मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, January 30, 2023

हुंडाबंदी (अभंग क्र.४३)

 हुंडाबंदी (अभंग क्र.४३)

हुंडाबंदी फक्त| म्हणायपुरती |
किती बळी जाती | आज पण ||

कडक कायदा | चालूच पध्दत |
हुंडा हो घेतात | लपवून ||

कारवाई करा | शिक्षा द्या कठोर |
लोकांच्या समोर | येऊ द्यावे ||

झाकून घेतात | आज सुध्दा हुंडा |
घालतात गंडा | वरपिता ||

जनजागृतीची | काढावी मोहीम |
उपाय जालीम | जणू काही ||

सर्वांनी ठरवा | ना घेणार हुंडा |
ना देणार हुंडा | प्रत्येकाने ||

हुंडाबळी आज | जातातच मुली |
जिवानिशी मुली | जात आहे ||

कित्येक ठरल्या | हुंड्याचा शिकार |
लक्ष सरकार | द्यावे जरा ||

घातक ह्या रूढी | मोडून काढूया |
पध्दत मोडूया | समाजात ||

हे शहाणपण | कुणी शिकविले ||
घर बुडविले | गरिबांचे ||

पोरीच्या बापाला | रात्रंदिन घोर |
हुंडा शिरजोर | करू लागे ||

कर्जाचा डोंगर | विकी घरदार |
मोडला संसार | वधुपिता ||

कंबर मोडली | सावकारी कर्ज |
करीतसे अर्ज | कितीवेळा ||

घातक रूढीने | घेतला हो बळी |
हुंड्याची ही अळी | वळवळे ||

करी आत्महत्या | पोरीच्या बापाने |
बळी ह्या हुंड्याने | घेतलासे ||

कित्येक ठिकाणी | होतसे हो छळ |
पडली का कळ | समाजास ||

जनजागृतीचा | आहे रे आभाव |
करूया उठाव | विरोधात ||

मिनू म्हणे आता | शासन कायदा |
कडक कायदा | लक्ष द्यावे ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

Saturday, January 28, 2023

सोड हेवेदावे (अभंग क्र.४२)

 सोड हेवेदावे (अभंग क्र.४२)

सोड हेवेदावे | चांगले वागावे |
आनंदी रहावे | सदाचिया ||

नको करू गर्व | नको अहंकार |
जळाजळी फार | कशापायी ||

आत्मा परमात्मा | नांदे तिथे देव |
आनंदी तू ठेव | सदानंद ||

जळकी ती वृत्ती | काय रे कामाची |
वाढ मीपणाची | होत असे ||

चार दिवसाचे | आपण प्रवासी |
काय जगलासी | विचारांती ||

सोड हेवेदावे | माणुसकी दाव |
कशाला ते नांव | ठेवे कुणी ||

क्षणभंगुर हे |  जीवन माणसा |
नाही ना भरोसा | जीवनाचा ||

चांगले विचार | चांगले आचार |
खरा शिष्टाचार | शोध जरा ||

सोड हेवेदावे | आनंदाने जगा |
उगीचच त्रागा| कशापायी ||

मिनू म्हणे आता | सोड हेवेदावे
आनंदी जगावे | माणसाने ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम...

Monday, January 23, 2023

मनाचे मळभ (अभंग क्र.४०)

 मनाचे मळभ (अभंग क्र.४०)

मनाचे मळभ | करूयात दूर|
जायचे हो भूर्र | एकदिनी ||

आहे तोपर्यंत | आनंदाने जगा |
उगाचच त्रागा | कशापायी ||

निर्मळ मनाने | राहील जो आज |
दिर्घायुष्यी साज | मिळे तया ||

नको जळमटे | पवित्र हे मन |
देवाचेच धन | आहे बघ ||

मनमंदिरात | भगवंत वास |
लाभे सहवास | ठेव ध्यानी ||

आपण सारेच | ईशरूपी पक्षी |
आत्मा आहे साक्षी | प्रत्येकाचा ||

मनातली घाण | काढुनिया टाक |
स्वतःचाच धाक | असू द्यावा ||

निर्मळ मनाने | आनंदे भरीन |
जगण्याचा शीण | जाईल गा ||

मनाची श्रीमंती | जया वसतसे |
निर्मळ होतसे | मन त्याचे ||

दूर फेकुनिया | मनातली घाण |
स्वच्छ आणि छान | ठेव मन ||

मिनू म्हणे आता | खरेखुरे धन |
माणसाचे मन | ठेव ध्यानी ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

Sunday, January 22, 2023

सुखी परिवार (अभंग क्र.३९)

 सुखी परिवार (अभंग क्र.३९)

एकत्र कुटुंब | सुखी परिवार |
आनंदाचे सार | ठेव ध्यानी ||१||

जावा जावा आणि |भाऊ भाऊ गोड |
नसे जगी तोड | सुखाचिया ||२||

एकमेकां राही | जीव लावुनिया |
जाई धावुनिया | संकटात ||३||

सुखी परिवार | असे जिथे नंद |
मिळतो आनंद | घरामध्ये ||४||

नंद भावजय | मैत्रिणी त्या खास |
मोग-याचा वास | जणू वाटे ||५||

सासू सासरे हे | घराचे दैवत |
नजर ठेवत | घरावरी ||६||

सदासुखी राहो | सारा परिवार |
एकतेचे सार | दिसे त्यात ||७||

वाटूनिया कामं | आनंदाने करी |
सुखाची भाकरी | गोड लागे ||८||

करता पुरुष | घराचा आधार |
सुखी परिवार | असतसे ||९||

जीव लावुनिया | रहावे आनंदे |
ना होणार वांदे | कदापिही ||१०||

एकीचे ते बळ | आहे फार मोठे |
जिवनाच्या वाटे | ठेव ध्यानी ||११|

मिनू म्हणे आता | रहावे एकत्र |
जिवनाचे सुत्र | खरेखुरे ||१२||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम






Saturday, January 21, 2023

वेळ कुणासाठी थांबते का?

 वेळ कुणासाठी थांबते का?

ह्दरयातलं दुःख कुणाला दिसते का?
खरं सांगा वेळ कुणासाठी थांबते का? धृ!!

कापरासारखी उडून जाते वेळ
सगळा आहे इथे नियतीचा खेळ
आपण कितीही लावा ताळमेळ
ताळमेळ कधी कुणाचा बसतो का
पण वेळ कुणासाठी थांबते का?

जे जे होईल ते ते फक्त पहात रहायचं
प्रत्येक क्षणाला मात्र साक्षी व्हायचं
कसं जगायचं ते आपलं आपण ठरवायचं
कुणाच्या हातात काही असते का?
खरं सांगा वेळ कुणासाठी थांबते का?

नशिबाचे धागेदोरे लागलेत कुणाच्या हाती
सगळ्यांचीच होणार आहे एक दिवस माती
आपलेच आपल्या कामी येतील नातीगोती
माणुसकीचा धर्म कोणी कधी सोडते का?
खरं सांगा वेळ कुणासाठी थांबते का?

चांगल्या कर्माची चांगली फळे मिळतील
माणसंच इथं माणसांवर जळतील
पक्ष्यांसारखं एक दिवस उडून जातील
पतंगासारखं आयुष्य असते कधी कळते का?
खरं सांगा वेळ कुणासाठी थांबते का?

आजची घडी ठीक चालली म्हणजे झालं का?
संकटं अनेक आहेत म्हणून कोणी हरेल का?
आयत्या गादीवर कधी सुख कुणाला लागेल का?
कष्टाचीच भाकरीची चव कुणी जाणते का?
पण खरं सांगा वेळ कुणासाठी थांबते का?

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
मु.पो.कोकलगाव
ता.जि.वाशिम.

Monday, January 16, 2023

कृष्णाली (भावपूर्ण श्रद्धांजली)

 कृष्णाली (भावपूर्ण श्रद्धांजली)
कवयित्री-मिनाक्षी नागराळे वाशिम


जायचंच जर होतं तर बाळा
इतका जीव का लावलीस?
साधभोळा स्वभाव तुझा
घरातून हसत हसत गेलीस!

परतीच्या प्रवासात बाळा
किती सोसल्यास गं यातना
हळूहळू कशी सोसलीस तू
मंदावत गेल्या जरी चेतना...!!

बाबांची लाडकी परी तू
निस्वार्थी,भोळाभाबडा स्वभाव
आईच्या कुशीतलं पिल्लू तू
आता तुला कुठं कुठं शोधावं?

एका आईचं काळीज बघ
आजही तुला शोधतंय
कृष्णा कृष्णा करत
मन सर्वत्र भटकतय....!!

तुझ्या जिवाचं सोनं झालं
मन भावनेत कसं गुंतलय
तुझ्या आठवणीचे क्षण
मनामनामध्ये जपलय...

तू जरी शरीराने गेलीस निघून
आजही तुझा वास आहे
काळजाच्या खोल कप्प्याआड
दडलेला तुझा सहवास आहे..

आठवणीने तुझ्या कृष्णा
झाल्या ओल्या डोळ्यांच्या कडा
पुष्परूपाने दरवळत रहा अन्
पडो अंगणात प्राजक्ताचा सडा...!!

जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.

Wednesday, January 11, 2023

स्वामी विवेकानंद (अभंग क्र.३८) १२/१/२०२३

 स्वामी विवेकानंद (अभंग क्र.३८)

तरुण तपस्वी | भारतीय पुत्र |
अध्यात्मिक सूत्र | जगा सांगे ||

विद्वान पंडित | योगराज योग |
आणि ज्ञानयोग | ग्रंथ रचे ||

अध्यात्मिक ज्ञान | जगी मिळविले |
विचार चांगले | नरेंद्रचे||

विवेकानंदाचे | विचार प्रभावी |
तरुण तपस्वी | जन्मा आले ||
 
बारा जानेवारी | जन्म त्यांचा झाला |
अध्यात्मिकतेला | जपलासे ||

प्राण्यावर दया | शिकवि बंधूता |
प्रेम सहाय्यता | करीतसे ||

 ज्ञान, धर्म, ऊर्जा | समाज संस्कृती |
 प्रेम शिकविती | जनलोका ||

हिंदुत्व संस्कृती | जपे मनातूनी |
मर्मते जीवनी | मानियले ||

मिनू म्हणे आता | एकच हो इच्छा||
हार्दिक शुभेच्छा |जयंतीच्या ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.शाळा कोकलगाव
९७६७६६३२५७|

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...