मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 2, 2026

असा एक रंग (कविता)

 असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता)

असा एक रंग संस्कारांचा 
आचरणातून दिसावा
रूसवा फुगवा इथे मात्र 
कुणाला कुणाचा नसावा....!! १!!

असा एक रंग 
निर्मळ मनाचा असावा
ह्रदयात शिरूर हळूच
ठाव काळजाचा घ्यावा.....!!२ !!

असा एक रंग 
सा-या जगाला दिसावा
भेदाभेद करूनी उगीच
मोठेपणा,खोटपणा नसावा...!! ३ !!

असा एक रंग 
मायेचा तोलावा जपावा
माणसातला माणूस शोधताना
तिथे ओलावा असावा.....!! ४!!

असा एक रंग
उदार त्यागाचा असावा
डोळ्यांवरचा विश्वास 
कानावरती नसावा......!! ५ !!

असा एक रंग 
ख-याखु-या श्रमाचा असावा
मेहनतीचे खास खाताना 
समाधानाचा असावा....!! ६!!

असा एक रंग
माणसाचा रंग ओळखणारा असावा 
बेगडी या दुनियेत 
स्वार्थाने बरबटलेला नसावा....!! ७ !!

असा एक रंग 
सदा माणुसकीचा असावा
कुणाला कुणी दुखवण्याच्या 
कसला हेतू नसावा.....!! ८ !!

अशा या होळीच्या सर्वांना 
हार्दिक शुभेच्छा....🌹🌹🌹 
कवयित्री 

Sunday, March 1, 2026

https://youtu.be/RpWKh0gRZ6c?si=wAGRN-b3Up4oNDkI

माझ्या मराठीची शान ...

 स्पर्धेसाठी 
साहित्य सेवा प्रकाशन आयोजित काव्य स्पर्धा
दिनांक -२७/२/२०२६
विषय - मराठी भाषा गौरव दिन

शीर्षक - माझ्या मराठीची शान

माझ्या मराठीची शान ,दऱ्याखोऱ्यात नांदते 
बोल मराठीचे श्लोक, तुका, ज्ञानोबा बोलते ...||

माझ्या कवितेला साज, शब्द मराठी लावते 
 बोल मराठीचे थेट, काळजाला हो भिडते....|| 

 माझी बहीणाई, जनी, ओवी जात्यावर गाते 
धमन्याधमन्यातही, माय मराठी वाहते....|| 

 ओवी,भारुड, पोवाडा, साज शृंगारही घेते 
बोल बोबडेही बाळ,  शब्द मराठीत येते...||

बोल कीर्तनाचे रंगी,  साज मराठी लावते 
बोल मराठीचे मृदू , नित्य मनाला भावते ....||

गीत, गझल सुंदर, शब्द झंकार मांडते 
शिवशंभु संस्कारीत, शब्द मोती हे सांडते ...||

माझ्या मराठीची शान, दाही दिशा नित्य गाजे 
माझ्या मराठीचा डंका, साऱ्या जगात हो वाजे....||

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
वाशिम

आदरणीय अनिल पाटील सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

 आदरणीय अनिल पाटील 
 सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..


सदा हसरे व्यक्तिमत्व 
सदा आनंद चेह-यावर
दिलखुलास मनाचा राजा
स्पष्टपणे बोलण्यावर भर....!!

अजातशत्रू स्पष्टवक्तेपणा
देवालाही तोच आवडला 
शाळेवरून येता येता 
कसा काय तो काळ भिडला....?!!

स्वतःहून बोलत इतरांना 
नव्हता कधी कसला गर्व 
शेवटच्या प्रवासाला घाई का 
अन्  दुःखात बुडले सर्व....!!

ताईसाहेब म्हणून हाक तुमची
ऐकू येईल सदा कानी
हरवून गेली अचानक 
अनिल पाटलांची मंजुळ वाणी....!!

निशब्द झालोत आम्ही 
काय बोलावे ते सुचेना
बातमी ऐकून बैचेन झाले अन् 
वास्तव काही रूचेना....!!

असा कसा देवा तू निष्ठूर झालास
निमित्त मात्र बैलाचे केलास
सोन्यासारखा माणूस का मग
आमच्यातून हिरावून नेलास....!!

ताईसाहेबांकडून भावपूर्ण श्रद्धांजली...
मिनाक्षी नागराळे वाशिम 

Friday, February 27, 2026

राजमाता जिजाऊंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा अवलिया म्हणजे श्री महेश देवळे सर

 *राजमाता जिजाऊंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा अवलिया म्हणजे महेश देवळे सर*

       महेश देवळे सर एक उत्तम सूत्रसंचालन करणारे, सदैव चेहऱ्यावर स्मितहास्य करत आपल्या मधुर वाणीतून प्रेक्षकांचे मन जिंकणारे दिलखुलास व्यक्तिमत्व होय. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या कन्येचा नामकरण सोहळा व वाढदिवस अभिष्टचिंतन आणि वाशिम नगरीतल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा सरांनी आयोजित केला होता. 
        आजच्या आधुनिक युगात, मॉडर्न युगात वाढदिवस म्हणले की केक, हार,फुगे,हॉटेल्स बुक करणे, फटाक्यांची अतिशबाजी वगैरे वगैरे मोठ्या धुमधडाक्यांनी  साजरे केले जातात. पण या सगळ्या विचारांना फाटा देत राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचे विचार मराठा सेवा संघाच्या माध्यमातून नसानसात भिनलेले श्री.महेश देवळे सरांनी मुलींचे फक्त नांवच जिजाऊ न ठेवता जिजाऊंचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविले ते म्हणजे त्यांची कन्या तिचे नाव सरांनी जिजाऊ ठेवले. फक्त नावच नाही तर पुरोगामी विचारांना फाटा देत नामकरण सोहळा आयोजित केला या सोहळ्याची सुरुवात सुरसंगीत जिजाऊ वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती सुरेखाताई आरू (विभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड) प्रमुख उपस्थिती सौ. अन्नपूर्णाताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा)  होत्या.जिजाऊ वंदना झाल्यानंतर महेश देवळे सरांच्या मुलींचा म्हणजे कु.जिजाऊ महेश देवळे हिचा नामकरण करण्यात आले...त्यानंतर पाळणा गायनासाठी  जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका कार्यकारिणीच्या भगिणी यांनी जिजाऊ पाळणा गायला ...सुगमसंगीताने प्रेक्षकांची मने जिंकली.तसेच जिजाऊ वंदना सौ सुनिता कढणे,वैशाली बुंधे यांनी जिजाऊ वंदनेचे गायन केले. जिजाऊं वंदना झाल्यानंतर जिजाऊंची रांगोळी अतिशय सुंदर कु.सदिच्छा दत्ता वरखडे यांनी अप्रतिम सुंदर रांगोळी मॉंसाहेब जिजाऊ यांची काढली तर संचालन कु. माधुरी बहादुरे यांनी केले. 
     छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचे विचार फक्त सांगून किंवा ऐकून गप्प न बसता प्रत्यक्ष  कृतीतून उतरावत श्री महेश देवळे सर यांनी ' न भूतो न भविष्यती ' असा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेऊन तो समाजसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.तो म्हणजे वाशिम नगरीतल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला. यामध्ये शिक्षण, राजकारण, समाजकारण, आरोग्य व साहित्य अशा विविध क्षेत्रातील एकूण दहा महिलांचा गुणगौरव स्मृतिचिन्ह शाल देऊन जुनी आयुडीपी मध्ये करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षण व साहित्य यामध्ये मीनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका तसेच उपक्रमशील शिक्षिका व साहित्यिक कवयित्री शिक्षिका ), राजकारण सौ. अन्नपूर्णा ताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष) व सौ पूजा विनोद खंडेलवाल (लोकप्रतिनिधी) आरोग्य- डॉक्टर वैशाली चौधरी व डॉक्टर अर्चनाताई रेघाटे (रुग्णसेवा ), समाजकारण- सो सुरेखाताई आरू सौ. सविताताई बोरकर (जिजाऊ ब्रिगेड वाशिमच्या जिल्हाध्यक्ष) साहित्य - सौ मधुरानी बनसोड (साहित्य )तसेच नवोदित लेखिका-ज्योतीताई देशमुख अशा सर्व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यांना सन्मानचिन्ह, शाल देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सोहळा व वाढदिवसानिमित्त महिलांचा गुणगौरव करण्यासाठी फक्त राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचे विचारच नाहीत तर माणसाचं मन,मनगट,मेंदू सशक्त असावं लागतं इतकंच नाही तर मनही मोठं असावं लागतं. अशा या महेश देवळे सरांच्या कार्याला मानाचा मुजरा... समाजातील लोकांनी सरांचा आदर्श घ्यावा असाच कार्यक्रम महेश देवळे सरांनी केला त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 


लेखिका, कवयित्री समिक्षिका,शिक्षिका,संपादिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम 
(महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित)

Saturday, February 21, 2026

वास्तवाचे भान असावे (गझलसदृश कविता)

 वास्तवाचे भान असावे ( गझलसदृश कविता)

माणसा कधी कुणी कुणावर ना रूसावे
माणसाला सदा वास्तवाचे भान असावे....!!

क्षणिक सुखासाठी जगतो आपण सारे 
फुलपाखरासारखे जीवनगान असावे....!!

आपला आपण कशास करावा गाजावाजा
तू कोण आहेस? सा-यांनाच जाण असावे....!!

मरमर का करतो कुणास ठाऊक गड्या
खुशील जिंदगी ही अन जीवन छान असावे...!!

दुस-यांनी फिदा व्हावे रोज तुझ्यावर 
असे तुझे ते कार्य तितकेच महान असावे....!!

दोन दिवसांची जिंदगी तुझी रे 
पर चारचौघात तुजला मान असावे....!!

मीपणा कधी सोडून तर बघ एकदा 
तेच माणसा सर्वात मोठे ते दान असावे...!!

निघून गेल्यावर आपण, अश्रू व्हावे अनावर 
असे सुवर्ण अक्षरी ते पान असावे....!!

काय घेऊन बसलात वेड्या तू तर थेंब सागराचा
उडू नको हवेत राजा वास्तवाचे भान असावे...!!

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 

Friday, January 23, 2026

मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा

मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा:  शहाणपण थोडे जप पुन्हा  शब्द आहेत अमुल्य वेडे जपून वापर त्याचा कर पुन्हा  शब्द असे दुधारी तलवार सये निर्मळ मनाचा काय गुन्हा....!...

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...