मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Thursday, September 7, 2023

सोडू नये निती (अभंग क्र.५६)

 *सोडू नये निती(अभंग क्र.५६)*

कधी माणसाने | सोडू नये निती |
लोकांस प्रचिती | असतेच || १||

वंशावळ खोटी| खोटेची करिती |
जगा दाखविती | मोठेपण || २ ||

जग हे शहाणे | ओळखती सारे |
हव्यासाचे वारे | सुटलेले || ३||

शहाण्याला असे | शब्दांचा मार |
मुर्खाचा बाजार | मांडलासी || ४ ||

काय तुझी निती | केलास कचरा |
माणूस ना बरा | दिसलासी || ५ ||

आपुल्या हाताने | दगड घातला |
मनात सलला | आंतरीक || ६ ||

खोटेपण दिसे | लोकं ही हुशार|
मानवा लाचार | का झालास || ७ ||

अतिहव्यासाचे | रे दुष्परिणाम |
करी घामाघाम | निर्लज्जास || ८ ||

सत्याचे हे सार | सत्य जिंकतसे
नाही लपतसे | खोटेपण || ९ ||

केवढी फजिती | गध्याची होतसे |
लालसा दिसते | गाढवाला || ९ ||

गाढवास काय | गुळाची ती चव |
नाही काय भेव | आंतरिचे || २० ||

तुझे मन ग्वाही | तूच आहे चोर |
परि शिरजोर | ठरलासी || ११ ||

एकदिन ऐसा | उगवेल खास|
सत्याचीच आस | दिसेलगा || १३||

नियतीचा खेळ | आज ना उद्याला |
साथ दे न्यायाला | राहशील || १४ ||

जैसी रे करणी | वैसी रे भरणी |
डोळा येई पाणी | कळेलच || १५ ||

शब्दांचा हा मार | मुर्खास कळेना |
वळता वळेना | बुध्दीलाही || १६ ||

मिनू म्हणे आता | हो बाई सावध |
सत्याचा गे वध | होत असे || १७||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम...

Sunday, September 3, 2023

लुटारूंच्या राज्यात... मुक्तछंद काव्य

*लुटारूंच्या राज्यात* मुक्तछंद काव्य...३/९/२०२३

लुटारूंच्या राज्यात
कुठे लाठीमार
तर कुठे कुठे
माजला भ्रष्टाचार....!!
कुठे पुरस्कारासाठी सेटींग
कुठे वेगळीच बॅटींग 
कुठे लुटारूंचे जाळे
कुठे बनावट कागदपत्रे
कुठे श्रीमंतांचे चाळे
लुटारूंच्या राज्यात
जातीयता माजली
माणुसकीही कशी
माणुसकीला लाजली
लुटारूंच्या राज्यात
सर्व होतं सेटींग
उगाच खेळली जाते
खोटी खोटी बॅटिंग
खालपासून ते वरपर्यंत
सर्व असत़ सेट अप
सर्वांना सर्व कळतं
वरवरचं गेट अप...
संबंध जपायचे वरवर
आपल्याला काय घेणं?
लोकांच्या मनात खळबळ
वरवरचं ते बोलणं...
एक दिवस असा येईल
ईश्वर करेल ना न्याय
संशयाला पालवी फुटते
आणि फुटती हळुवार पाय 
लुटारूंच्या राज्यात
एक दिन येईल ऐसा
हिशोब सगळा चुकता होईल
दिसतो तसा नसतो
अन रूसून बसेल पैसा...
लुटारूंच्या राज्यात....
सोडू नकोस निती
स्वतः नजरेत पडलास
आणि मनी जडली भिती.....!!

  CR...मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.

Saturday, September 2, 2023

माणूस का लाचार आहे? (कविता)

 माणूस का लाचार आहे?* *(कविता*

माणूस का लाचार आहे?
दडला कुठे विचार आहे?

स्वतःच स्वतःच्या नजरेत
कशाला पडतो आहेस?
स्वार्थासाठी किती किती
खोटं खोटं करतो आहेस?

काय खरे काय खोटे?
वरच्या न्यायालयात जाणार आहे
कितीही उड तू हवेत माणसा?
कर्माचा शेवटी हिशोब होणार आहे...!!

जरी डोळे मिटून पिते दूध
जात दब्या त्या मांजराची
कशी पायमल्ली होते?
माणुसकीच्या विचाराची....!!

सगळेच पैशाने विकत
दररोज घेता येत नाही
स्वत:च्या नजरेत पडलेले
पुन्हा कधीच उठता येत नाही...!!

दुर्योधनाचे काय झाले?
जिंकले होते कपटाने
सत्याच्या स़ंगतीला देव
सार सांगितले श्रीकृष्णाने....!!

पाप पुण्याचा हिशोब 
शेवटी तुला मिळणार आहे
राज्यातही तेच चालू आहे 
लोकशाहीला सार कळणार आहे...!
लोकशाहीला सार कळणार आहे....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

Monday, August 28, 2023

आल्या श्रावणाच्या सरी...श्रावणमासातली कविता

 अष्टाक्षरी रचना

शिर्षक -आल्या श्रावणाच्या सरी


आल्या श्रावणाच्या सरी

ओलीचिंब झाली माती

रान शिवार बहरे

डोले गवताची पाती....!!


मनी उल्हास उल्हास

ऊन पावसाचा खेळ

बळी हासतो गालात

जाई शिवारात वेळ.....!!


आल्या श्रावणाच्या सरी

सण पंचमीचा येई

वाट पहाते बहीण

पौर्णिमेला भाऊ येई...!!


आल्या श्रावणाच्या सरी

माय शिवारी राबते

उभ्या पिकावर ध्यान

माय बापाला सांगते...!!


पडे पिकावर अळी

पाठी फवारणी घेतो

घाम गाळुनिया बळी

कष्ट करूनिया खातो....!!


निसर्गाचा सदा ॠणी

हात देवाला जोडतो

शेत पिकू दे विठ्ठला

असे मागणं मागतो....!


आल्या श्रावणाच्या सरी

मन जातं माहेराला

ओढ जरी संसाराची

आस बाईच्या मनाला...!! उजी


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

कोकलगाव,वाशिम


Sunday, August 13, 2023

पक्ष फोडाफोडी (अभंग)

 *पक्ष फोडाफोडी (अभंग क्र.५५)*


राजकारणात | पक्ष फोडाफोडी | 

मतलबी गोडी| वाढतसे ||


एकाच माळेचे | सर्वच पुढारी |

पत्करी लाचारी | सत्तेपायी ||


पक्षाचा हो घात | करी फोडाफोडी|

दिसते लबाडी | जनतेस ||


आपमतलबी | सब बारा टक्के |

मारतसे शिक्के | आपापले ||


आपापली सोय | शेकतसे पोळी |

देऊनिया टाळी | एकमेका ||


शेतकरी राजा | असे संकटात |

कळती का हाक | नेत्यालोकां ||


नविन योजना | फिरते कागदी ||

लाच ती नगदी | मिळवती ||


दहा पिढ्या खाती | गोळा करी धन | 

पुढा-याचं मन | संकुचित ||


शिक्षकांना करा | चालू हो पेन्शन |

|कशापायी टेन्शन | देत असे |


सत्तेपायी करी | पक्ष फोडाफोडी |

विस्कळीत घडी | करतसे| |


ताकाचे ते लोणी | खाण्या टपकती |

सदा एक होती | सत्तेपायी ||


मिनु म्हणे आता | जाग लोकशाही |

आनंदात राही | जनताही ||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

ता.जि.वाशिम

मिनूच्या कविता...: आल्या श्रावणाच्या सरी.... अष्टाक्षरी रचना

मिनूच्या कविता...: आल्या श्रावणाच्या सरी.... अष्टाक्षरी रचना:  अष्टाक्षरी रचना शिर्षक -आल्या श्रावणाच्या सरी आल्या श्रावणाच्या सरी ओलीचिंब झाली माती रान शिवार बहरे डोले गवताची पाती....!! मनी उल्हास उल्ह...

Thursday, August 10, 2023

आल्या श्रावणाच्या सरी.... अष्टाक्षरी रचना

 अष्टाक्षरी रचना
शिर्षक -आल्या श्रावणाच्या सरी

आल्या श्रावणाच्या सरी
ओलीचिंब झाली माती
रान शिवार बहरे
डोले गवताची पाती....!!

मनी उल्हास उल्हास
ऊन पावसाचा खेळ
बळी हासतो गालात
जाई शिवारात वेळ.....!!

आल्या श्रावणाच्या सरी
सण पंचमीचा येई
वाट पहाते बहीण
पौर्णिमेला भाऊ येई...!!

आल्या श्रावणाच्या सरी
माय शिवारी राबते
उभ्या पिकावर ध्यान
माय बापाला सांगते...!!

पडे पिकावर अळी
पाठी फवारणी घेतो
घाम गाळुनिया बळी
कष्ट करूनिया खातो....!!

निसर्गाचा सदा ॠणी
हात देवाला जोडतो
शेत पिकू दे विठ्ठला
असे मागणं मागतो....!

आल्या श्रावणाच्या सरी
मन जातं माहेराला
ओढ जरी संसाराची
आस बाईच्या मनाला...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
कोकलगाव,वाशिम

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...