मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Saturday, April 1, 2023

गरिबी वाईट (अभंग क्र.५०)

 गरिबी वाईट(अभंग क्र.५०)

गरिबी वाईट | कष्टाची झालर |
बदले लकीर | वाट पाही ||

मेहनती फळ | देवास साकडे |
दोन्ही कर जोडे| सदाचिया ||

मन मारूनिया | त्याग करूनिया |
न घालवी वाया | कदापिही ||

गरिबी जाणिव |  खर्चावे तोकडे |
जीवनाचे कोडे | त्यास पडे ||

आहे त्यात मानी | सदाचिया सुख |
मारीतसे भूक | अधीमधी ||

मेहनत अंगी | जिद्द चिकाटीने |
कर सातत्याने | सदाचिया ||

ती काटकसर | ठेव थोडी ध्यानी ||
नको मनमानी | आपुलीच ||

थेंबे थेंबे साचे | धनाचे ते तळे |
जीव तळमळे | गरीबाचा ||

धनाने गरीब | मनाची श्रीमंती |
कर हो जुळती | तेथे माझे ||

मिनू म्हणे आता | गरीबी वाईट |
लक्षात ही गोष्ट | ठेव सदा ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि. प.प्राथमिक शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.

स्वप्नांची दुनिया (अभंग क्र.४९)

 स्वप्नाची दुनिया (अभंग क्र.४९)

स्वप्नाची दुनिया | दुनियेत मग्न |
करूनिया लग्न | होत असे ||

बदलती मुलं | लग्न झाल्यावर |
येते जिवावर | मायबाप ||

दुनियेत गुंग | विसरती आप्त |
कर्तव्य ते लुप्त | करूनिया ||

एकत्र कुटुंब | विसरले सारे |
विभक्ताचे वारे | वाहू लागे ||

पत्नी आल्यावर | मायबाप जड |
हाडाची त्या काड | करूनिया ||

पोटचा तो गोळा | विभक्त राहतो |
गुणगान गातो | जगाचिया ||

पत्नी आल्यावर | विसरी बहीण ||
ती पाठराखीण | असे खरी ||

जाणा मायबाप | खरी ईशसेवा |
मिळेल हो मेवा | जिवनात ||

लावावे हो जीव | करावे चांगले |
होईल हो भले | माणसाचे ||

आनंदाने ठेवा | ह्या मायबापांना |
मुक्ती त्या पापांना | मिळेल गा ||

ईषरूपी असे | तुझे मायबाप |
पुण्य ते अमाप | कर्तव्याने ||

मिनु म्हणे आता | कर्तव्य हो श्रेष्ठ |
नितीमत्ता भ्रष्ट | नको करू ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम

एप्रिल फूल...

 एप्रिल फूल

विश्वासाला देऊन झूल
कशाला करता गड्या हो एप्रिल फूल?
नको गड्या असा जिवघेणा खेळ
एक एप्रिलला बसत नाही मेळ
उगाचच खोटंनाटं बोलायचं
दुस-याचा जीव टांगणीला लावायचं
कशाला असल्या खेळाच्या मागे लागायचं
मस्त मजेत रोज जगायचं...
येणा-या प्रत्येक दिवसाचं
आनंदाने स्वागत करायचं...
नको मजाक नको थट्टा
एखाद्याच्या जिवाला उगी चटका
कितीही भला असेल दोस्त
नका ठेवू पटकन विश्वास...
एखाद्याचा रोखून श्वास....
नको असा जिवघेणा खेळ
कशाला टाईमपास बरबाद वेळ
कुणी काढलं हा खेळ
कुणास ठाऊक....
कुणी केलं एप्रिल फूल तर
नका होवू भावूक....
विश्वासाला देऊन झूल
कशाला करता गड्या हो एप्रिल फूल...

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
१एप्रिल २०२३

Wednesday, March 22, 2023

कवितादिनानिमित्त कविता

 Date: 21 Mar 2023

कवितादिनानिमित्त कविता 

कवीचं लाडकं बाळं असते कविता
अंतरमनाला जोडलेली नाळं असते कविता
मार्मिक शब्दांची माळ असते कविता
तर कधी किर्तनातली टाळ असते कविता...

तेज शब्दांची तलवार असते कविता
कधी सपासप केलेला वार असते कविता
कधी मृदू मुलायम शब्दफुलांचा हार असते कविता
तर कधी विद्रोहाने केलेला प्रहार असते कविता....

संकटकाळी एखाद्याचा आधार असते कविता
कधी आनंदाने पावसातली धार असते कविता
कधी शब्दांचा बाजार असते कविता
तर कधी लाडका परिवार असते कविता...

कधी शब्दांची ढाल असते कविता
तर कधी गीतातली ताल असते कविता
आसुसलेल्या डोळ्यांतली जहाल असते कविता
तर कधी प्रियेसीचा महाल असते कविता...

कधी अंतरातली हाक असते कविता
समोरच्याला कधी धाक असते कविता
कधी शाळेतला बाक असते कविता
कधी साहित्य रथाचा चाक असते कविता....

कधी अभंगातले चरण असते कविता
मेल्यावर पेटलेले सरण असते कविता
जगण्यातल्या अस्तित्वाचं मरण असते कविता
मानवी जिवनाचं पुनर्भरण असते कविता...

तिच्यातली ती असते कविता
तर कधी त्याच्यातला तो असते कविता
तिला आणि त्याला जोडणारा पूल असते कविता
तर कधी अंगणात दुडदुडणारं मूलं असते कविता...

शब्दांनी शब्दांना पाडलेली भूल असते कविता
नेहमीच कवीच लाडकं मूल असते कविता....!!

कवीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम...

---
Shared using https://www.writediary.com/getapp

Saturday, March 4, 2023

स्त्रीयांचे शिक्षण (अभंग क्र.४८)

 स्त्रीयांचे शिक्षण (अभंग क्र.४८)

स्त्रीयांचे शिक्षण | प्रगत लक्षण|
सुधारी जीवन | सर्वांचिया |

समस्त स्त्रीयांनी | शिक्षण हो घ्यावे |
प्रगत बनावे | जीवनात ||

व्यापून टाकले | सारे क्षेत्र आज |
प्रगतीचा साज | चढलासे ||

 स्त्रीशिक्षणाचे बी | साऊने रोवले|
बीज अंकुरले | आज सारे ||

शिकल्या हो मुली | काळोख संपला |
बदल होत झाला | शिक्षणाने ||

सुधारली मती | नोकरी लागल्या |
स्त्रीयाही जागल्या | शिक्षणाने ||

व्यापूनी टाकले | प्रत्येक हो क्षेत्र |
ठरल्या रे पात्र | सा-या मुली ||

शिकल्या टिकल्या | वाचले पुस्तक |
सुधारे मस्तक | शिक्षणाने||

वाघिणीचे दूध| शिक्षण रे आहे |
स्वावलंबी राहे | समस्त स्त्री ||

सबला बनल्या | झाल्या कलेक्टर
सांभाळी पदर | मातृत्व ही ||

ज्योती साऊचेच | आज उपकार |
स्वप्न गे साकार | कर तुझे ||

मिनू म्हणे हर | कर तू काबीज |
होऊ दे गे चीज| जीवनाचे ||


कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम

Wednesday, February 22, 2023

मायेचा ओलावा (अभंग क्र.४८)

 मायेचा ओलावा (अभंग क्र.४७)

मायेचा ओलावा | आटला गे बाई |
नाही जगी आई | शोधू कुठे ||

आईची ममता | अफाट अपार |
करूणा सागर | आई असे ||

ह्रदयात जागा |नाळ जोडलेली |
कळी गर्भातली | मी गे आई ||

तुझ्या कुशीतली | उब आठवते |
भरूनिया येते | मन माझे ||

हवा होता आज | मायेचा गे हात |
असा कसा घात | केला देवा ||

नाही भेटणार | माया रे आईची |
काहीली मनाची | सोडवा गा ||

आवडली तुज | माझी प्रिय आई |
घेऊनिया जाई | तू रे देवा ||

पोरकं केलंस | आम्हां भावंडांना |
नाही वडीलांना | ठेवलास ||

मायेचा ओलावा | अटूनिया गेला |
प्रत्येक क्षणाला | आठवण ||

आईची शिदोरी | जन्मभर पुरो |
दुर्दैव रे सरो | आमुचेही ||

आई होती माझ्या | जिवनाचा साज |
हरपली आज | आई माझी ||

मिनू म्हणे आता | हरवली मुर्ती |
जगाचिया किर्ती | उरलासे ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.

Friday, February 17, 2023

मिनाक्षी नागराळे यांना पुणे येथील सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार जाहीर

 *मिनाक्षी नागराळे यांना सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार जाहीर.*

सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराची सुरूवात केली आहे.शिक्षकांमधील शैक्षणिक उत्तरदायित्व, शैक्षणिक काम, सामाजिक काम, साहित्यिक रुची, समाजासाठी स्वतः चे अर्थिक योगदान, स्वतःची वाढवलेली शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टींचा विचार करून ट्रस्टच्या वतीने निवड केली जाते.यावर्षी साधारण ७०प्रस्ताव महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांकडून प्राप्त झाले होते त्यातील सर्वोच्च २०शिक्षक निवड समितीने निवडले आहेत.दरवर्षी प्रस्ताव न मागवता एक विशेष पुरस्कार दिला जातो तो यावर्षी अक्षरनंदन शाळेचे आदर्श शिक्षक अनिल आंधळे यांना जाहीर झाला आहे.
    ही माहिती प्रकल्प प्रमुख सोपान बंदावणे,कार्यकारी विश्वस्त राधाताई शिरसेकर,सुरेश धनकवडे,प्रभा गोगावले, रजनीताई धनकवडे,ज्योती मते,संगिता गोवळकर यांनी दिली . पुरस्कार वितरण रविवार दि १२मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध साहित्यिक व ९५व्या साहित्य संमेलन अध्यक्ष मा भारत सासणे यांच्या उपस्थितीत उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ,पुणे येथे सायं ४वा संपन्न होणार आहे.
      पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी.
१)अनिल आंधळे, अक्षरनंदन,शाळा,पुणे-विशेष पुरस्कार
२)गोकूळ पाटील,जि प शाळा निकुंभे,जि - धुळे
३) सुनिता काटम,जि प शाळा वडगाव बांडे ता -दौंड, पुणे
४)ललिता कारंडे,दां स रेणावीकर विद्यामंदिर सावेडी, अहमदनगर
५) विठ्ठल जाधव,जि प प्रा शाळा उकीर्डा चकला, शिरूर कासार बीड
६)स्पृहा सुरेश इंदू, चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्रा शाळा चेंबूर, मुंबई
७) अनुराधा केदार,जि प प्रा शाळा रांजणी,ता पाथर्डी अहमदनगर
८) नितीन मोटे शिवछत्रपती विद्यालय वडगाव बु पुणे
९) संतोष लिमकर, जि प प्रा शाळा लोहटा,ता कळंब,उस्मानाबाद
१०)प्रिती जगझाप, जि प उच्च प्राथमिक शाळा बामणी, बल्लारपूर जि चंद्रपूर
११) बळीराम जाधव,जि प प्रा शाळा भुतवडा, जामखेड जि अहमदनगर 
१२)ज्योती पोकळे,शिशुविहार प्रा शाळा एरंडवणा,पुणे
१३) लक्ष्मण कावळे,एन व्ही एस मराठवाडा प्रा शाळा जि परभणी
१४) नर्मदा कनकी, नू. म.वि मराठी शाळा सोलापूर
१५)मिनाक्षी नागराळे,जि.प. प्रा.शाळा कोकलगाव,ता.वाशिम जि - वाशिम
१६)आरूंधती फल्ले,जि प प्रा शाळा सूस,ता मुळशी जि,पुणे
१७) श्रीकांत देवकर,पं दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर म न पा शाळा क्र 74जी ,पुणे
१८) रंजना पवार,गेनबा सोपानराव मोझे प्रा प्रशाला येरवडा,पुणे
१९) हेमलता चव्हाण कै डॉ य ग शिंदे विद्यानिकेतन मनपा शाळा कात्रज,पुणे
२०) मनिषा कदम, नवीन मराठी शाळा शनिवार पेठ ,पुणे
२१) सुवर्णा रेणुसे,मनपा शाळा क्र 95जी कोंढवा बु,,पुणे
     नुकताच या वर्षीचा मिनाक्षी नागराळे यांनी नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक पटकावला आहे.त्यांचे अनेक नवोपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत.अत्यंत मोलाचा समजला जाणारा सुमतीबाई गोरे ट्रस्टचा  राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...