मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

सोड रे व्यसन (अभंग क्र.११)

 *सोड रे व्यसन (अभंग क्र.११)*


तंबाखू गुटखा | जीवाला चुटका |

कशाला मटका | खेळतोस ||


व्यस्नाच्या आहारी | नको तू जाऊस |

दारूची हाऊस | सोड बाबा ||


नासकी ती दारू | आतड्या सडवी |

तोंडातून शिवी | पडे सदा ||


मावा,गांजा,बिडी | कधी सिगारेट |

कंट्रोल रिमोट | बिघडला ||


अशा व्यस्नापायी | खंगेल शरीर |

होईल कॅन्सर | आपोआप ||


मृत्यूच्या दारात | येईल वरात |

त्राण शरीरात | नसे मग ||


मिळणार नाही | मानवाचा जन्म |

चांगले तू कर्म | ठेव गड्या ||


बोलतो बोबडा | तोंडात तोबरा | 

आवाज घोगरा | येत असे ||


पिचकारी मारी | तोंडात रे पान ||

चोहीकडे घाण | थुंकी असे ||


दारूच्या घोटानं | वाटोळा संसार |

बायकोला मार | कशापायी? ||


आरोग्य तू जप | निरोगी शरीर |

सुख भरपूर | येईल हो ||


मिनु म्हणे आता | सोड रे व्यसन |

स्वत:च्या मनानं | हो शहाणा ||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव

वृक्षसंवर्धन (अभंग क्र.१२)

 वृक्षसंवर्धन(अभंग क्र.१२)


वृक्षसंवर्धन | चला रे करूया |

झाडेच लावूया | खूप सारे ||


चला झाडे लावू | झाडे जगवूया |

पाणीही घालूया | सदोदित ||


वृक्षवल्ली आम्हां | सोयरे सकळ |

देत असे फळ | झाडे सदा ||


वृक्षालागवड | आवर्जून करा |

पावसाच्या धारा | येतीलच ||


निसर्गाशी नाते | चला ना जोडूया||

झाडे वाढवूया | खूप खूप ||


शुद्ध हवा देती  | प्राणवायू देती |

फळे फुले देती | सदानंद ||


अनमोल आहे | वृक्षाची सावली ||

ही मायमाऊली | सजीवांची ||


भरपूर पाणी | मंजुळ ती गाणी ||

ऐकू येई कानी | आपोआप ||


आवर्षण टाळू | बदलेल रूप ||

जमिनीची धूप | मिटेल हो ||


पक्ष्यांचा निवारा | फळे फुले मध |

मिळेल औषध | सर्वांसाठी ||


मिनु म्हणे आता | झाडे लावू चला |

माणूस तो भला | जगाचिया ||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

थोर संत गाडगेबाबा (अभंग क्र.१३)

 *थोर संत गाडगेबाबा(अभंग क्र.१३)*


हाती झाडू घेतं | स्वच्छ गाव केले || 

होऊनिया गेले | थोर संत ||


मूळ नाव डेबू | आई सखुबाई |

मामाघरी राही| डेबू सदा ||


गाव शेणगांव | डेबूजी जन्मले | 

किर्तनी दंगले | डेबू संत ॥


शोधला हा देव | माणसाच्या अंगी |

शिकवण जगी | दिले त्यांनी ॥


अंधश्रद्धा नष्ट | फिरे गावोगांव | 

आदराने नांव | जग घेती ॥


चालतीबोलती। डेबूची ती शाळा ।।

अपंगाला लळा | लावितसे ॥


काढी धर्मशाळा | रंजले गांजले ।

त्यांच्यात शोधले | खरा देव ॥


बोल ते मुखात | मडके हातात 

झाडूने झाडत | फिरे डेबू ||


दगडात देव | शोधू नका कोणी | 

साधीच राहणी | राहतसे ॥


ग्रामस्वच्छता हा | आज अभियान | 

राबवी शासन | गावोगावी ॥


जयंतीदिनी मी | करिते नमन |

कार्य ते महान | डेबुजींचे||


कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे

 ता.जि.वाशिम 

मो. ९७६७६६३२५७

जगण्याची धडपड

 *जगण्याची धडपड*


जगण्याची धडपड

माणसाने हो करावी

कष्ट करूनिया नित्य

आस सत्याची धरावी...!!


खावी कष्टाची भाकरी

रोज घाम रे गाळून

आनंदाने जगायचे

सर्व नियम पाळून.....!!


अर्धी भाकरी वाटावी

ओळखावा हो भुकेला

धाऊनिया जावे कधी

कधी गरिबा हाकेला....!!


विसरून जातिभेद

गावू समतेचे गाणे

झाले गेले विसरून

नका काढू उणेदुणे.....!!


एकदाच मिळतोया

जन्म रे हा मानवाचा

लावा सार्थकी सा-यांनी

धर्म हा माणुसकीचा....!!


कधी करावी हो सेवा

कधी ठेवा मुखी नाम

डोळसपणाने जगा

आत्मविश्वास रे ठाम....!!


मिनू म्हणे आता ऐका

करा एक भले काम

विज्ञानाची साथ धरा

अंधश्रद्धेला हो विराम....!!


लाख येवोत संकटे

कधी ना घाबरायचे

आपल्याच खांद्यावर

आपलेच मग ओझे....!!


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

मो.९७६७६६३२५७

करा तडजोड (अभंग क्र.१४)

 *करा तडजोड (अभंग क्र.१४)*


करा तडजोड आयुष्यात थोडी

वाढेलच गोडी जीवनात


अपेक्षांचे ओझे ठेवावेत कमी

आनंदाची हमी मिळेल गा


सुखाची भाकर आनंदाने खावी

सुखाची पालवी फुटेल रे


संयमाने वागा करा तडजोड

भागवा रे नड कधी मधी


आयुष्याच्या वाटे अंगी ठेवा शिस्त 

ना कोणाचे हस्त ध्यानी ठेवा


ऐकावे जनाचे करावे मनाचे

सुखी जीवनाचे सुत्र छान


काटकसरही आवर्जून करा

सुखाची घागर भरूयात


स्वप्न जरी मोठे प्रयत्नांनी भरू

साकार हो करु भावी पिढी


करा तडजोड राहू नका दुःखी

जगी तोच सुखी राहिल गा


मिनु म्हणे आता ठेव ध्यानी बोल

कशाला अबोल रहायचे


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम.

९७६७६६३२५७

नको भ्रष्टाचार (अभंग क्र.१५)

 *नको भ्रष्टाचार(अभंग क्र.१५)


नको भ्रष्टाचार | ठेवा शिष्टाचार |

चांगले आचार | जिवनात ||


राजकारणात | खोटी अश्वासने |

जिंकतात मने | लोकांचे हो ||


फसवाफसवी | वाढत चालली|

जनता भुलली | प्रलोभनी ||


नविन योजना | ती कागदावरी |

बोलतो पुढारी | नेटानेच ||


रस्त्यात हो खड्डे|  खड्ड्यांचा रे देश|

पुढा-याचा जोश |वाढतोच ||


टेबलाखालून | घेतात रे नोटा |

तुडवीतो वाटा | भ्रष्टाचारी ||


इडीची चौकशी | लपविती धन

सैरभैर मन | आपसूक ||


रस्त्यात घोटाळा | निधीत घोटाळा |

धंदाच हो काळा | फसव्यांचा ||


शरीफ ते चोर | वर शिरजोर|

हे हरामखोर | असतात||


मिनु म्हणे आता | चुकीचं वागणं|

कुत्र्याचं जगणं | सोडा सोडा ||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

स्थापू समानता (अभंग क्र.१६)

 *स्थापू समानता(अभंग क्र.१६)


स्थापू समानता | मिटवूया दरी |

नको सल उरी | कसलीही ||


स्त्रीपुरूष चाके | संसाररथाची |

साथ एकोप्याची | असू द्यावी ||


काळा आणि गोरा | नको भेदभाव |

मन ही पहावं | तपासूनी ||


एकाच देवाची | लेकरे हो सारी |

जन्माची ही वारी | बा विठ्ठला ||


गरीब-श्रीमंत | मिटवूया दरी |

भावना ही बरी | असू द्यावी ||


उच-निच नाही | जगात या कोणी |

समतेची गाणी | गावूयात ||


सानथोर सारे | ठेवा एक ध्यानी |

नको मनमानी | आपुलीच ||


जात धर्म पंथ | मानवाने केले |

वर्ण ही निर्मिले | स्वार्थापोटी ||


सोडून द्या सारे | स्थापू समानता |

मानवी एकता | जोडू चला ||


मिनु म्हणे आता | धाव बा विठ्ठला |

विनविते तुला | पांडुरंगा ||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...