मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Saturday, April 1, 2023

पुढारी ऐटीत,(अभंग क्र.५३)

 पुढारी ऐटीत (अभंग क्र.५३)

पांढरे कपडे | पुढारी ऐटीत | 
हात फिरवीत | दाढीवर ||

राजकारणाचे | एकच ते वेड |
कोल्हा तो लबाड |  जणू वाटे ||

आपल्याच ओढी | भाकरीला दाळ | 
गरीबांचा काळ | वाईटच ||

मतदानासाठी | जोडतोया हात |
तो विश्वासघात | करतसे ||

पुढारी नसतो | गरीबांचा वाली |
खोटे हास्य गाली | त्यांच्या नित्य ||

ढेरीचा तो घेर | नित्य वाढतसे |
फुका बोलतसे | घळघळ ||

कागदावरच | सगळ्या योजना |
पैसाच पुरेना | तरीही हो  ||

घरकुलं खाई | ती स्मशानभूमी |
अश्वासना हमी | सदा देई ||

बसून खातील | एवढं ओढीतो | 
हात रे जोडितो | सदाचिया ||

मोहमाया सारी | जमवी पुढारी |
कसली लाचारी | असे देवा ||

मिनू म्हणे आता | जाणते पुढारी |
दाखवी हुशारी |  लोकांचिया ||

 कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि ‌प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

प्रभू जय सिताराम (अभंग क्र.५२)

 प्रभू जय सिताराम(अभंग क्र.५२)

अयोध्येचा राजा | जय हो श्रीराम |
मुखी रामराम | जनाचिया ||

आदर्श तो राजा | वचन ते थोर |
कौशल्याचा पोरं | दयावान ||

 दशरथ राजा | ज्येष्ठ पुत्र राम |
अयोध्या हे धाम | पुज्यनीय ||

एकवचनी ते | रामाचा तो त्याग |
वनवास भाग | नशिबात ||

राम लक्ष्मण ह्या | बंधुचे जे प्रेम |
भरताचे सेम | बंधुप्रेम ||

सितेची कहाणी | फिरे अनवाणी |
विरहाचे पाणी | डोळ्यांमधी ||

त्यागाचे प्रतीक | आदर्श तो राजा |
रावणास सजा | आपसुक ||

गर्वाचे हरण | गर्विष्ठ रावण |
पतीत पावण | सिताराम ||

चौदा वर्ष भोग | कसा वनवास |
त्रास भोगलास | किती देवा |

देवादिकासही | होता ना हो त्रास |
सत्याची ती कास | सोडली ना ||

संकटात नाम | घ्यावे मुखी राम | 
बोला रामराम | नियमित ||

मिनू म्हणे आता | आठवावे रूप | 
आज्ञा स्वरुप | प्रभू राम ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.

नको अवर्षण (अभंग क्र.५१)

 नको अवर्षण (अभंग क्र.५१)

नको अवर्षण | बा धाव विठ्ठला |
हात तुझे ढगा | लाव देवा ||

चिंतातूर बळी | आसुसले डोळे |
पिकू देत मळे | गरीबांचे ||

झोपडीत माझ्या | ये रे बा विठ्ठला |
उपाशी झोपला | बाळ माझा ||

नको पाहू अंत | बरस गा देवा |
सुखाचा तो मेवा | मिळेल गा ||

करपली पिकं | कर्ज होतं डोई |
 जीव मग देई | कर्जापायी ||

डोईजड झाले |  ऐक गा-हाणे ||
एकच मागणे | ठेव ध्यानी ||

जगाचा पोशिंदा | शेतकरी राजा |
भाजीपाला ताजा | मिळे जगी ||

पडू दे पाऊस | संपव परीक्षा |
बस झाली शिक्षा | आजवरी ||

तूच पाठीराखा | विनवणी तुम्हां |
असा काय गुन्हा | झाला माझा ||

मिनू म्हणे आता | पाड गा पाऊस |
मनाची हाऊस | पुरवावी ||

माझा बा विठ्ठला| मायाळू दयाळू |
नित्य रे ओवाळू| तूच दाता ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम

गरिबी वाईट (अभंग क्र.५०)

 गरिबी वाईट(अभंग क्र.५०)

गरिबी वाईट | कष्टाची झालर |
बदले लकीर | वाट पाही ||

मेहनती फळ | देवास साकडे |
दोन्ही कर जोडे| सदाचिया ||

मन मारूनिया | त्याग करूनिया |
न घालवी वाया | कदापिही ||

गरिबी जाणिव |  खर्चावे तोकडे |
जीवनाचे कोडे | त्यास पडे ||

आहे त्यात मानी | सदाचिया सुख |
मारीतसे भूक | अधीमधी ||

मेहनत अंगी | जिद्द चिकाटीने |
कर सातत्याने | सदाचिया ||

ती काटकसर | ठेव थोडी ध्यानी ||
नको मनमानी | आपुलीच ||

थेंबे थेंबे साचे | धनाचे ते तळे |
जीव तळमळे | गरीबाचा ||

धनाने गरीब | मनाची श्रीमंती |
कर हो जुळती | तेथे माझे ||

मिनू म्हणे आता | गरीबी वाईट |
लक्षात ही गोष्ट | ठेव सदा ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि. प.प्राथमिक शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.

स्वप्नांची दुनिया (अभंग क्र.४९)

 स्वप्नाची दुनिया (अभंग क्र.४९)

स्वप्नाची दुनिया | दुनियेत मग्न |
करूनिया लग्न | होत असे ||

बदलती मुलं | लग्न झाल्यावर |
येते जिवावर | मायबाप ||

दुनियेत गुंग | विसरती आप्त |
कर्तव्य ते लुप्त | करूनिया ||

एकत्र कुटुंब | विसरले सारे |
विभक्ताचे वारे | वाहू लागे ||

पत्नी आल्यावर | मायबाप जड |
हाडाची त्या काड | करूनिया ||

पोटचा तो गोळा | विभक्त राहतो |
गुणगान गातो | जगाचिया ||

पत्नी आल्यावर | विसरी बहीण ||
ती पाठराखीण | असे खरी ||

जाणा मायबाप | खरी ईशसेवा |
मिळेल हो मेवा | जिवनात ||

लावावे हो जीव | करावे चांगले |
होईल हो भले | माणसाचे ||

आनंदाने ठेवा | ह्या मायबापांना |
मुक्ती त्या पापांना | मिळेल गा ||

ईषरूपी असे | तुझे मायबाप |
पुण्य ते अमाप | कर्तव्याने ||

मिनु म्हणे आता | कर्तव्य हो श्रेष्ठ |
नितीमत्ता भ्रष्ट | नको करू ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम

एप्रिल फूल...

 एप्रिल फूल

विश्वासाला देऊन झूल
कशाला करता गड्या हो एप्रिल फूल?
नको गड्या असा जिवघेणा खेळ
एक एप्रिलला बसत नाही मेळ
उगाचच खोटंनाटं बोलायचं
दुस-याचा जीव टांगणीला लावायचं
कशाला असल्या खेळाच्या मागे लागायचं
मस्त मजेत रोज जगायचं...
येणा-या प्रत्येक दिवसाचं
आनंदाने स्वागत करायचं...
नको मजाक नको थट्टा
एखाद्याच्या जिवाला उगी चटका
कितीही भला असेल दोस्त
नका ठेवू पटकन विश्वास...
एखाद्याचा रोखून श्वास....
नको असा जिवघेणा खेळ
कशाला टाईमपास बरबाद वेळ
कुणी काढलं हा खेळ
कुणास ठाऊक....
कुणी केलं एप्रिल फूल तर
नका होवू भावूक....
विश्वासाला देऊन झूल
कशाला करता गड्या हो एप्रिल फूल...

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
१एप्रिल २०२३

Wednesday, March 22, 2023

कवितादिनानिमित्त कविता

 Date: 21 Mar 2023

कवितादिनानिमित्त कविता 

कवीचं लाडकं बाळं असते कविता
अंतरमनाला जोडलेली नाळं असते कविता
मार्मिक शब्दांची माळ असते कविता
तर कधी किर्तनातली टाळ असते कविता...

तेज शब्दांची तलवार असते कविता
कधी सपासप केलेला वार असते कविता
कधी मृदू मुलायम शब्दफुलांचा हार असते कविता
तर कधी विद्रोहाने केलेला प्रहार असते कविता....

संकटकाळी एखाद्याचा आधार असते कविता
कधी आनंदाने पावसातली धार असते कविता
कधी शब्दांचा बाजार असते कविता
तर कधी लाडका परिवार असते कविता...

कधी शब्दांची ढाल असते कविता
तर कधी गीतातली ताल असते कविता
आसुसलेल्या डोळ्यांतली जहाल असते कविता
तर कधी प्रियेसीचा महाल असते कविता...

कधी अंतरातली हाक असते कविता
समोरच्याला कधी धाक असते कविता
कधी शाळेतला बाक असते कविता
कधी साहित्य रथाचा चाक असते कविता....

कधी अभंगातले चरण असते कविता
मेल्यावर पेटलेले सरण असते कविता
जगण्यातल्या अस्तित्वाचं मरण असते कविता
मानवी जिवनाचं पुनर्भरण असते कविता...

तिच्यातली ती असते कविता
तर कधी त्याच्यातला तो असते कविता
तिला आणि त्याला जोडणारा पूल असते कविता
तर कधी अंगणात दुडदुडणारं मूलं असते कविता...

शब्दांनी शब्दांना पाडलेली भूल असते कविता
नेहमीच कवीच लाडकं मूल असते कविता....!!

कवीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम...

---
Shared using https://www.writediary.com/getapp

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...