तोपर्यंत समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही. हे ज्यांना मनोमन पटलेले होते तो कुठल्याही जाती धर्माचा असो अशा सर्वांचे सहकार्य सावित्रीमाई ज्योतिबांना मिळत होते. पण सनातनी लोकांनी मात्र सावित्रीमाईंच्या अंगावर शेण, चिखल, घाण फेकणे इत्यादी क्लेशकारक बाबी करून त्यांनी सुरू केलेले शैक्षणिक कार्य बंद करण्यासाठी आटापिटा करत होते. सनातन यांनी चिखल, घाण फेकणे,खरकटे पाणी फेकणे इ.गोष्टी फेकल्यामुळे सावित्रीमाईंची अंगावरची साडी घाण व्हायची. ती शाळेत गेल्यावर सावित्रीमाई घाण झालेली साडी काढून दुसरी साडी नेसून मुलांना शिकवित असतं. शेवटी विरोधकांनी गोविंदराव फुले यांच्यावर एवढे दडपण आणले की नाईलाजाने त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे ज्योतीरावांस शाळा तरी सोड, नसता घर सोड असे सांगावे लागले. सावित्रीमाईवर दुःखाचा डोंगर कोसळला. काय करावे सुचत नव्हते? शाळा सोडावे तर हाती घेतलेले कार्य अधूरे राहणार आणि घर सोडावं तर सासऱ्याला सोडावे लागणार, कुटुंब सोडावे लागणार अशा द्विधा मनस्थितीमध्यें त्या अडकल्या होत्या. शेवटी सावित्रीमाईंनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. बहुजनांसाठी,शूद्रातीशुद्रांसाठी स्वतःचे घर सोडणाऱ्या सावित्रीमाई या भारतातल्याच नव्हे तर जगातल्या एकमेव आदर्श शिक्षिका आहेत.
मुलींच्या वाड्यात जी शाळा सुरू केली होती. त्या शाळेत वर्षाअखेर २५ मुली शिक्षण घेत होत्या. त्यामध्ये १० ब्राह्मण, ६ मराठा, २ चांभार,१ महार, १ मांग,१ धनगर,१ कोष्टी, १ साळी, १ माळी हि आकडेवारी पाहिल्यावर असे लक्षात येते. ज्या ब्राह्मण वर्गाने सावित्री- ज्योतिबांना छळले त्यांचा तिरस्कार केला. त्याच ब्राह्मण वर्गातील मुलींची संख्या सर्वात जास्त होती. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी १८४८ ते १८५१ या दरम्यान पुण्यांमध्ये अनेक शाळा सुरू केल्या. ३ जुलै १८५१ रोजी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये ज्या मुलींची शाळा सुरू केली होती त्या ठिकाणी सावित्रीमाईंची बदली करण्यात आली होती. सुरुवातीस या शाळेची पटसंख्या ४८ होती. १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्तापेठेत मुलींची नवीन शाळा सुरू करण्यात आली. वेताळ पेठेत १५ मार्च १८५२ रोजी एक नवीन शाळा स्थापन झाली. या सर्व शाळांची माहिती एज्युकेशन सी.डी व्हॉल्यूम यामध्यें पाहायला मिळते. १ मे १८५२ रोजी वेताळ पेठेतील अस्पृश्यांसाठी एक शाळा सुरू केली. संपूर्ण भारतामध्यें ऐतदेशीयांनी स्थापन केलेली ही पहिली शाळा होय. याच शाळेवर मुख्याध्यापक म्हणून सावित्रीमाईंची नेमणूक झाली होती.
परोपकारी वृत्तीने प्रेरित झालेल्या या दांपत्याने स्वखर्चाने अस्पृश्यांकरिता शाळा काढल्या. बहुजनांसाठी, मुलींसाठी शाळा काढल्या. त्यांच्या या कार्याचा उल्लेख ५ डिसेंबर १८५३ च्या ज्ञानप्रकाशच्या अंकात मोठ्या गर्वाने केला आहे. त्यावेळी शिक्षण खात्याचे अध्यक्ष सर आरस्किन पेरी हे होते. त्यांनी सावित्रीमाईंना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. त्यांनी पुण्यामध्यें मोठा दरबार भरवला व त्यात ज्योतिराव- सावित्रीमाई यांचा सपत्नीक सत्कार केला. जाहीर गौरवाचा हा कार्यक्रम १६ नोव्हेंबर १८५२ ला विश्रामबाग वाड्यातील भव्यसमारंभात शाल-जोडी देऊन पार पडला. ब्राह्मण सनातन वर्गांना मात्र हे पटले नाही. ज्योतिराव-सावित्रीमाई सारख्या शूद्रांचा महावस्त्र देऊन गौरव करणे पसंत पडले नाही. या कार्यक्रमाला पुण्यातील सर्व इंग्रज सपत्नीक हजर राहिले होते. ही सत्काराची बातमी ऐकून सर्व सनातन खवळले. शुद्रांचा सत्कार सरकारने केला हे विपरीत घडले. कलियुग आले म्हणूनच असे घडले. अशी कोल्हेकुई त्यांनी सुरू केली. गोरगरीब लोकांना व ज्ञानाचे महत्त्व कळलेल्या लोकांना मात्र खूप आनंद झाला. ज्योतिबासाऊच्या रूपाने त्यांना आखंड तेवत राहणारी ज्ञानाची ज्योत मिळाली होती. जो अज्ञानाचा अंध:कार दूर सारून, अज्ञानाच्या बेड्या तोडणारी होती. ज्यावेळी सावित्रीमाई व ज्योतिरावांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेतल्यामुळे स्वतःचे घर सोडावे लागले होते. त्या वेळचे ज्योतिरावांचे मित्र उस्मान शेख यांनी गंजपेठेतील आपली जागा दिली. एवढेच नव्हे तर भांडीकुंडी व इतर आवश्यक साहित्य देऊन फार मोठी मदत केली. शिक्षिका तयार करण्यासाठी जे नॉर्मल स्कूल तयार केले होते. त्याची पहिली विद्यार्थिनी आणि भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख होय.
सावित्रीमाई त्यांच्या शाळेतील विद्यार्थी आदर्श घडावीत या दृष्टीने प्रयत्न करत असत. विद्यार्थ्यांना हक्काची, सामाजिक न्यायाची आणि समाज परिवर्तनाची भाषा शिकवत असत. त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्न पेरीत असत. त्यांच्यात नवीन साहस जागवत असे. त्यांचे शिक्षण म्हणजे जीवन शिक्षण, विद्यार्थी विचार करणारा झाला पाहिजे. शिक्षण घेतल्यानंतर हक्कासाठी लढायला पुढे येणारे नागरिक तयार झाले पाहिजे, अन्यायावर पेटून उठणारे विद्यार्थी घडले पाहिजेत असे व्यक्तिमत्व घडवावे यासाठी सावित्रीमाई व त्यांच्या शिक्षकांचे प्रयत्न सतत सुरू होते.
केवळ शाळा सुरू करून सावित्रीमाई थांबल्या नाहीत तर त्यांनी शाळांसाठी अभ्यासक्रमाही तयार केला होता. शाळा सुरू करणे, मुलींना शाळेत आणण्याचे काम करणे, आलेल्या मुलींना शाळेत टिकून ठेवणे, सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा, शालेय शिस्त, इत्यादी बाबीं सावित्रीमाई कटाक्षाने पाळत असत.सावित्रीमाईंना वाचनाची खूप आवड होती. वाचन, मनन, चिंतन यामध्ये त्या सखोल होत्या. आपल्या कार्याबद्दल त्यांना प्रचंड आवड होती. आत्मविश्वास ही तेवढाच होता. सावित्रीमाईंची अभिरुची आणि निर्णय शक्ती उच्च दर्जाची होती. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी उपस्थिती भत्ता दिल्याची ही नोंद आढळते. महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम अलीकडे सुरू केला आहे. हा प्रश्न पूर्वीच सोडवला असता तर कधीच साक्षरतेचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळाले असते. पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात सावित्रीमाई एक्सपर्ट होत्या. त्या शाळेत मुलांचे वाढदिवस, बक्षीस समारंभ व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यासारखे अनेक सहशालेय उपक्रम सावित्रीमाई राबवीत असत.
माझ्या सावित्रीमाईंनी फक्त शाळाच काढल्या नाहीत तर त्यांचे समाजकार्य अत्यंत कौतुकास्पदच आहे. खरे तर इतके अथांग कार्य असूनही आजही त्या भारतरत्न साठी उपेक्षितच आहेत. मी सावित्रीमाईंची लेक म्हणून मला सावित्रीच्या कार्याचा सदैव अभिमान, गर्व तर आहेच पण तिच्यामुळे मी सुद्धा सरकारी शाळेत शिक्षिका झाले याची जाणीव सतत माझ्या हृदयात आहे. माझ्या सावित्रीमाईंनी दाखवलेल्या रस्त्यावर मी चालण्याचा प्रयत्न करते आणि सदैव करत राहील. खरंतर भारतरत्न पुरस्कार सावित्री -ज्योतिबांना मिळाला पाहिजे हीच मागणी माझी आहे. आजच्या काळात गलेलठ्ठ डोनेशन घेऊन नोकरीला लावणारे संस्थाचालक असोत किंवा भरमसाठ फिस घेऊन विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणाऱ्या शाळा असोत सर्वांना जबरदस्त चपराक म्हणजे सावित्रीमाईंचे अद्वितीय असे कार्य. तिच्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला दिसत आहेत. पण वाईट याचच वाटतं की शिकल्या सवरलेल्या आजच्या काळातल्या स्त्रिया उपवास, वृत्तवैकल्य, बुवाबाजी, नवरात्रात नवरंगाच्या साड्या घालण्यातच दंग झालेले आहेत ही मात्र शोकांतिकाच म्हणावी लागेल.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासारख्या आदर्श शिक्षक 'न भूतो न भविष्यती' या म्हणीप्रमाणे पहावयास मिळणार नाहीत याला साक्षीदार फक्त इतिहास आहे. सावित्रीमाई म्हणजे मायेचा अथांग सागर, करणेचा जागर, शिक्षणाची ज्योती, दिव्यातील न संपणारी वाती, स्त्रियांना गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करणारी क्रांतिकारी आदर्श शिक्षिका होय. सावित्रीमाईंचे कार्य पाहायला गेले आणि लिहायला गेले तर आपल्याला वहीचा कागद आणि पेनाची शाई सुद्धा पुरणार नाही. इतके अद्वितीय,अलौकिक असे कार्य आहे.
ज्ञानज्योती सावित्रीमाईंनी समाज सुधारकांचे सुद्धा कार्य खूप मोलाचे करून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिलेला आहे. त्या काळामध्ये विधवा स्त्रियांना गरोदर राहिल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये सावित्रीमाईंनी त्या विधवांना आत्महत्या करण्यापासून थांबवले आणि त्यांना त्यांची सुखरूप शंभर जणांचे बाळांतपणं केले. प्लेगच्या साथीच्या काळामध्ये अन्नछत्र चालवले. सावित्रीमाई स्वतः स्वयंपाक करून सर्व लोकांना जेवू घालत असत.अन्नछत्र चालवले. विधवांचे केशवपण पूर्वीच्या काळामध्ये करण्याचे प्रथा होती. तर त्या प्रथेला आळा घालण्यासाठी ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी न्हाव्याचा संप घडवून आणला. इतकेच नाही तर यशवंत नावाच्या एका ब्राह्मण विधवा स्त्रीच्या मुलाला दत्तक घेऊन समाजासमोर एक नवा आदर्श माझ्या सावित्रीमाईंनी मांडला. स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या आणि क्रांतीची बीजं पेरणाऱ्या सावित्रीमाई या खरोखर आद्य भारतीय शिक्षिका व मुख्याध्यापिका, एक आदर्श शिक्षिका होय.
अज्ञानाची तोडून कवाडे
मुक्त केलीस तू सर्वांना
फुले असूनही काटे वेचले
शिकविले साऱ्या बहुजनांना...
आज आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपलं स्थान काबीज केलेले आहे. ते फक्त आणि फक्त माझ्या सावित्रीमाई मुळेच. सावित्रीमाई नसत्या तर शिकल्या नसत्या मुली. सावित्रीमाई नसत्या तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसल्या नसत्या मुली....
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कोटी कोटी अभिवादन... नमन...!!
लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे (शिक्षिका)
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
पीन ४४४५०५
मो.९७६७६६३२५७
मेल mpn1412@gmail.com
---
Shared using https://www.writediary.com/getapp
Subscribe to:
Posts (Atom)
मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...
-
असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता) असा एक रंग संस्कारांचा आचरणातून दिसावा रूसवा फुगवा इथे मात्र कुणाला कुणाचा नसावा....!! १!! ...
-
बदल्यांचं कशाला टेन्शन? बदल्यांचं कशाला टेन्शन? आहे तिथं मस्त रहायचं... झाल्या तर झाल्या बदल्या हसतखेळत ज्ञानदान करायचं....!! होईल तेंव्हा ...
-
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)* कधी माणसाने | सोडू नये निती | लोकांस प्रचिती | असतेच || १|| वंशावळ खोटी| खोटेची करिती | जगा दाखविती | मोठेपण |...