मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Thursday, December 8, 2022

निरोगी जीवन (अभंग क्र.२८)


निरोगी जीवन (अभंग क्र.२८)

लवकर उठे | लवकर निजे |
माणूस तो साजे | जीवनात ||

प्रांत:समयीला | व्यायाम करावे |
नित्यची फिरावे | दररोज ||

आळस हा शत्रू | आहे माणसाचा |
बदलतो साचा | जिवनाचा ||

चांगल्या सवयी | तेवढे चांगले |
होईल गा भले | आयुष्याचे ||

सोड रे व्यसन | व्याधी आमंत्रण |
शरीर खंगून | जाईल गा ||

सात्विक आहार | निरोगी आयुष्य ||
उद्याचे भविष्य | आयुष्याचे ||

प्रसन्न मनाने | रहा दिनभर |
नको चिंतातूर | आयुष्यात ||

मानवाचा जन्म | सुंदर ही भेट |
देवाने ही थेट | दिली आहे ||

गोळ्या व औषधी | खरे शत्रू आहे |
डोकावून पाहे | जीवनात ||

निरोगी जीवन | स्वस्थ जगूयात |
रोगावर मात | करूयात ||

ताजे खाणेपिणे |उत्तम आहार |
कामं अंगभर | करूनिया ||

मिनू म्हणे आता | ठेव सर्व ध्यानी |
नको मनमानी | आपुलीच ||

दिर्घायुष्यी जगा | नियम हे पाळा |
आयुष्य झोपाळा | आहे बघ ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

कर्तव्याची जाण

कर्तव्याची जाण (अभंग क्र.२७)

कर्तव्याची जाण  (अभंग क्र.२७)


कर्तव्याची जाण | माणसा तू ठेव |
कशाचे ना भेव राहील गा|

मायबाप पूजा | देवाआधी थोर |
वृध्दपणी घोर | कशापायी ||

भावनेपेक्षाही | मोठेच कर्तव्य ||
नको अपव्यय | वेळेचाही ||

राष्ट्रप्रेम उरी | माणुसकी भली |
परस्त्री मुली | ताईसम ||

नको लवलेश | कधी भ्रष्टाचार |
नको स्वैराचार | ठेव ध्यानी ||

नात्यांची ती  घट्ट | वीण मजबूत |
कुटुंब शाबूत | असेल गा ||

सोड हेवेदावे | उगा मिरवावे |
आपलेच गावे | कशापायी ||

इमानदारीने | सदाच रहावे |
धन्य हो पावावे | जीवनात ||

स्वाभिमानी रहा | सदैव तत्पर |
बदल लकेर | नशिबाची ||

प्रयत्नांती भेटे | तो परमेश्वर|
जीवन नश्वर | ठेव ध्यानी ||

मिनू म्हणे ठेव | कर्तव्याची जाण |
जीवन महान | होईल गा ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Sunday, November 27, 2022

सुखाचा संसार... अभंग क्र.२६

 सुखाचा संसार (अभंग क्र.२६)

चांगले आचार | चांगले विचार |
सुखाचा संसार | त्याचा चाले ||

समजून घेणे | कष्टांचे लिंपणे |
जरी काही उणे | संसारात ||

संसाररथाची | दोघे चाके दोन
घेती समजून | एकमेकां ||

रूसवे फुगवे | याला नाही स्थान |
आपुलकी मान| देत रहा||

सुखाचा संसार | प्रेमाची चादर |
वाढेल आदर | मनातूनी ||

एकमेका साथ | संकटात देई |
तीच ती विठाई | जणू माझी ||

सन्मान गे व्हावा | कधी आदराने |
निर्मळ मनाने | वागा नीट ||

मानवाचा जन्म | पुन्हा घेणे नाही |
देते मी ही ग्वाही | ठेवा ध्यानी ||

संशयकल्लोळ | नका देऊ थारा ||
संसार पसारा | आवरावा ||

अति महत्वाचा | विश्वास असावा |
संशय नसावी | संसारात ||

अमृताची गोडी | येतसे जीवनी |
ठेव जरा ध्यानी | मिनू म्हणे ||

मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

मनाचा गाभारा....


 मनाचा गाभारा


मनाचा गाभारा | ठेवा सदा स्वच्छ |

नाही कोणी तुच्छ | ठेव ध्यानी ||


सडके शरीर |  भंगून जाईल |

मनच खाईल | एकदिनी ||


मन हे मंदिर | पवित्र हे स्थळ |

नको त्यात मळ | ठेवू कधी ||


असो सदा तुझे | चांगले रे कर्म |

जिवनाचे मर्म | ओळखावे ||


नाही दुखवावे | नाही हिणवावे| 

सदा हसवावे | इतरांना


चांगले चिंतन | असावे मनात |

नांव रे जनात | निघेल गा ||


एकदाच मिळे  |जन्म मानवाचा |

गाभारा मनाचा || भगवंत ||


मनाच्या मंदिरी | देव वसतसे|

सदा भासतसे | मज देवा ||


सोड माझे माझे | कुणाचे ना कोणी |

ही मनधरणी | वरवर ||


एकटा येणार | एकटा जाणार |

काय रे नेणार | सोबतीला ||


माणुसकी भली | खरी ती श्रीमंती

नको रे भ्रमंती | कशापायी ||


मनाचिये द्वारी | उभा पांडुरंग ||

नित्य त्यांच्या संग | गोडी लागे ||


मनाच्या मंदिरी | विठ्ठला पुजते |

मागणं मागते | देवाठायी ||


मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव

ता.जि.वाशिम

Thursday, October 20, 2022

ओला दुष्काळ दुष्काळ

 ओला दुष्काळ दुष्काळ

ओला दुष्काळ दुष्काळ
पडे पाऊस जोरात
पाणी साचलं साचलं
शेत आणि शिवारात...!!

आला पाऊस पाऊस
पिके पिवळी पडली
सा-या शेतात रे पाणी
पीकं पाण्यानं सडली...!!

झालं जाहीर पॅकेज
झाली पाहणी पाहणी
शेतकरी चिंताग्रस्त
नको करू हेटाळणी....!!

सहा हजार एकरी
बिबीयाणे रे निघेना
कशी केलास रे देवा
शेतक-याचीच दैना...!!

असं करू नगं देवा
येऊ दे ना थोडी कीवं
मेताकुटी येईल गा
माणसाचा मग जीवं....!!

हात जोडून देवाला
मी करीतो विनवणी
थांबू दे पाऊस अन्
नको तुझी मनमानी....!!

उसवल्या नशिबाला
आज लावितो ठिगळं
आबादाणी ठेव देवा
ठीक कर रे सगळं....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.9767663257

Sunday, October 16, 2022

स्वच्छता करूया...(चित्रकाव्य)

 स्वच्छता करूया

स्वच्छतेचा मूलमंत्र ध्यानी धरूया
चला दोस्तहो स्वच्छता करूया....!!धृ ||

केरकचरा साफ करूया
आपले अंगण, स्वच्छ ठेवूया
बागबगिच्या झाडे लावूया
निर्मळ, सुंदर बगीचा बनवूया...

अस्वच्छ जर असेल अंगण
होतील खूप सारे मच्छर
डेंग्यू,मलेरियाला नको आमंत्रण
चला झाडू हाती धरूया....!!१||

सुंदर झाडे, सुंदर वेली
येतील सारे पक्षी अंगणी
नानाविध फुले बहरतील
फुलपाखरे सारे भिरभिरतील...
           त्यांच्यासवे चला गाणे गाऊया...||२||

स्वच्छता आहे खूप महत्त्वाची
रोगराई  दूर पळवण्यासाठी
स्वच्छ, सुंदर, शुध्द हवा
महत्त्वाची आहे आरोग्यासाठी..
          सा-यांनी हे ध्यानी ठेवूया....||३||

कचराकुंडीत कचरा टाकून
त्यापासून गांडूळ खत तयार करू
झाडावेलींना सेंद्रिय खत देऊ
फुललेला निसर्ग पाहू.......||४||
             स्वच्छतेचा मूलमंत्र ध्यानी धरूया
              चला दोस्त हो स्वच्छता करूया....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...