मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Sunday, November 27, 2022

सुखाचा संसार... अभंग क्र.२६

 सुखाचा संसार (अभंग क्र.२६)

चांगले आचार | चांगले विचार |
सुखाचा संसार | त्याचा चाले ||

समजून घेणे | कष्टांचे लिंपणे |
जरी काही उणे | संसारात ||

संसाररथाची | दोघे चाके दोन
घेती समजून | एकमेकां ||

रूसवे फुगवे | याला नाही स्थान |
आपुलकी मान| देत रहा||

सुखाचा संसार | प्रेमाची चादर |
वाढेल आदर | मनातूनी ||

एकमेका साथ | संकटात देई |
तीच ती विठाई | जणू माझी ||

सन्मान गे व्हावा | कधी आदराने |
निर्मळ मनाने | वागा नीट ||

मानवाचा जन्म | पुन्हा घेणे नाही |
देते मी ही ग्वाही | ठेवा ध्यानी ||

संशयकल्लोळ | नका देऊ थारा ||
संसार पसारा | आवरावा ||

अति महत्वाचा | विश्वास असावा |
संशय नसावी | संसारात ||

अमृताची गोडी | येतसे जीवनी |
ठेव जरा ध्यानी | मिनू म्हणे ||

मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

मनाचा गाभारा....


 मनाचा गाभारा


मनाचा गाभारा | ठेवा सदा स्वच्छ |

नाही कोणी तुच्छ | ठेव ध्यानी ||


सडके शरीर |  भंगून जाईल |

मनच खाईल | एकदिनी ||


मन हे मंदिर | पवित्र हे स्थळ |

नको त्यात मळ | ठेवू कधी ||


असो सदा तुझे | चांगले रे कर्म |

जिवनाचे मर्म | ओळखावे ||


नाही दुखवावे | नाही हिणवावे| 

सदा हसवावे | इतरांना


चांगले चिंतन | असावे मनात |

नांव रे जनात | निघेल गा ||


एकदाच मिळे  |जन्म मानवाचा |

गाभारा मनाचा || भगवंत ||


मनाच्या मंदिरी | देव वसतसे|

सदा भासतसे | मज देवा ||


सोड माझे माझे | कुणाचे ना कोणी |

ही मनधरणी | वरवर ||


एकटा येणार | एकटा जाणार |

काय रे नेणार | सोबतीला ||


माणुसकी भली | खरी ती श्रीमंती

नको रे भ्रमंती | कशापायी ||


मनाचिये द्वारी | उभा पांडुरंग ||

नित्य त्यांच्या संग | गोडी लागे ||


मनाच्या मंदिरी | विठ्ठला पुजते |

मागणं मागते | देवाठायी ||


मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव

ता.जि.वाशिम

Thursday, October 20, 2022

ओला दुष्काळ दुष्काळ

 ओला दुष्काळ दुष्काळ

ओला दुष्काळ दुष्काळ
पडे पाऊस जोरात
पाणी साचलं साचलं
शेत आणि शिवारात...!!

आला पाऊस पाऊस
पिके पिवळी पडली
सा-या शेतात रे पाणी
पीकं पाण्यानं सडली...!!

झालं जाहीर पॅकेज
झाली पाहणी पाहणी
शेतकरी चिंताग्रस्त
नको करू हेटाळणी....!!

सहा हजार एकरी
बिबीयाणे रे निघेना
कशी केलास रे देवा
शेतक-याचीच दैना...!!

असं करू नगं देवा
येऊ दे ना थोडी कीवं
मेताकुटी येईल गा
माणसाचा मग जीवं....!!

हात जोडून देवाला
मी करीतो विनवणी
थांबू दे पाऊस अन्
नको तुझी मनमानी....!!

उसवल्या नशिबाला
आज लावितो ठिगळं
आबादाणी ठेव देवा
ठीक कर रे सगळं....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.9767663257

Sunday, October 16, 2022

स्वच्छता करूया...(चित्रकाव्य)

 स्वच्छता करूया

स्वच्छतेचा मूलमंत्र ध्यानी धरूया
चला दोस्तहो स्वच्छता करूया....!!धृ ||

केरकचरा साफ करूया
आपले अंगण, स्वच्छ ठेवूया
बागबगिच्या झाडे लावूया
निर्मळ, सुंदर बगीचा बनवूया...

अस्वच्छ जर असेल अंगण
होतील खूप सारे मच्छर
डेंग्यू,मलेरियाला नको आमंत्रण
चला झाडू हाती धरूया....!!१||

सुंदर झाडे, सुंदर वेली
येतील सारे पक्षी अंगणी
नानाविध फुले बहरतील
फुलपाखरे सारे भिरभिरतील...
           त्यांच्यासवे चला गाणे गाऊया...||२||

स्वच्छता आहे खूप महत्त्वाची
रोगराई  दूर पळवण्यासाठी
स्वच्छ, सुंदर, शुध्द हवा
महत्त्वाची आहे आरोग्यासाठी..
          सा-यांनी हे ध्यानी ठेवूया....||३||

कचराकुंडीत कचरा टाकून
त्यापासून गांडूळ खत तयार करू
झाडावेलींना सेंद्रिय खत देऊ
फुललेला निसर्ग पाहू.......||४||
             स्वच्छतेचा मूलमंत्र ध्यानी धरूया
              चला दोस्त हो स्वच्छता करूया....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

Saturday, October 15, 2022

जागतिक अन्नदिन...अन्न वाचवा



जागतिक अन्नदिन*

वाया नका घालवू अन्न
अन्न हेच आहे पुर्णान्न
ज्याच्या पोटी भुकेचा गोळा
अन्नासाठी फिरे वनवन...!!

ज्याला मिळते मुबलक अन्न
नासाडी करून  नको गाजावाजा
एका एका दाण्यासाठी इथे
घाम गाळतो माझा बळीराजा...

अपार मेहनत बळीराज्याची
जाणिव प्रत्येकांनी ठेवा
जितकं लागेल तेवढंच घ्या
मग प्रसन्न मनाने जेवा....!!

शिळंपाकं फेकू नका हो
अन्न घालवू नका वाया
गोरगरिबांना अन्नदान करा
येऊ द्या कधी दयामाया....!!

अन्नासाठी करती सारे
वितभर पोटासाठी मरमर
अन्नाचा आदर करा रे
जीवन होईल सदा सुखकर...!!

भुकेल्या पोटी घास द्यावा
पशुपक्ष्यांना मुठभर दाणे
जेवढे दिले आयुष्य जग माणसा
आणि सदा रहावे आनंदाने....!!

कण कण वेचती पक्षी अन्न
अन्नाची नासाडी कधी करू नका
उरले सुरले फेकू नका ना
पशू पक्ष्यांच्या मुखी घास द्या.

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथमिक शाळा.ककोकलगाव
ता.जि.वाशिम.


Tuesday, October 11, 2022

एक मनीमाऊ


 एक मनीमाऊ


शहरातल्या घरामध्ये

गेली एक मनीमाऊ

लागली होती भूक 

करू लागली म्यॅंव म्यॅंव ss


सारे काही कपाटात 

कसले ते फर्निचर ?

भुकेने व्याकुळला जीव 

आतड्यात होई चर्र चर्र र|


पूर्वीचा काळ बरा होता 

डोळ्यात आले पाणी

आजी सुद्धा गोड गायची

मनीमाऊची गाणी ...


मुक्या प्राण्यावर माया होती 

पाळायचे घरात दोन-चार प्राणी 

वृद्धच गेली वृद्धाश्रमात 

मनीमाऊची कोणी गाईल गाणी ?


घरभर फिरून झाले 

मिळाले नाही मनीला काही 

भुकेने व्याकुळला जीव 

पोटात होती लाही लाही ...!!


नको मजला शहर बाई

 मनीने ठोकले गावाकडे धूम ss

गावच आपला बरा बाई 

मनी झाली घामाघूम...!!


शेवटी एकदा खेडे गाठले 

भरपूर दूध मनीला मिळाले 

आजही खेड्यात माणुसकी नांदते 

शेवटी मनीमाऊला मर्म कळाले...!!


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

आठवणींचं ओझं (मिनुच्या कविता)

 *आठवणींचं ओझं*

आठवणींचं ओझं
नसतं कधी उतरायचं
एकमेकांत गुंतून
नसतं कधी विसरायचं...

आपलीच नातीगोती
जिवापाड जपायचं
संकटकाळात सदा
धावतपळत जायचं....

तीनही ॠतूमध्यें
आनंदाने जगायचं
आपल्याच पाठीवर
आपले ओझं वहायचं...

 हसतमुख चेहरा
सदा ठेवून रहायचं
भलबुरं काय ते
आपलं आपण ठरवायचं...

चांगल्या कर्माची
चांगली फळं चाखायचं
सुखदुःखात आपल्यांना
नाही कधी विसरायचं....

काही घडो राजकारणात
आपण मस्त जगायचं
निसर्गाला एकदा
भरभरून पहायचं.....

कोण छोटा कोण मोठा
ज्याने त्याने ठरवायचं
इतरांच्या फंद्यात
कशाला उगीच पडायचं....

चारदिवसाची जिंदगी
आनंदात जगायचं
विनाकारण दुसऱ्याला
कशाला दोष द्यायचं.....

कोण श्रीमंत कोण गरीब
कशाला उगी पहायचं
अधातमधात न पडता
आपलं आपण जगायचं...

माणूसजन्म पुन्हा नाही
ध्यानी सदा ठेवायचं
माणुसकी जपायची
माणूसपण टिकवायचं....

भलेभले आलेगेले
आपण साक्षी व्हायचं
स्वार्थ्याच्या गर्तेत
नाही कधी अडकायचं...|

मोहमाया सारी
नाही इथं बसायचं....
कधीतरी स्वत:साठी
मस्त मजेत जगायचं...

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
कोकलगाव
९७६७६६३२५७
mpn1412@gmail.com

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...