मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Sunday, October 16, 2022

स्वच्छता करूया...(चित्रकाव्य)

 स्वच्छता करूया

स्वच्छतेचा मूलमंत्र ध्यानी धरूया
चला दोस्तहो स्वच्छता करूया....!!धृ ||

केरकचरा साफ करूया
आपले अंगण, स्वच्छ ठेवूया
बागबगिच्या झाडे लावूया
निर्मळ, सुंदर बगीचा बनवूया...

अस्वच्छ जर असेल अंगण
होतील खूप सारे मच्छर
डेंग्यू,मलेरियाला नको आमंत्रण
चला झाडू हाती धरूया....!!१||

सुंदर झाडे, सुंदर वेली
येतील सारे पक्षी अंगणी
नानाविध फुले बहरतील
फुलपाखरे सारे भिरभिरतील...
           त्यांच्यासवे चला गाणे गाऊया...||२||

स्वच्छता आहे खूप महत्त्वाची
रोगराई  दूर पळवण्यासाठी
स्वच्छ, सुंदर, शुध्द हवा
महत्त्वाची आहे आरोग्यासाठी..
          सा-यांनी हे ध्यानी ठेवूया....||३||

कचराकुंडीत कचरा टाकून
त्यापासून गांडूळ खत तयार करू
झाडावेलींना सेंद्रिय खत देऊ
फुललेला निसर्ग पाहू.......||४||
             स्वच्छतेचा मूलमंत्र ध्यानी धरूया
              चला दोस्त हो स्वच्छता करूया....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

Saturday, October 15, 2022

जागतिक अन्नदिन...अन्न वाचवा



जागतिक अन्नदिन*

वाया नका घालवू अन्न
अन्न हेच आहे पुर्णान्न
ज्याच्या पोटी भुकेचा गोळा
अन्नासाठी फिरे वनवन...!!

ज्याला मिळते मुबलक अन्न
नासाडी करून  नको गाजावाजा
एका एका दाण्यासाठी इथे
घाम गाळतो माझा बळीराजा...

अपार मेहनत बळीराज्याची
जाणिव प्रत्येकांनी ठेवा
जितकं लागेल तेवढंच घ्या
मग प्रसन्न मनाने जेवा....!!

शिळंपाकं फेकू नका हो
अन्न घालवू नका वाया
गोरगरिबांना अन्नदान करा
येऊ द्या कधी दयामाया....!!

अन्नासाठी करती सारे
वितभर पोटासाठी मरमर
अन्नाचा आदर करा रे
जीवन होईल सदा सुखकर...!!

भुकेल्या पोटी घास द्यावा
पशुपक्ष्यांना मुठभर दाणे
जेवढे दिले आयुष्य जग माणसा
आणि सदा रहावे आनंदाने....!!

कण कण वेचती पक्षी अन्न
अन्नाची नासाडी कधी करू नका
उरले सुरले फेकू नका ना
पशू पक्ष्यांच्या मुखी घास द्या.

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथमिक शाळा.ककोकलगाव
ता.जि.वाशिम.


Tuesday, October 11, 2022

एक मनीमाऊ


 एक मनीमाऊ


शहरातल्या घरामध्ये

गेली एक मनीमाऊ

लागली होती भूक 

करू लागली म्यॅंव म्यॅंव ss


सारे काही कपाटात 

कसले ते फर्निचर ?

भुकेने व्याकुळला जीव 

आतड्यात होई चर्र चर्र र|


पूर्वीचा काळ बरा होता 

डोळ्यात आले पाणी

आजी सुद्धा गोड गायची

मनीमाऊची गाणी ...


मुक्या प्राण्यावर माया होती 

पाळायचे घरात दोन-चार प्राणी 

वृद्धच गेली वृद्धाश्रमात 

मनीमाऊची कोणी गाईल गाणी ?


घरभर फिरून झाले 

मिळाले नाही मनीला काही 

भुकेने व्याकुळला जीव 

पोटात होती लाही लाही ...!!


नको मजला शहर बाई

 मनीने ठोकले गावाकडे धूम ss

गावच आपला बरा बाई 

मनी झाली घामाघूम...!!


शेवटी एकदा खेडे गाठले 

भरपूर दूध मनीला मिळाले 

आजही खेड्यात माणुसकी नांदते 

शेवटी मनीमाऊला मर्म कळाले...!!


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

आठवणींचं ओझं (मिनुच्या कविता)

 *आठवणींचं ओझं*

आठवणींचं ओझं
नसतं कधी उतरायचं
एकमेकांत गुंतून
नसतं कधी विसरायचं...

आपलीच नातीगोती
जिवापाड जपायचं
संकटकाळात सदा
धावतपळत जायचं....

तीनही ॠतूमध्यें
आनंदाने जगायचं
आपल्याच पाठीवर
आपले ओझं वहायचं...

 हसतमुख चेहरा
सदा ठेवून रहायचं
भलबुरं काय ते
आपलं आपण ठरवायचं...

चांगल्या कर्माची
चांगली फळं चाखायचं
सुखदुःखात आपल्यांना
नाही कधी विसरायचं....

काही घडो राजकारणात
आपण मस्त जगायचं
निसर्गाला एकदा
भरभरून पहायचं.....

कोण छोटा कोण मोठा
ज्याने त्याने ठरवायचं
इतरांच्या फंद्यात
कशाला उगीच पडायचं....

चारदिवसाची जिंदगी
आनंदात जगायचं
विनाकारण दुसऱ्याला
कशाला दोष द्यायचं.....

कोण श्रीमंत कोण गरीब
कशाला उगी पहायचं
अधातमधात न पडता
आपलं आपण जगायचं...

माणूसजन्म पुन्हा नाही
ध्यानी सदा ठेवायचं
माणुसकी जपायची
माणूसपण टिकवायचं....

भलेभले आलेगेले
आपण साक्षी व्हायचं
स्वार्थ्याच्या गर्तेत
नाही कधी अडकायचं...|

मोहमाया सारी
नाही इथं बसायचं....
कधीतरी स्वत:साठी
मस्त मजेत जगायचं...

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
कोकलगाव
९७६७६६३२५७
mpn1412@gmail.com

Monday, September 19, 2022

सैराट झालेल्या तरुण पिढीला सजग करणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं?

 सैराट झालेल्या तरूण पिढीला सजग करणारी कादंबरी- ‘तिचं काय चुकलं?’

      प्रेम ही एक नैसर्गिक, तारुण्यसुलभ भावना आहे. आजपर्यंत प्रेमावर अनेक साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालेले आहे. जात, धर्म, प्रांत, देश-वेश या पलिकडे जाऊन प्रेमाने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. प्रेमावर जेवढी बंधने लादली गेलीत तेवढी ती झुगारून देऊन प्रेम अधिक घट्ट बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण याच बरोबर त्याची दुसरी गंभीर बाजू व त्याचे परिणाम याचा विचार आजची तरुण सुशिक्षित पिढी करताना दिसत नाही. पूर्वीसारखी परिस्थिती आता जरी राहिलेली नाही तरी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा अतिशय नाजूक व गंभीर विषय आहे. याच विषयावर आधारित माणसाला माणुसकीची लाज वाटावी अशा क्रूर क्रौर्याचा पर्दाफाश करणारी कादंबरी म्हणजे ‘तिचं काय चुकलं?’
       विदर्भाच्या मातीत जन्मलेले सुप्रसिद्ध कादंबरीकार संजय महल्ले यांची विज्ञानाधारित कादंबरी ‘काइमेरा’, वर्‍हाडी कथासंग्रह ‘गावगप्पा’ त्यानंतर माणसाला अंतर्मुख करायला लावणारी कादंबरी म्हणजे ‘तिचं काय चुकलं?’ ही वाचनात आली आणि अक्षरश: मी वाचनवेडी झाले. ही कादंबरी जो कुणी वाचेल तो वाचक कादंबरी संपल्याशिवाय सोडणार नाही, अशी ही कादंबरी ‘तिचं काय चुकलं?’ या कादंबरीचे प्रकाशन मेधा पब्लिकेशन हाऊस यांनी प्रकाशित केली असून प्रकाशक हा एक उमदा लेखक सुद्धा असू शकतो याची प्रचिती मला आली. या कादंबरीची पहिली आवृत्ती एक जून 2022 रोजी प्रकाशित झाली असून ही कादंबरी वाचकाला वेळ लावल्याशिवाय राहत नाही इतका खोल मतितार्थ यात लपला आहे. मुखपृष्ठ अतिशय मर्मभेदी व विचार करायला लावणारे आणि  वाचकांची उत्सुकता निर्माण करणारे आहे. सैतानांच्या क्रौर्याला बळी पडलेल्या सर्व भगिनींना ही कादंबरी लेखक संजय महल्ले यांनी अर्पण केली आहे.
         आपला भारत देश आज कितीही प्रगत झाला तरी जाती, धर्माची कीड माणुसकीला पोखरत आहे. या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने समाजातील विकृत अशा सैतानांच्या क्रौर्याचा पर्दाफाश केला आहे. धर्मा-धर्मातील दुखर्‍या जाणीवा शब्दबद्ध करताना लेखकाच्या लेखणीने जे परिश्रम घेतले आहेत. ते कमालीचे लक्षणीय आहेत.कादंबरीचा विषय इतका वेगळा आहे की सहज जिज्ञासा वाढत जाऊन वाचक कादंबरी संपेपर्यंत हातची सोडत नाही.
          मनोहरपंत व सुमित्रा यांची मुलगी मानवी देशमुख ही अत्यंत सुसंस्कारित घरातली देखणी मुलगी. अभ्यास करून ती एम.बी.बी.एस होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि महत्वकांक्षी असणारी मानवी वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकत्याला जाऊन वस्तीगृहात राहते. प्रथम स्वतःचे करिअर नंतर आवडीनिवडी अशा विचाराची ही खंबीर मुलगी आणि एम.बी.बी.एस.च्या तिसर्‍या वर्षात असतानाच मुस्लिम युवक कबीर मध्ये गुंतत जाते. परंतु तरीही ती तटस्थ राहून आपले शिक्षण पूर्ण करते. परंतु कबीर त्याच्या अभिनयाच्या आवडीमुळे माघारतो.भटकतो. तिला त्याचा वैताग येतो. ती त्याला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून तुझ्या अबूचे स्वप्न पूर्ण कर म्हणून सांगते. पण तो तिचा पिच्छा सोडत नाही आणि वैद्यकीय शिक्षणात त्याला अजिबात रस नसतो. शेवटी तो अभिनयाकडेच वळतो. परंतु तो मानवी मध्ये अधिकच गुंतत जातो. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू मला नाकारलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरवाईट करून घेईन अशी धमकी कबीर मानवीला देतो. शेवटी मानवी सोबत तो पुण्याला येतो. पुढे मानवी जन्मदात्या आई-वडिलांचा कसलाही विचार न करता त्याच्यासोबत कोलकात्याला कायमची निघून जाते.
         कादंबरी मधली नायिका तरुण वयाच्या उंबरठ्यावर असताना ती कबीर सोबत कायमची कोलकात्याला जाते. तिथे तिची जीवाभावाची मैत्रीण, जी तिची वस्तीगृहावर रूम पार्टनर होती, ती डॉ.चैताली तिला खूप मदत करते. डॉ. चैताली व तिचा नवरा डॉ.अविनाश पाटील यांनी मानवीला मोठा आधार देतात. राहायला घर देतात आणि नंतर मानवी व कबीरचं कोर्टातून लग्नही लावून देतात. कन्यादानही करतात. एक दिवस डॉक्टर चैतालीला ब्रेन ट्यूमर होऊन चैतालीचा अचानक मृत्यू होतो.कोलकत्यासारख्या नवीन शहरात फक्त चैतालीचा आधार असणार्‍या मानवीला फार एकाकी वाटायला लागतं. नंतर चैतालीच्या नवर्‍याच्या हॉस्पिटलमध्ये मानवी जॉब करते, पण त्यांचाही मृतदेह एक दिवस विहिरीमध्ये पडलेला दिसतो. त्यानंतर कबीरचा एक्सीडेंट होतो आणि नंतर कबीर सुध्दा मरण पावतो. तेव्हा मानवीला दिवस असतात. अशा भयानक परिस्थितीतूनही डॉ. मानवी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. डॉ. मानवीला एक मुलगा होतो. त्याचं नाव कबीरच्या इच्छेनुसार अब्दुल ठेवते. त्यानंतर कबीरचे वडील मानवीला खूप मदत करतात. नंतर मानवी धर्मांध खलप्रवृत्तीच्या चक्रव्युहात ओढली जाते. अचानक आई-वडिलांची खूप आठवण येते. पुण्याला मानवी परत येते तेव्हा वडील वारल्याचे समजते आणि आई वेडी होऊन एका वृद्धाश्रमात दाखल झाल्याचे समजताच मानवीचे पाय वृद्धाश्रमाकडे वळतात. पण तिची आई तिला ओळखू शकत नाही. इतका जबरदस्त मानसिक धक्का आईला बसलेला असतो की तिच्या अंगावर धड कपडेही नसतात. ती मोठ-मोठ्याने ‘‘बाळा तुझं स्टेथस्कोप तू घरीच ठेवून का गेलीस?’’ असं म्हणत स्वतःच्याच गुंगीत कधी हसते, तर कधी रडते. आईला वेड लागलेले पाहून मानवी पूर्णतः हतबल होऊन जाते. परत कोलकत्याला वापस येते. त्यानंतर धर्मांध खलप्रवृत्तीच्या चक्रव्युहात ओढली जाऊन धर्मांतर करून घेण्यास नियती भाग पाडते व पुनर्विवाह सारख्या चुकीच्या निर्णयाला बळी ठरते.
             मानवीच्या पुनर्विवाह नंतर नवीन जीवनाला सुरुवात झालेली असतानाच तिचा दुसरा नवरा हैदर खूप कपटी स्वभावाचा व्यसनी निघतो. त्याचे वडील कासिम व हैदर मानवीचा धर्म बदलवतात. त्यानंतर बुरखा ,घरातली काम, नोकरी सगळं करून मोलकणीसारखी वागणूक कासिम व हैदर तिला देतात. डॉ. मानवी दररोज जिवंत असूनही मेल्यागत जगत असते. पोटच्या गोळ्याला तिला नाईलाजास्तव कबीरचे वडील अबूकडे ठेवावे लागते. एका आईचं काळीज खूप संवेदनशील मन लेखक संजय महल्लेे यांनी रेखाटलं आहे. त्यांनी पात्राला यथोचित न्याय दिला आहे. त्यामुळेच पात्रे मनाची पकड घेतात, भावतात, व्याकुळ करतात व अंतिमता सजग करतात. या कादंबरीत कमालीची घुसमट आहे. घुसमटीचे एक मोठं दडपण स्वीकारत वाचक ही कादंबरी वाचत जातो. लेखकाला हे कौशल्य उत्तम साधले आहे. या कादंबरीची प्रत्येक व्यक्तीरेखा प्रभावीपणे लेखकाने उभी केली आहे. जणू काही वाचकाच्या समोरच सारे घडते आहे, असा भास वाचकाला होत राहतो. म्हणून वाचक शेवटपर्यंत कादंबरी वाचायची सोडीत नाही. कादंबरीचा शेवट खूप भयानक आहे. वाचकाला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. पैसा आणि लालच किती वाईट असतं, त्याच पायी डॉ. मानवी देशमुख हिला आपल्या जाळ्यात ओढून हैदर व कासिम सारखे सैतान तिला फसवतात. धर्म बदलायला भाग पडतात. अन्याय, जोर जुलूम करतात. इतकेच नाही तर शेवटी डॉ. मानवीला विकण्याची तयारी करतात. मानवीला शंका येते आणि ती त्यातून  कशी सुटते? कबीरचा मृत्यू कसा होतो ? हे सारे लेखकाच्या खास शैलीत कादंबरीतूनच वाचले पाहिजे. शिकल्या सवरलेल्या एम.बी.बी.एस असलेल्या देखण्या तरुण मुलीच्या आयुष्याचा खेळखंडोबा दोन सैतांनांनी केलेला पाहून वाचकांच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही.
          एकंदरीत संजय महल्ले यांची ही कादंबरी वैदर्भीय कादंबरीकाराच्या शृंखमालिकेत एक सर्वस्पर्श कादंबरी असून समाजातील वास्तवातील समस्येला हात घालून युवा तरुण पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. एक लहानशी विवेकशून्यता किती मोठे प्रलय आयुष्यात आणू शकते. त्यामुळे जीवन कसे उध्वस्त होते. तरुण पिढीला दिशादर्शक असणारी ही कादंबरी ‘तिचं काय चुकलं?’ शेवटी माणसाला विचार करायला लावते. तरुण पिढीने विशेषत: तरुण मुलींनी ही कादंबरी आवर्जून वाचावी असे मी आग्रहाने सांगेन.
            प्रेम हे जात, धर्म बघून केले जात नाही, परंतु जाती धर्माच्या नावाखाली एखाद्या स्त्रीचा बळी कसा जातो? तिची कशी अवहेलना होते? याचे भयानक परिणाम ‘सैराट’ ह्या चित्रपटापेक्षाही भयंकर या कादंबरीमध्ये दर्शविलेले आहेत. संजय महल्ले यांची ही कादंबरी वाचलेला तरुण जबाबदारीचे भान ठेवून, सजग राहून आपले निर्णय घेतील यात शंकाच नाही. नायिकेच्या संबंध आयुष्याची झालेली होरपळ आणि त्या अनुभवातून तिच्या घायाळ मनाने शेवटी घेतलेला सावध निर्णय, आपल्या सारखं आपल्या मुलाचं आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून नायिकेची अतूल्य धडपड वाचकाला खूप काही सांगून जाते. ही कादंबरी वाचताना वाचक हळवा होतो, भारावून जातो, सजग होतो, भाऊक होतो, हळहळतो, रडतो, विव्हळतो. वाचकाला प्रत्येक परिस्थितीचा अनुभव येतो. एवढी ताकद लेखक संजय महल्ले यांच्या लेखणीमध्ये दिसून येते.
         एका उच्चविद्या विभूषित देखण्या व पायात कमाईची ताकद असणार्‍या जीवाचा नाहक बळी कसा जातो ? आणि एवढे होऊनही ती सामाजिक उत्तरदायित्वाची हकदार कशी होते? हे मुळात या कादंबरीतून वाचण्यासारखे आहे. लेखक संजय महल्ले या कादंबरीतून एक मोठा चित्रपटच उभा करतात. मुठभर वाईट लोकांमुळे समाजातील एखादा समूहच कसा बदनाम होऊन जातो? सामाजिक स्नेहभावाचे वातावरण कसे गढूळ होऊन जाते ? ह्याचे मार्मिक विवेचन करून सैतानाच्या क्रौर्याचा पर्दाफाश करणारी कादंबरी म्हणजे ‘तिचं काय चुकलं?’.
          तरुणपणाच्या उंबरठ्यावर असणार्‍या तरुण-तरुणींना सजग करणारी, आजच्या सैराट झालेल्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही कादंबरी प्रत्येक तरुण-तरुणीने आवर्जून वाचावी अशीच आहे.
          लेखक संजय महल्ले यांच्या लेखणीला नतमस्तक होऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.

तिचं काय चुकलं ? (कादंबरी)
लेखक- संजय महल्ले
प्रकाशक- मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती
पृष्ठे 260/ मूल्य रु. 400/-
       
-मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.9767663257
***

Friday, September 9, 2022

सैराट झालेल्या तरुण पिढीला सजग करणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं?

  *सैराट झालेल्या तरूण पिढीला सजग करणारी कादंबरी म्हणजे -तिचं काय चुकलं?*

      प्रेम ही एक नैसर्गिक, तारुण्य सुलभावना आहे. आज पर्यंत प्रेमावर अनेक साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालेले आहे. प्रेमामध्ये जात, धर्म, प्रांत, देश-वेश या पलीकडे जाऊन प्रेमाने स्वतःच अस्तित्व निर्माण केले आहे. प्रेमावर जेवढी बंधने लादली गेली तेवढी ती झुगारून प्रेम अधिक घट्ट बनल्याचे अनेक उदाहरणे आहेत. पण याच बरोबर त्याची दुसरी गंभीर बाजू व त्याचे परिणाम याचा विचार आजची तरुण सुशिक्षित पिढी करीत नाही. पूर्वीसारखी परिस्थिती आता जरी राहिली नाही तरी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा अतिशय नाजूक व गंभीर विषय आहे. याच विषयावर आधारित माणसाला माणुसकीची लाज वाटावी अशा क्रूर कौर्याचा पर्दाफाश करणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं?
       विदर्भाच्या मातीत जन्मलेले सुप्रसिद्ध कादंबरीकार लेखक संजय महल्ले यांची विज्ञानाधारित कादंबरी काईमेरा, कथासंग्रह गावगप्पा त्यानंतर माणसाला अंतर्मुख करायला लावणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं? ही वाचनात आली आणि अक्षरश: मी वाचन वेडी झाले. हो कादंबरी जो कुणी वाचेल तो  वाचक  कादंबरी संपल्याशिवाय सोडणार नाही अशी कादंबरी तिचं काय चुकलं? या कादंबरीचे प्रकाशन मेधा पब्लिकेशन हाऊस यांनी प्रकाशित केली असून प्रकाशकच एक उमदा लेखक असू शकतो याची प्रचिती मला आली. या कादंबरीची पहिली आवृत्ती एक जून 2022 रोजी प्रकाशित झाली असून या कादंबरीचे मूल्य केवळ चारशे रुपये असून ही कादंबरी वाचकाला वेळ लावल्याशिवाय राहत नाही इतका खोल मतितार्थ यात लपला आहे.मुखपृष्ठ अतिशय मर्मभेदी व विचार करायला लावणारे आणि  वाचकांची उत्सुकता निर्माण करणारे आहे. शैतानाच्या कौर्याला बळी पडलेल्या सर्व भगिनींना ही कादंबरी लेखक संजय म्हल्ले यांनी अर्पण केलीआहे.
         आपला भारत देश आज कितीही प्रगत झाला तरी जाती, धर्माची जी कीड देशाला लागली आहे. ती एका आळीप्रमाणे माणुसकीला पोखरत आहे या कादंबरीच्या माध्यमातून लेखक संजय महले यांनी समाजाच्या विकृत, बुरसटलेल्या सैतानाच्या कौर्याचा पर्दाफाश केला आहे. धर्मा धर्मातील दुखऱ्या जाणीवा शब्दबद्ध करताना लेखकाच्या लेखणीने जे परिश्रम घेतले आहे. ते कमालीचे लक्षणिय आहे.कादंबरीचा विषय इतका वेगळा आहे की सहज जिज्ञासा वाढत जाऊन वाचक कादंबरी संपेपर्यंत हातची सोडत नाही.
          मनोहर पंत व सुमित्रा यांची मुलगी मानवी देशमुख ही अत्यंत सुसंस्कारित घरातली मुलगी खूप अभ्यासू, करून एम.बी.बी.एस होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि देखणी महत्वकांक्षी असणारी वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकत्यासारख्या शहरात जाऊन वस्तीगृहात शिस्त पाळणारी खूप अभ्यासू. पहिले स्वतःचे करिअर नंतर आवडीनिवडी असणारी खंबीर मुलगी आणि एम.बी.बी.एसच्या शेवटच्या वर्षातच तिचे मन मुस्लिम युवक कबीर मध्ये गुंतत जाते. ती तटस्थ राहून करिअर पूर्ण करते कबीरला ही वैद्यकीय अभ्यास पूर्ण करण्यासाठी मानवी खूप समजावून सांगते पण कबीर त्याच्या अभिनयाच्या आवडीमुळे माघार घेतो.भटकतो, तिला त्याचा वैताग येतो तीही त्याला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून तुझ्या अबूचे स्वप्न पूर्ण कर म्हणून सांगते पण तो तिचा तिच्या सोडत नाही आणि वैद्यकीय शिक्षणात त्याला अजिबात रस नसतो शेवटी तो अभिनयाकडेच वळतो परंतु तो मानवी मध्ये अधिकच गुंतत जातो तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही तू मला नाकारलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरवाईट करून घेईन अशी धमकी कबीर मानवीला देतो. शेवटी मानवी सोबत तो पुण्याला येतो त्यामुळे मानवी ही जन्मदात्या आई-वडिलांचा कसलाही विचार न करता आई-वडिलांचा त्याग करून त्याच्यासोबत कायमची निघून जाते.
         कादंबरी मधली नायिका तरुण वयाच्या उंबरठ्यावर असताना ती कबीर सोबत कायमची कोलकात्याला जाते. तिथे तिची जीवाभावाची मैत्रीण जी तिची वस्तीगृहावर रूम पार्टनर होती. ती डॉक्टर चैताली तिला खूप मदत करते. डॉ. चैताली व तिचा नवरा डॉक्टर अविनाश पाटील यांनी मानवीला मोठा आधार दिला. राहायला घर दिलं आणि नंतर मानवी व कबीर च लिगली कोर्टातून लग्नही लावून दिलं कन्यादानही केलं. एक दिवस डॉक्टर चैतालीला ब्रेन ट्यूमर होऊन चैतालीचा अचानक मृत्यू झाला.कोलकत्यासारख्या नवीन शहरात फक्त चैतालीचा आधार असणाऱ्या मानवीला फार एकाकी वाटायला लागतं. नंतर चैतालीच्या नवऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये मानवी जॉब करते, पण त्याचाही मृतदेह एक दिवस विहिरीमध्ये पडलेला दिसतो.त्यानंतर कबीरचा एक्सीडेंट होतो आणि नंतर कबीर सुध्दा मरण पावतो. तेंव्हा मानवीला दिवस असतात अशा भयानक परिस्थितीतूनही डॉक्टर मानवी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते डॉक्टर मानवीला एक मुलगा होतो त्याचं नाव कबीरच्या इच्छेनुसार अब्दुल ठेवते त्यानंतर कबीर चे वडील डॉक्टर मानवीला खूप मदत करतात.नंतर मानवी धर्मांध खलप्रवृत्तीच्या चक्रव्युहात ओढली जाते. अचानक आई वडिलांची खूप आठवण येते पुण्याला मानवी परत येते तर वडील वारलेले समजते आणि आई वेडी होऊन एका वृद्धाश्रमात दाखल झाल्याचे समजतात मानवीचे पाय वृद्धाश्रमाकडे वळतात पण तिची आई तिला ओळखू शकत नाही. इतका जबरदस्त मानसिक धक्का आईला बसलेला असतो तिच्या अंगावर धड कपडेही नसतात. मोठ मोठ्याने मानवी माझी मुलगी डॉक्टर होऊन येईल. बाळा तुझं स्टेथस्कोप खूप घरीच ठेवून का गेलीस? असं म्हणत मोठमोठ्याने स्वतःच्याच गुंगीत राहणारी तिची आई कधी हसते, तर कधी रडते आईला वेड लागलेले पाहून मानवी पूर्णतः हतबल होऊन जाते. परत कोलकत्याला वापस येते त्यानंतर धर्मांध खलप्रवृत्तीच्या चक्रव्युहात ओढली जाऊन धर्मांतर करून घेण्यास नियती भाग पाडते व पुनर्विवाह सारख्या चुकीच्या निर्णयाला बळी ठरते.
             मानवीच्या पुनर्विवाह नंतर नवीन जीवनाला सुरुवात झालेली असतानाच तिचा दुसरा नवरा आहे हैदर खूप कपटी स्वभावाचा व्यसनी निघतो त्याचे वडील कासिम व हैदर यांनी जबरदस्ती मानवीचा धर्म बदलवतात. त्यानंतर बुरखा ,घरातली काम, नोकरी सगळं करून मोलकर्णी सारखी वागणूक कासिम सासरा व हैदर नवरा तिला देतात. डॉक्टर मानवी दररोज जिवंत असूनही मेल्यागत जगत असते. पोटच्या गोळ्याला तिला नाईलाजास्तव कबीरचे वडील अबू कडे ठेवावे लागतं. एका आईचं काळीज खूप संवेदनशील पण आणि लेखक संजय म्हणले आणि रेखाटलं आहे. लेखक संजय महल्ले यांनी पात्राला न्याय दिला आहे.काही पात्र मानवी मनाची पकड घेतात भावतात व्याकुळ करतात व अंतिमता सज्जत करतात या कादंबरीत कमालीची घुसमट आहे. घुसमटीचे एक मोठं दडपण स्वीकारत वाचक ही कादंबरी वाचत जातो. लेखकाला हे कौशल्य उत्तम साधला आहे. या कादंबरीचा प्रत्येक व्यक्तीरेखा प्रभावीपणे लेखकाने उभी केली आहे.तेवढी कादंबरी जिवंत होते. जणू कांही वाचकाच्या समोरच सारे घडते आहे. असा भास वाचकाला होतो. म्हणून वाचक शेवटपर्यंत कादंबरी वाचायची सोडीत नाही. कादंबरीचा शेवट खूप भयानक आहे. वाचकाला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. पैसा आणि लालच किती वाईट असतं त्याच पायी डॉक्टर मानवी देशमुख हिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी हैदर व कासिम सारखे शैतानाच खरं रूप डॉक्टर मानवीला दिसतं फक्त पैशासाठी हैदर मानवीला फसवून लग्न करतो. धर्म बदलायला भाग पडतो .अन्याय , जोर जुलूम करतो.इतकेच नाही तर शेवटी डॉक्टर मानवीला विकण्याची तयारी करतो. मानवीला शंका येते आणि तिने अबूला फोन करून बोलावून घेते. नशेच्या धुंदीत असलेला हैदर कबीरला मीच मारल्याची ग्वाही देऊन जातो . ते ऐकून मानवीचे होश उडून जातात. शिकल्या सवरलेल्या एम.बी.बी.एस असलेल्या देखण्या करून मुलीच्या आयुष्याचा खेळखंडोबा दोन शैतांनांनी केलेला पाहून वाचकांच्या काळजाचा थरकाप होतो.
          एकंदरीत संजय महल्ले यांची ही कादंबरी वैदर्भीय कादंबरीकाराच्या शृंखमालिकेत एक सर्वस्पर्श कादंबरी असून समाजातील वास्तवातील समस्येला हात घालून युवा तरुण पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. एक लहानशी विवेक शून्यता किती मोठे प्रलय आयुष्यात आणू शकते. त्यामुळे जीवन कसे उध्वस्त होतं. तरुण पिढीला दिशादर्शक असणारी ही कादंबरी तिचं काय चुकलं?शेवटी माणसाला विचार करायला लावते. प्रत्येक तरुण पिढीने आवर्जून वाचावी अशीच कादंबरी आहे.
            प्रेम जात, धर्म बघून केलं जात नाही पण जाती धर्माच्या नावाखाली एखाद्या स्त्रीचा बळी कसा जातो? तिची कशी अवहेलना होते? याचं भयानक परिणाम सैराट पेक्षाही भयंकर या कादंबरीमध्ये आलेली आहेत. संजय महल्ले यांची ही कादंबरी वाचलेला तरुण जबाबदारीचे भान ठेवून, सजग राहून आपले निर्णय घेतील यात शंकाच नाही. नायिकेच्या संबंध आयुष्याची झालेली होरपळ आणि त्या अनुभवातून तिच्या घायाळ मनाने घेतलेला सावध निर्णय शेवटी आपल्या सारखं आपल्या मुलाचा आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून नायिकेची अतुल्य धडपड वाचकाला खूप काही सांगून जाते. ही कादंबरी वाचताना वाचक हळवा होतो, भारावून जातो, सजग होतो, निर्णय घेतो, भाऊक होतो, हळहळतो, आव्हाने पेलतो, संबंध जोडतो, रडतो, विव्हळतो, वाचकाला प्रत्येक परिस्थितीचा अनुभव येतो. एवढी ताकद लेखक संजय महल्ले यांच्या लेखणीमध्ये दिसून येते.
         एका उच्च विद्या विभूषित देखण्या व पायात कमाईची ताकद असणाऱ्या जीवाचा नाहक बळी कसा जातो ? आणि एवढे होऊनही ती सामाजिक उत्तरदायित्वाची हकदार कशी होते? हे मुळात या कादंबरीतून वाचण्यासारखे आहे. लेखक संजय महल्ले यांनी या कादंबरीतून एक मोठा चित्रपटच उभा करतात. मुठभर वाईट लोकांमुळे समाजातील समूहच बदनाम कसा होऊन जातो? सामाजिक स्नेहभावाचे वातावरण गढूळ होऊन जाते. ही कादंबरी सैतानाच्या कौर्याचा पर्दाफाश करणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं? शेवटी वाचकाला हाच प्रश्न पडतो.
          तरुणपणाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या तरुण-तरुणींना सजग करणारी, आजच्या सैराट झालेल्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कादंबरी म्हणजे तिचं काय चुकलं? प्रत्येक तरुण-तरुणीने आवर्जून वाचावी अशीच आहे.
          लेखक संजय महल्ले यांच्या लेखणीला नतमस्तक होऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.
        

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.9767663257

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...